श्रीलंकेतील बदलामुळे वाढणार भारताची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 04:39 AM2019-11-20T04:39:07+5:302019-11-20T04:39:39+5:30

श्रीलंकेत राजपक्षे व प्रेमदासा ही दोन घराणी अलीकडे आलटून-पालटून सत्तेत असतात. राजपक्षे हे चीन व पाकिस्तानचे, तर प्रेमदासा हे भारताचे समर्थक. आता तेथे राजपक्षे घराणे सत्तेत आले आहे. त्यामुळे आपण सध्या तरी श्रीलंकेला भरवशाचा शेजारी म्हणू शकत नाही.

editorial on sri lanka presidential election and its effect on india | श्रीलंकेतील बदलामुळे वाढणार भारताची डोकेदुखी

श्रीलंकेतील बदलामुळे वाढणार भारताची डोकेदुखी

Next

श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे यांचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले असले तरी भारताने त्यांच्याबाबत काहीसे सावधच राहायला हवे. ती निवडणूक अपेक्षेपेक्षा खूपच शांततेत पार पडली. पण गोटाबाया राजपक्षे व त्यांचे थोरले बंधू महिंद्र राजपक्षे यांचा चीन आणि पाकिस्तान यांच्याकडे असलेला कल सर्वज्ञात आहे. या निवडणुकीत सजिथ प्रेमदासा यांची निवड व्हावी, असे भारतीय राजनैतिक वर्तुळातील मंडळींना व लंकेतील तामिळींना वाटत होते. पण तसे घडले नाही.



गोटाबाया राजपक्षे हे आपल्या बंधूंच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. त्याआधी ते लष्करातही होते. श्रीलंकेत तामिळ वाघांविरुद्धच्या मोहिमेतही त्यांचा मोठा वाटा होता. तामिळ वाघांची चळवळ संपल्याचे आणि व्ही. प्रभाकरन यांचा अंत झाल्याचे दु:ख करण्याचे कारण नाही. पण तामिळ वाघांच्या विरोधातील मोहिमेच्या वेळी पाकिस्तानची मदतही घेण्यात आली होती. ती मिळवण्यात गोटाबाया राजपक्षे सक्रिय होते. त्यांच्या मनात लंकेतील तामिळ जनतेविषयी अढी असून, ते कायम बहुसंख्य सिंहला समाजाचेच राजकारण करीत आले आहेत. त्यांच्या आताच्या विजयाचे कारणही तेच आहे.



श्रीलंकेने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेशच्या स्थापनेनंतर पाकिस्तानच्या विमानांना स्वत:च्या देशात इंधनाची सुविधा दिली होती. महिंद्र राजपक्षे यांनीही सत्तेत असताना आपल्या देशातील हम्बनटोटा हे महत्त्वाचे बंदर जणू चीनच्या हवालीच केले. हिंद महासागरात चीन आपला वावर व साम्राज्य वाढवू पाहत असताना श्रीलंकेमध्ये झालेला राजकीय बदल भारतासाठी त्रासदायकच ठरू शकतो. चीन व पाकिस्तान या आपणास त्रास देणाऱ्या शेजाऱ्यांशी श्रीलंकेची जवळीक चिंतेचीच बाब आहे. गोटाबाया राजपक्षे अध्यक्ष म्हणून निवडून येताच थोरले बंधू महिंद्र राजपक्षे यांनी सध्याचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांना स्वत:लाच त्या जागी बसायचे आहे. देशाचा कारभार आपल्याच घराण्यामार्फत चालवण्याचे त्यांचे प्रयत्न दिसत आहेत.



निवडणुकीत पराभूत झालेले सजिथ प्रेमदासा हे भारताचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील रणसिंघे प्रेमदासा यांनीही राष्ट्राध्यक्ष असताना भारताशी उत्तम संबंध ठेवले. आताचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनाही चीनपेक्षा भारत अधिक जवळचा वाटतो. श्रीलंकेतील राजकारणात चीन व पाकिस्तानचे समर्थक व भारताचे समर्थक असे दोन गट सक्रिय आहेत. चीन व पाकिस्तानचा समर्थक असलेला पक्षच गोटाबाया राजपक्षे यांच्या विजयामुळे सत्तेत आला आहे. त्यामुळे या देशाचे भारताशी पुढील काळात संबंध कसे असणार, हा खरा कळीचा मुद्दा आहे. आपल्याला चीन व पाकिस्तान त्रासदायक ठरत असताना, त्यात श्रीलंकेची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.



नेपाळमध्येही भारत समर्थक व चीन समर्थक पक्ष आलटून-पालटून सत्तेमध्ये असतात. नेपाळचे सध्याचे पंतप्रधान के. पी. शर्मा-ओली हे तेथील कम्युनिस्ट पक्षाचे नेते असून, त्या पक्षाचे चीनशीच अधिक चांगले संबंध आहेत. परिणामी त्या देशातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प चीनला मिळताना दिसत आहेत. चीनने नेपाळचा सीमेवरील बराच भूभाग बळकावल्याने तेथे स्थानिकांनी आंदोलन सुरू केले. पण त्याविषयी एक चकार शब्द न बोलणाऱ्या पंतप्रधान ओली यांनी भारताने आमचा कालापानीचा भूभाग बळकावला आहे, अशी तक्रार करीत, तो परत करावा, अशी मागणी केली. थोडक्यात नेपाळही आता आपल्याविरुद्ध कागाळ्या करू लागला असून, त्याला अर्थातच पाकिस्तान व चीनची फूस आहे. भूतानच्या सीमेवरील भूभागावर कब्जा करण्याचे चीनचे प्रयत्न आपण हाणून पाडल्याने तो आपल्या बाजूने उभा राहतो. पण त्याची स्वत:ची ताकद नाही. आणखी एक शेजारी म्यानमारमधील अंतर्गत समस्यांचा त्रासही चीनपेक्षा आपल्याला अधिक होतो. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ हे म्हणणे ठीक आहे. पण सारेच शेजारी त्रासदायक ठरणारे असतील, तर आपल्याला सततच सतर्क राहावे लागेल.

Web Title: editorial on sri lanka presidential election and its effect on india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.