संपादकीय: संजय राठोड यांचा राजीनामा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:26 AM2021-03-01T05:26:53+5:302021-03-01T05:27:16+5:30

गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात सुडाचे, द्वेषाचे राजकारण खेळले जाऊ लागले आहे. कदाचित आणखी काही मंत्री, नेते यांच्यावर अशाच स्वरूपाचे आरोप करुन त्यांच्यावर कारवाई करण्यास सत्ताधाऱ्याना भाग पाडण्याचा प्रयत्न होईल. कदाचित ईडीची पिडा मागे लागलेले एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सफारीच्या खिशात ठेवलेली सीडी ते बाहेर काढतील आणि भाजपच्या नेत्यांची चारित्र्य धुतल्या तांदळासारखी नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील.

Editorial: Sanjay Rathode resignation, but what next... | संपादकीय: संजय राठोड यांचा राजीनामा; पण...

संपादकीय: संजय राठोड यांचा राजीनामा; पण...

Next


राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी तब्बल २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीची बेअब्रू काहीअंशी टाळण्याकरिता आपला राजीनामा ठाकरे यांच्याकडे सोपवला. हे राजीनामापत्र स्वीकारले आहे. आता तरी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे प्रकरण उघड झाल्यापासून राठोड यांचे वर्तन संशयास्पद व संतापजनक होते. मंत्रिपदावर असतानाही एखाद्या गुन्हेगारासारखे ते तोंड लपवून फिरले. त्यानंतर ते प्रकटले तोपर्यंत राज्यात व विशेष करून ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. तरीही राठोड यांनी बंजारा समाजाच्या देवस्थानी हजारो माणसे जमवून शक्तिप्रदर्शन केले.

कोरोना रोखण्याकरिता ‘मीच जबाबदार’ या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची शाई वाळण्यापूर्वी राठोड यांनी त्यावर पाणी फेरले. विरोधी पक्ष भाजप, मीडिया व सर्वसामान्य नागरिक यांच्या मनातील एकाही प्रश्नाला उत्तर देणे तर दूरच राहिले राठोड हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला तर आमदारकीचाही राजीनामा देऊ, अशी दबावाची भाषा आपल्या समाजाच्या महंतांच्या मुखातून अखेरपर्यंत वदवून घेत होते. त्यामुळे राठोड यांनी नैतिक चाड असल्याने राजीनामा दिलाय असा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल. पूजा ही बंजारा समाजातील चुणचुणीत मुलगी कलेच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करण्याकरिता पुण्यात आली व एका उच्चभ्रू वस्तीतील फ्लॅटमध्ये वास्तव्य करीत होती. ती त्या इमारतीमधून पडून मरण पावली. तिच्यासंदर्भातील संभाषणाच्या अनेक ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या. ती मुलगी गरोदर असल्याचे व तिचा गर्भपात केल्याचे उघड झाले.  ज्या डॉक्टरांनी हा गर्भपात केला ते रजेवर गेले. अनेक गुंतागुंतीचे प्रश्न या प्रकरणानंतर निर्माण झाले. पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास करणे अपेक्षित होते. मात्र पूजाचे वडील हे आपल्या मुलीने डोक्यावर कर्ज असल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे सांगून राठोड यांचा बचाव केला. बंजारा समाजाचे महंत तर पहिल्या दिवसापासून राठोड यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा राजीनामा घेणे चुकीचे असल्याचा दावा करीत होते. शिवसेनेतील काही मातब्बर मंत्री हेही राठोड यांचा बचाव करीत होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणात सर्वप्रथम तोंड उघडले ते राठोड यांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून शक्तिप्रदर्शन केले तेव्हा.

राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र कालांतराने अन्य काही मंडळींनी त्याच महिलेवर हनी ट्रॅपचा आरोप केल्याने मुंडे यांच्या मागील शुक्लकाष्ठ थांबले. नंतर तर त्या महिलेने तक्रार मागे घेतली. कदाचित राठोड यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरला तर मुंडे यांनाही त्याची धग सहन करावी लागेल यामुळे राष्ट्रवादीने फार ताणून धरले नाही. भाजपच्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात सातत्यपूर्ण आवाज उठवला. अन्यथा मुंडे प्रकरणात भाजपच्या काही नेत्यांनी घेतलेली मिठाची गुळणी लक्षणीय होती. मुळात हा प्रश्न एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून मानसिकतेचा आहे. पारधी समाजातील एका महिलेच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिला उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढून आपल्या चारित्र्याची सत्त्वपरीक्षा द्यायला लावल्याचा एक संतापजनक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रभावशाली पुरुषी मानसिकतेत बदल होत नाही, हीच खरी समस्या आहे. राठोड यांचा राजीनामा घेतल्याने भाजप विधिमंडळ अधिवेशनात अधिक आक्रमक होईल.

कारण गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात सुडाचे, द्वेषाचे राजकारण खेळले जाऊ लागले आहे. कदाचित आणखी काही मंत्री, नेते यांच्यावर अशाच स्वरूपाचे आरोप करुन त्यांच्यावर कारवाई करण्यास सत्ताधाऱ्याना भाग पाडण्याचा प्रयत्न होईल. कदाचित ईडीची पिडा मागे लागलेले एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सफारीच्या खिशात ठेवलेली सीडी ते बाहेर काढतील आणि भाजपच्या नेत्यांची चारित्र्य धुतल्या तांदळासारखी नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मग राठोड यांच्याबरोबर या सीडी प्रकरणाचीही चौकशी जाहीर केली जाईल. पुढे मात्र काहीच कारवाई होणार नाही. कारण सिंचन प्रकरणावन ज्या अजित पवार यांच्याविरुद्ध आरोपांची राळ उडवली त्याच पवार यांच्यासोबत शपथ घेण्यापूर्वी त्यांना भाजपने कशी क्लीन चीट दिली ते आपण पाहिले आहे. त्यामुळे पूजाच्या न्यायाची नव्हे तर पूजाच्या निमित्ताने राजकारणाची ही लढाई आहे.

Web Title: Editorial: Sanjay Rathode resignation, but what next...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.