दिवाळीआधीच शुभवार्ता!... कोरोनाचा हत्ती परिश्रमाने रेटून नेला; आता राहिलंय फक्त शेपूट

By Karan Darda | Published: October 19, 2021 05:30 AM2021-10-19T05:30:18+5:302021-10-19T05:32:27+5:30

मुंबईप्रमाणेच राज्यातील, देशातील कोरोनाचा हत्ती मोठ्या परिश्रमांनी आपण रेटून नेला आहे. त्याचे शेपूट शिल्लक आहे. त्यासाठी आणखी काही काळ निर्बंध आणि नियम असेच पाळावे लागतील.

editorial on situation of corona after vaccination and restrictions | दिवाळीआधीच शुभवार्ता!... कोरोनाचा हत्ती परिश्रमाने रेटून नेला; आता राहिलंय फक्त शेपूट

दिवाळीआधीच शुभवार्ता!... कोरोनाचा हत्ती परिश्रमाने रेटून नेला; आता राहिलंय फक्त शेपूट

googlenewsNext

>> करण दर्डा, एक्झिक्युटिव्ह अँड एडिटोरियल डायरेक्टर, लोकमत

जवळपास पावणेदोन वर्षे साऱ्या जगाला वेठीस धरलेला कोरोना किमान आपल्या देशातून हद्दपार होण्याच्या स्थितीत आहे. जगातील विविध देशांत कोरोनाच्या अनेक लाटा आल्या असल्या, तरी भारतात तिसऱ्या लाटेची भीती बाळगण्याची आता गरज नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दिवाळीच्या आधीची ही शुभवार्ता म्हणायला हवी. मुंबईत रविवारी संपलेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने आणि जनुकीय सूत्र निर्धारणाच्या निष्कर्षात येथील साथ पूर्णपणे आटोक्यात आल्याचे दिसून आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. जवळपास दीड वर्षांच्या कालावधीनंतर कोरोनावर नियंत्रणाचे प्रयत्न फलदायी ठरल्याचे आशादायी चित्र समोर आले आहे.

‘साथ आटोक्यात आल्याचे आणि कोरोनाच्या मृत्यूवरील नियंत्रणाचे हे यश एका दिवसाचे नाही, तर दुसऱ्या लाटेपासून सर्वांनी घेतलेल्या अथक, अविरत प्रयत्नांचे ते फळ आहे’, ही टास्क फोर्सच्या सदस्यांची प्रतिक्रिया त्या दृष्टीने पुरेशी बोलकी आहे. राज्यातील, देशातील साथही हळूहळू आटोक्यात येत असून मृत्यूच्या प्रमाणातही घट होत आहे. याचे श्रेय जसे निर्बंध पाळणाऱ्यांना आहे, तेवढेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक लसीकरणाला आहे. देशातील ३० टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेत लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर ७४ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. मुंबईत मात्र ९७  टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून ५५ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेत लसीकरण पूर्ण केले आहे. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही, त्यांना लागण झाल्यास पूर्वीप्रमाणेच उपचार करावे लागत असून ऑक्सिजनसह सर्व प्रक्रिया पार पाडाव्या लागत आहेत. त्या तुलनेत ज्यांनी लसीकरण केले आहे, त्यांना कोरोनाची लागण झाली तरी त्यांच्या मृत्यूचा धोका टळल्याचे ताजी आकडेवारी सांगते.



अंथरुणाला खिळून असलेल्यांपासून, वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झालेले, बेघर-अनाथ अशा साऱ्यांना वेगवेगळे टप्पे करून लस देण्यात आली. ग्रामीण, दुर्गम भाग, आदिवासींतील गैरसमज दूर करत त्यांनाही लसीकरणाच्या मात्रेखाली आणण्यात आले. अनेक शंकांच्या वावटळी पेलत, लसटंचाईचे आव्हान झेलत ही साथ रोखण्यासाठी गेली दीड वर्षे आरोग्य यंत्रणा, कोविड योद्धे अखंड प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांचे यश आधीपासून दिसून येत होते. मात्र आता साथ आटोक्यात येत असल्याच्या निष्कर्षामुळे सर्वांचेच मनोबल उंचावले आहे. खरेतर जसजसा लसीकरणाचा वेग वाढत गेला, त्या प्रमाणात लाटेचा प्रभाव कमी होत गेला, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आपल्यासारख्या खंडप्राय देशात इतकी गंभीर, जीवघेणी लाट रोखणे हे मोठे आव्हान होते, पण देशाने ते पेलले. अर्थात या काळातील जीवितहानी मात्र आपण रोखू शकलो नाही, ही खंत कायम राहणार.

गणेशोत्सव, नवरात्रीच्या काळात निर्बंध शिथिल केल्यानंतर गर्दी वाढत गेली, पण त्यातून साथ उसळली नाही. आताही हॉटेल, मॉलसह नाट्यगृहे, चित्रपटगृहे टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. पर्यटनाला वेग येतो आहे. रेल्वेचे प्रवासी वाढत आहेत. विमान प्रवासावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून, कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालये सुरू होत आहेत. प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. लसीकरण न झालेल्या २ ते १८ वयोगटातील मुलांना प्रवासास मुभा देण्यात आली आहे. एक डोस घेतलेल्यांना दिवाळीनंतर सर्वत्र संचाराची परवानगी देतानाच दिवाळीत निर्बंध आणखी शिथिल करण्याची चर्चा सुरू आहे. या सर्व बाबी दिलासादायक आहेत, तसेच दीड वर्षांच्या असह्य कोंडीनंतर सर्वच क्षेत्रांचा हुरूप वाढविणाऱ्या आहेत. उद्योग जगतात नोकरभरतीच्या संधी उपलब्ध होतील, असे अहवाल येत आहेत.

अर्थव्यवस्थेचे चक्र अधिक गतिमान होऊ लागले आहे. असे असले तरीही आपल्याला पुढचे काही महिने काळजी घ्यावीच लागेल. त्यामुळे आपल्या उत्सवप्रिय मानसिकतेला थोडा आळा घातलेला बरा. गेली दीड वर्षे गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी असो, की ईद, नाताळ.. आपण साऱ्यांनीच संयमाने हे सण साजरे केले. प्रार्थनास्थळे बंद ठेवली. सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंध सोसले. त्याचा अनेकांना त्रास झाला. मात्र लाट रोखण्यात या उपायांमुळे यश आले हे नाकारता येणार नाही. आताही मुंबईप्रमाणेच राज्यातील, देशातील कोरोनाचा हत्ती मोठ्या परिश्रमांनी आपण रेटून नेला आहे. त्याचे शेपूट शिल्लक आहे. त्यासाठी आणखी काही काळ निर्बंध आणि नियम असेच पाळावे लागतील.

Web Title: editorial on situation of corona after vaccination and restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.