...तरच अशा निष्काळजीपणाला कायमची वेसण घातली जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:39 AM2021-05-21T07:39:08+5:302021-05-21T07:39:34+5:30

समुद्राची भाषा आपल्याला चांगलीच अवगत आहे, या अतिआत्मविश्वासाचे  फळ हकनाक प्राण गमावलेल्या कामगार-तंत्रज्ञांच्या कुटुंबीयांना दुर्दैवाने भोगावे लागले.

Editorial on Tauktae Cyclone Effect on Sunken Barge Near Bombay High | ...तरच अशा निष्काळजीपणाला कायमची वेसण घातली जाईल.

...तरच अशा निष्काळजीपणाला कायमची वेसण घातली जाईल.

googlenewsNext

देशांतर्गत तेल उत्पादनाच्या दोन तृतियांश वाटा असलेल्या मुंबई हायच्या परिसरात दुर्घटनांचे सत्र सुरूच असते. कधी तेल गळती होते, तर कधी वायू गळती. कधी आग लागून जीवितहानी होते. यापूर्वी, जुलै २००५ मध्ये या तेल फलाटावर मोठी आग लागली. त्यात २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच्या आदल्या दिवशी २६ जुलै रोजी न भूतो... अशा पावसाने मुंबई आणि परिसराची दाणादाण उडवून दिली होती. मुंबई त्यावेळी एवढी विकलांग झाली होती की, या तेल विहिरींवरील बचाव कार्यासाठी ओएनजीसीची हेलिकॉप्टर्स उड्डाणही करू शकली नव्हती. ती दुर्घटना घडल्यानंतरही आपत्कालीन स्थितीत नेमके काय करायला हवे, याचा बोध न घेतल्याचे भीषण परिणाम आता पाहायला मिळाले. गेले तीन दिवस सुरू असलेल्या मृत्यूच्या तांडवात नेमके काय घडले आणि त्याला जबाबदार कोण याची मीमांसा चौकशी समिती करेलच. ओएनजीसीच्या आपत्कालीन यंत्रणेचे अपयश यातून उघड झाले आहे, पण त्यांची निर्णयक्षमता गलितगात्र का झाली, चक्रीवादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी अशी कोणती आणीबाणी तेथे होती, याचाही उलगडा झाला पाहिजे. तौक्ते चक्रीवादळाचा मुंबई आणि परिसराने मोठ्या हिमतीने सामना केला.

त्या धक्क्यातून सगळे सावरत असतानाच भरसमुद्रात मुंबई हायपाशी ६००पेक्षा अधिकजण खवळलेल्या समुद्रात अडकून पडल्याचे आणि तेथे नौदल, तटरक्षक दलाकडून बचाव कार्य सुरू असल्याचे वृत्त आले. खोल समुद्रात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या तंत्रज्ञांची मोठी संख्या लक्षात घेता, तेथे काही अघटित घडले तर ते कितीजणांच्या जिवावर बेतेल, याची भीती व्यक्त होत होती. तेथे काहीजणांच्या सुटकेपाठोपाठ २२ जणांचे मृतदेह सापडल्याचे वृत्त आले आणि ती भीषणता आणखी गडद होऊ लागली. सागरातील त्या जीवघेण्या प्रसंगातून बचावलेल्यांनी जे काही सांगितले त्यावरून चक्रीवादळाचे थैमान सुरू असताना मृत्यूनेही त्या परिसरात कसे तांडव मांडले होते, याची केवळ कल्पनाच करता येईल. मुंबईपासून १७६ किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात झालेल्या या दुर्घटनेने आतापर्यंत तब्बल ३७ कामगारांचा जीव घेतला.

Cyclone Tauktae Latest Updates: 37 bodies found after P305 barge sinks; search operation continue

३८ कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत. तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रूप घेतल्यामुळे मुंबई हाय या तेल विहिरींच्या परिसरात असलेल्या हिरा विहिरीजवळील पी ३०५, गॅल कन्स्ट्रक्टर आणि एसएस-३ हे तीन निवासी तराफे, तसेच सागर भूषण हा तेल फलाट भरकटला. त्यापैकी पी ३०५ हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावर त्यावेळी २६१ कर्मचारी होते. त्यांनी जीवरक्षक जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. नौदल आणि तटरक्षक दल यांच्या बचाव पथकाने जिवावर खेळून त्यातील १८० जणांची सुटका करण्यात यश मिळविले. उरलेल्या बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. बेपत्ता कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांचे मृतदेह बुधवारी दुपारपासून सापडू लागले. चक्रीवादळ येणार आणि त्याची तीव्रता वाढत जाणार याची कल्पना वेळोवेळी हवामान खात्याकडून दिली जात होती. सर्वसामान्य माणूसही आपल्या परीने या चक्रीवादळाला तोंड देण्याची तयारी करत होता. असे असताना चोवीस तास समुद्रात वावरणाऱ्या, तेथील धोक्याची, खवळलेल्या सागराची पूर्ण कल्पना असलेल्या ओएनजीसी आणि त्यांच्याशी निगडित कंत्राटदार कंपन्यांनी या धोक्याच्या इशाऱ्याची फारशी फिकीर केलेली दिसली नाही.

Hunt for 26 Persons Missing from Sunk P305 Barge Still On, Toll Reaches 49; Gujarat Death Count Goes up to 79

समुद्राची भाषा आपल्याला चांगलीच अवगत आहे, या अतिआत्मविश्वासाचे  फळ हकनाक प्राण गमावलेल्या कामगार-तंत्रज्ञांच्या कुटुंबीयांना दुर्दैवाने भोगावे लागले. चक्रीवादळाने जेव्हा गोवा- सिंधुदुर्गाला तडाखा दिला, त्यानंतरही व्यवस्थापन सतर्क का झाले नाही? त्यांच्या निष्काळजीपणाचे हे बळी आहेत. मुंबईसारख्या महानगरात जेव्हा साधारण तीन दशकांपूर्वी बॉम्बस्फोटांसाठीचे आरडीएक्स समुद्रमार्गे आणले गेले, नंतर २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गाचा वापर केला तेव्हापासून अरबी समुद्रातील काही भाग संवेदनशील बनला. देशाच्या या आर्थिक राजधानीला असलेला धोका पाहता केंद्रीय यंत्रणांनीही अशा घडामोडींकडे अधिक सतर्कतेने पाहायला हवे होते. भरसमुद्रात काम करण्यासाठी बांधले जाणारे तराफे, फलाट यांच्या सुरक्षेची अहोरात्र काळजी घेतली जाते. वातावरण, वाऱ्याचा वेग, लाटांचा तडाखा अशा विविध घटकांचा विचार करून त्यांची बांधणी केलेली असते. दुरुस्ती-देखभाल केली जाते, पण ती खरोखर झाली होती का याचाही तपास यानिमित्ताने व्हायला हवा. तसे झाले तरच अशा निष्काळजीपणाला कायमची वेसण घातली जाईल.

Papaa 305 accident puts focus on sea barges | India News - Times of India

Web Title: Editorial on Tauktae Cyclone Effect on Sunken Barge Near Bombay High

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.