संपादकीय - शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचा अर्थ समजावणारे अन्नसुरक्षेचे ‘स्वामी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 05:50 AM2023-09-30T05:50:00+5:302023-09-30T05:52:00+5:30
बंगालचा किंवा १९७२चा देशव्यापी दुष्काळ पाहिलेल्या पिढीला आठवत असेल, की त्याची दाहकता काय असते
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४३मध्ये बंगालच्या दुष्काळात लाखो लोक उपासमारीने मरण पावले. केवळ अठरा वर्षांचे मोणकोंबू सांबाशिवन स्वामीनाथन यांनी वैद्यकीय शिक्षण सोडून दिले आणि कृषी संशोधन करण्याचा निश्चय केला. माणसांची अन्नसुरक्षा महत्त्वाची मानून शिक्षणाचा मार्गच बदलला आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ऐंशी वर्षे संशोधन, अभ्यास, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, नियोजनकर्त्यांना मार्गक्रमण करण्यासाठी नवीन दिशा दाखविण्याचे कार्य केले. वडिलांकडून सामाजिक जाणिवेचा वारसा मिळाला होता. कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल आत्मियता होती. पुरुष आणि स्त्रिया दररोज शेतात कष्ट करतात आणि त्यांची कामे एखाद्या वैज्ञानिक तज्ज्ञापेक्षा चांगली असतात, अशी उच्चतम धारणा मनी बाळगणाऱ्या स्वामीनाथन यांनी वैद्यकीय शिक्षण सोडून देऊन त्रिवेंद्रमच्या महाराजा महाविद्यालयातून प्राणिशास्त्राची पदवी संपादन केली. वनस्पती प्रजनन आणि अनुवंशशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत शिक्षण पूर्ण करून नेदरलँड्समध्ये बटाटा पिकाच्या अनुवंशशास्त्रावर संशोधन सुरू केले. केंब्रिज विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ॲग्रीकल्चरमध्ये प्रजाती भेदभाव आणि सोलॅनम - सेक्शन ट्युबेरियम जनुकातील विशिष्ट प्रजातीतील ‘पाॅलिप्लाईडी ऑफ नेचर’ यावर संशोधन करून डाॅक्टरेट मिळविली. याच तयारीच्या आधारे कोणत्याही परदेशातील विद्यापीठात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली असती, इतके मूलभूत संशोधन त्यांनी केले. पण, कृषिक्षेत्रामध्ये उत्पादनवाढीसाठीची क्रांती त्यांच्या मनात रूंजी घालत होती.
शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले. बंगालच्या दुष्काळात लाखोंच्या संख्येने उपासमारीने मेलेले लोक त्यांना दिसत होते. आगामी काळात दुष्काळ पडलाच तर आपल्या जनतेला पुरेल इतका अन्नधान्याचा साठा आपल्याकडे असला पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन भारतीय कृषी संशोधन संस्थेचे प्रमुखपद स्वीकारून ते कामाला लागले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, कृषिमंत्री सी. सुब्रह्मण्यम आणि कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांची त्यांना साथ लाभली. भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचा पाया डाॅ. एम. एस. स्वामीनाथन यांनी घातला. भात, गहू आणि बटाटा आदी पिकांतील जनुकावर संशोधन करून अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजाती त्यांनी शोधून काढल्या. अमेरिकेचे जगविख्यात कृषिशास्त्रज्ञ डाॅ. नाॅर्मन बोरलाॅग यांचे सहकार्य घेतले. बोरलाॅग यांनी गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी संशोधन केले होते. मानवतेची सेवा करणाऱ्या या शास्त्रज्ञांना देशा-देशांच्या सीमा रोखू शकत नव्हत्या. स्वामीनाथन आणि बोरलाॅग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे उपजत ज्ञान, त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊ लागले. सी. सुब्रह्मण्यम आणि अण्णासाहेब शिंदे हे कृषिमंत्रीही कृषी मंत्रालयात कमी आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेत अधिक वेळ घालवीत असत. डाॅ. स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शास्त्रज्ञ कोणते प्रयोग करीत आहेत, ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसे पोहचविता येतील, याचे नियोजन करीत होते. भात आणि गव्हाचे संशाेधन यशस्वी झाले. स्वामीनाथन यांनी ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून या सर्व धडपडीत भूमिका बजावली. आपल्याकडील देशी भाताची वाणे उंच येत. परतीच्या पावसाने हा उंच असलेला भात जमीनदोस्त होऊन सुमारे चाळीस टक्के उत्पादन मातीमोल होऊन जात असे. जुन्या प्रजातींच्या अनुवंशिकतेचा अभ्यास करून कमी उंचीच्या भात पिकांचा शोध स्वामीनाथन यांनी लावला. शिवाय सुमारे ३३ टक्के उत्पादनवाढ होईल, असेही संशोधन केले. एकरी दहा क्विंटल पिकणाऱ्या भाताची उत्पादकता चाळीस क्विंटलवर पोहोचली. अशा बारीकसारीक बाबींचा विचार करून देशाच्या पंतप्रधानांपासून तामिळनाडूच्या कोपऱ्यातील शेतकऱ्यांपर्यंत या संशोधनाचा अर्थ समजावून सांगणारा संशोधक डाॅ. एम. एस. स्वामीनाथन! त्यांना माणसाच्या अन्नसुरक्षेचा ‘स्वामी’च म्हणावे लागेल.
बंगालचा किंवा १९७२चा देशव्यापी दुष्काळ पाहिलेल्या पिढीला आठवत असेल, की त्याची दाहकता काय असते! आपल्या संशोधनातून देशबांधवांची सेवा केल्यानंतर स्वामीनाथन यांनी संयुक्त राष्ट्रसंघाने फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे स्थापन केलेल्या जागतिक भात संशोधन संस्थेचे महासंचालकपद स्वीकारून जगभरातील भाताच्या प्रजातींवर संशोधन केले. भारत आज अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे. याचा पाया स्वामीनाथन यांनी आपल्या अमूल्य संशोधनाने घातला आहे. मानवतेची सेवा करणारा ‘स्वामी’ भारताला किंबहुना जगाला अन्नाची सुरक्षा देऊन अनंतात विलीन झाला.