सचिन वाझे यांना अटक, पण त्यांचे कर्ते करविते कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 03:00 AM2021-03-15T03:00:37+5:302021-03-15T03:01:27+5:30

अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर ही मोटार सापडली होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या. केवळ कांड्या ठेवल्याने स्फोट होत नाही. मात्र, सोबत अंबानी पती-पत्नीच्या नावे लिहिलेले धमकीचे पत्र होते.

Editorial on Sachin vaze case | सचिन वाझे यांना अटक, पण त्यांचे कर्ते करविते कोण?

सचिन वाझे यांना अटक, पण त्यांचे कर्ते करविते कोण?

Next

ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ एका स्कॉर्पिओ मोटारीत जिलेटीनच्या कांड्या व धमकीचे पत्र ठेवल्याच्या प्रकरणाचा आठ दिवसांपर्यंत तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनाच राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)ने शनिवारी रात्री अटक केली. एखाद्या कटकारस्थानाचा तपास करणारा अधिकारीच आरोपी म्हणून अटकेत जाण्याची घटना विरळच म्हटली पाहिजे. वाझे यांच्यावर बेकायदा स्फोटके बाळगण्यापासून अनेक गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. ज्या मनसुख हिरेन या ठाण्यातील रहिवाशाच्या ताब्यात या प्रकरणात वापरलेली स्कॉर्पिओ मोटार होती त्यांचाही अलीकडेच मृत्यू झाला आहे. (Editorial on Sachin vaze case )

हिरेन यांच्या पत्नीने वाझे यांच्यावरच हत्येचा आरोप केला आहे. तूर्त या कथित हत्या प्रकरणाचा तपास राज्य पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक करीत असले तरी आता ज्या गतीने एनआयएने आपल्या चौकशीचे जाळे फेकून वाझे यांना जेरबंद केले आहे, ते पाहता हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपासदेखील एनआयए ताब्यात घेईल, हे स्पष्ट दिसत आहे. 

अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर ही मोटार सापडली होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या. केवळ कांड्या ठेवल्याने स्फोट होत नाही. मात्र, सोबत अंबानी पती-पत्नीच्या नावे लिहिलेले धमकीचे पत्र होते. राज्य सरकारने या घटनेचा तपास वाझे यांच्या पथकाकडे दिला होता. हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यावर या प्रकरणाला राजकीय वळण लागले. अगोदर हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे दिला गेला, तर पुढे विरोधकांनी कोंडी केल्याने वाझे यांची मोक्याच्या पदावरून बदली केली. वाझे हे यापूर्वी ख्वाजा युनूस प्रकरणात वादात सापडल्याने पोलीस सेवेतून बाहेर गेले होते. सुमारे १२ वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 

राज्यात शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कोरोना काळात पोलिसांची कमतरता असल्याने वाझे यांचा दलात चंचुप्रवेश झाला. शिवसेनेचे खास असल्याने संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. अर्णब यांनी कथित फसवणूक केल्याने आत्महत्या केलेल्या अन्वय नाईक यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशीही वाझे यांच्याकडेच होती. त्यामुळे वाझे हे विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या डोळ्यात सलत होते. शिवाय पोलीस दलातील काही अधिकारी आपली कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खुद्द वाझे यांनी अलीकडे केला होता. त्यामुळे हा संपूर्ण घटनाक्रम पाहिल्यावर वाझे हे केंद्र विरुद्ध राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात एक प्यादे म्हणून वापरले गेले का? राज्य सरकारने आपल्याला पुन्हा सेवेची संधी दिल्याने वाझे यांनी आपल्या मर्यादांचे उल्लंघन करून काही पावले उचलल्याने ते अडचणीत आले का? की वाझे हे मुळातच दबंग पोलीस अधिकारी असल्याने कुणी काहीही निर्देश दिले नसताना पुन्हा त्याच पद्धतीने वागून गोत्यात आले, अशा वेगवेगळ्या शक्याशक्यता आहेत. एनआयएने अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणात बरेच दिवस ठावठिकाणा नसलेली इनोव्हा हस्तगत केली. ही मोटार पोलिसांच्या मोटारींची देखभाल होते त्या विभागात पडून होती. 

मुंबई पोलिसांना इतके दिवस ही इनोव्हा कशी सापडली नाही? त्यामुळे मग एनआयए जो दावा करीत आहे, त्यानुसार अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाचे सूत्रधार वाझे हेच आहेत? त्यामुळे मग हिरेन यांची पत्नी म्हणते तशी ती हत्या असून, वाझे यांचाच त्यात सहभाग आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला हवी. किंबहुना वाझे यांनी अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटके कशाला ठेवली, यामागे केवळ वाझे आहेत? की, अन्य कुणी संघटना, अधिकारी, राजकीय नेते आहेत? यावरील पडदा दूर होणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांत या प्रकरणात मीडिया व समाजमाध्यमांवर नानाविध शंकाकुशंका चर्चिल्या गेल्या आहेत. त्या लोकांच्या मनात आहेत. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे विनाकारण बदनामी पदरी आल्याने रिलायन्सने प्रतिमेच्या रंगसफेदीकरिता, सहानुभूतीकरिता कुणाला हाताशी धरून हा बनाव रचला जाणे वरकरणी अशक्य वाटते. अँटिलियावरील हेलिपॅडच्या रखडलेल्या मागणीला बळ मिळावे इतक्या क्षुल्लक कारणास्तव कुणी कुभांड रचेल, असे वाटत नाही. मग देशाच्या विकासात बहुमोल भर घालणाऱ्या औद्योगिक घराण्याला केंद्र व राज्य संघर्षातून लक्ष्य केले गेले का? या व अशा प्रश्नांची उत्तरे मिळून या प्रकरणात वाझे यांचे कर्ते करविते बेनकाब झाले पाहिजेत. अन्यथा एनआयएकडे चौकशी सुपुर्द करण्याचा हेतू वाझे यांच्यापुढे चौकशी सरकू नये हाच असल्याच्या निष्कर्षाप्रत यावे लागेल.
 

Web Title: Editorial on Sachin vaze case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.