चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 06:02 AM2020-10-10T06:02:48+5:302020-10-10T06:03:49+5:30

तसाही क्रिकेट हा खेळच फलंदाजांचा. पण त्यातही या खेळाच्या नव्या नियमांमुळे शब्दश: जाळ काढणारे तेजतर्रार किंवा ऐंशी-नव्वद कोनातून चेंडू वळवणारे मनगटी फिरकी गोलंदाज दुर्मीळ होऊ लागले आहेत. चेंडू-फळीतला समतोल हरवत चालला आहे.

editorial on sunil gavaskar suggestions about allowing 2 bouncers per over | चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या

चेंडू उसळू द्या! चेंडू-फळीतला समतोल समतोल निर्माण होऊ द्या

Next

टी-ट्वेन्टीचा जन्म झाला तोच मुळी क्रीडाप्रेमींना झटपट वेळेत जास्तीत जास्त आनंद देण्याच्या हेतूने. पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट कंटाळवाणे झाल्यानंतर मर्यादित षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटचा उतारा शोधला गेला; पण हेही क्रिकेट ‘प्रदीर्घ’ वाटू लागले, कारण स्पर्धा होती ती अवघ्या दीड तासात खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलशी, तासाभरात संपणाऱ्या बास्केटबॉलशी, फार तर तीन तासांत संपणाऱ्या टेनिस या प्रचंड वेगवान खेळांशी. आताचे टी-ट्वेन्टी क्रिकेटही तीन तासांत संपते. या लघुत्तम प्रकाराने क्रिकेटचा दर्जा वाढवणाऱ्या काही गोष्टी नक्की आणल्या. क्षेत्ररक्षणाचा दर्जा अफलातून सुधारला. सीमारेषेवरून जाणारे चेंडू चक्क उडत झेलणारे ‘सुपरमॅन’ तयार झाले. मशीनगनमधून सलग बरसणाऱ्या गोळ्यांप्रमाणे बॅटमधून चौकार-षटकारांचा अथक पाऊस पाडणारे स्फोटक फलंदाज निर्माण झाले. कमालीच्या काटेकोरपणाने, जराही न चुकता सतत गगनभेदी आणि दूर अंतरावर चेंडू भिरकावून देण्याच्या क्षमतेने फलंदाजी वेगळ्याच उंचीवर गेली. वीस षटकांच्या खेळात सहजपणे पंधरा-वीस षटकार, तितकेच चौकार पहायला मिळत आहेत. नुसता धूमधडाका.



प्रश्न हा आहे की ही फलंदाजी अचाट असली तरी प्रत्येकवेळी ती देखणी असतेच असे नाही. कलात्मक असते असेही नाही. आक्रसलेल्या सीमारेषा, हलक्या बॅट, टणक चेंडू आणि थेट व्यायामशाळेतून खेळपट्टीवर येणारे दणकट फलंदाज यामुळे चुकलेला फटकासुद्धा सहजपणे षटकार झालेला असतो. एकूणच या प्रकारामुळे ‘टी-ट्वेन्टी’त उतरणारा गोलंदाज आणि कत्तलखान्याकडे चाललेला बोकड यात फार फरक उरलेला नाही. षटकामागे सात-आठची सरासरीसुद्धा आता ‘उत्तम’ समजली जाते आणि निर्धाव चेंडूला ‘टी-ट्वेन्टी’त ‘गोल्ड डस्ट’ म्हटले जाते.



‘टी-ट्वेन्टी’चा पहिला विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला. पुढच्याच वर्षी क्रिकेट विश्वातील सर्वाधिक बलाढ्य, धनवान या अर्थाने ‘अमेरिका’ असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ऊर्फ ‘बीसीसीआय’ने पहिली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) खेळवली. आता जागतिक क्रिकेट खेळण्याचा प्रशस्त मार्ग म्हणून ‘आयपीएल’कडे पाहिले जाते. टी-ट्वेन्टीच्या प्रभावामुळे एकदिवसीय क्रिकेट आणखी वेगवान झाले आणि निकाली निघणाऱ्या कसोटी सामन्यांचीही संख्या वाढली. पण या वेगाच्या नादात चेंडू आणि फळीतला समतोल मात्र हरवला.



क्रिकेटच्या मैदानात गोलंदाज मुळातच दुय्यम. नव्या नियमांनी या गोलंदाजांना आणखी जखडून टाकले. म्हणूनच ज्यांच्या स्वत:च्या काळात फलंदाजाला धड हेल्मेटही नव्हते आणि तरी त्यावेळी समोरून येणाऱ्या गोलंदाजांना एका षटकात कितीही ‘बाऊन्सर्स’ टाकण्याची परवानगी असायची; अशा काळात शतकांची माळ लावलेल्या सुनील गावस्कर या महान फलंदाजाला राहवले नाही. ‘टी-ट्वेन्टी’त केविलवाण्या ठरलेल्या गोलंदाजांच्या मदतीला ते धावले. एका षटकात किमान दोन उसळते चेंडू टाकण्याची परवानगी असावी, पहिल्या तीन षटकांत एखादा बळी टिपलेल्या गोलंदाजाला पाचवे षटक टाकू द्यावे, या दोन महत्त्वाच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. कपिल देव, शेन वॉर्न या सार्वकालिक महान गोलंदाजांनीही याचा पुरस्कार केला.



क्रिकेटमधला एकतर्फीपणा घालवायचा तर गोलंदाजांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळायलाच हवी. एकीकडे ‘टी-ट्वेन्टी’ची लोकप्रियता वाढत असतानाच जागतिक क्रिकेटमधल्या गोलंदाजीचा दर्जाही खालावत जातो, हा निव्वळ योगायोग नव्हे. ‘ऑल-टाइम ग्रेट’ म्हणावेत असे चार-दोन गोलंदाजही गेल्या दशकभरात सापडत नाहीत. मार्शल, होल्डिंग, वॉल्श, अ‍ॅम्ब्रोस, लिली, थॉमसन, इम्रान, वकार, अक्रम, कपिल, कुंबळे, मॅकग्रा, वॉर्न, मुरलीधरन, डोनाल्ड, बोथम, अँडरसन या दर्जाची मजा पुन्हा-पुन्हा अनुभवायची असेल तर फलंदाजांइतकीच संधी गोलंदाजांनाही मिळायला हवी. बॅट आणि बॉल यांच्यात संघर्षच रंगणार नसेल तर क्रिकेट ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ची लुटुपुटुची कुस्ती बनून राहील. ‘आयपीएल’च्या निमित्ताने या चर्चेला तोंड तरी फुटले हेही कमी नाही.

Web Title: editorial on sunil gavaskar suggestions about allowing 2 bouncers per over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.