गुलाबी अध्यायाला सुरुवात झाली; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 04:35 AM2019-11-23T04:35:33+5:302019-11-23T04:36:36+5:30
संगीताचा कान असलेला दर्दी रसिक जसा उडत्या चालीच्या गाण्यावर क्षण दोन क्षण ताल धरला, तरी अभिजात संगीताकडे पाठ फिरवित नाही, त्याप्रमाणेच, खऱ्या क्रिकेटप्रेमींनी लीग क्रिकेटच्या काळातही कसोटीला आश्रय देणे बंद केले नाही.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर बांगलादेश संघाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला, तेव्हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला. पूर्वापार पांढरे कपडे घालून लाल रंगाच्या चेंडूनिशी खेळल्या जाणाऱ्या साहेबांच्या या खेळाने गत काही दशकांमध्ये अनेक बदल अनुभवले. पाच दिवसांचा सामना, मध्ये एक दिवसाची विश्रांती, भोजन अवकाश, चहापान अवकाश, प्रत्येक तासानंतर जलपान, अशा शाही अंदाजात खेळल्या जाणाऱ्या या खेळाच्या, पुढे एक दिवसीय, ट्वेंटी-ट्वेंटी अशा आवृत्त्या निघाल्या आणि अजूनही काही नव्या आवृत्त्यांचे प्रयोग सुरूच आहेत.
दिवसाउजेडी खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांच्या जोडीला १९७१ पासून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने सुरू झाले. काही काळाने ते रात्री कृत्रिम दिव्यांच्या प्रकाशझोतात, रंगीत कपड्यांनिशी, पांढऱ्या रंगाच्या चेंडूने खेळविले जाऊ लागले. या प्रयोगाला अफाट लोकप्रियता लाभली. पाच दिवसांच्या संथ कसोटी सामन्यांच्या तुलनेत क्रिकेटचे हे नवे जलद रूप प्रेक्षकांना भावले खरे, पण लवकरच तेदेखील रटाळ वाटू लागल्याने फुटबॉल, बास्केटबॉलसारख्या खेळांप्रमाणे अवघ्या काही तासांत निकाल लागणाऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांचे आगमन झाले. एकदिवसीय सामन्यांमुळे जशी क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा शक्य झाली, तसे ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांमुळे क्रिकेटमध्येही फुटबॉल व बास्केटबॉलच्या धर्तीवरील लीग स्पर्धांचे पेव फुटले.
कसोटी क्रिकेटची महती मात्र एवढी मोठी की, आपल्याच छोट्या भावंडांच्या स्पर्धेतही ते टिकाव धरून राहिले. संगीताचा कान असलेला दर्दी रसिक जसा उडत्या चालीच्या गाण्यावर क्षण दोन क्षण ताल धरला, तरी अभिजात संगीताकडे पाठ फिरवित नाही, त्याप्रमाणेच खऱ्या क्रिकेटप्रेमींनी लीग क्रिकेटच्या काळातही कसोटीला आश्रय देणे बंद केले नाही. हा आश्रय वाढावा, रसिकांना त्यांची दिवसभरातील कामे आटोपल्यानंतर सायंकाळी निवांतपणे कसोटी सामन्याचा आनंद लुटता यावा, या हेतूने २०१५ मध्ये कृत्रिम प्रकाशझोतातील कसोटी सामन्यांना प्रारंभ झाला.
कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या १२ देशांच्या संघांपैकी भारत हा एकमेव प्रमुख संघ आहे, ज्याने अद्याप क्रिकेटच्या या प्रकाराचा अनुभव घेतलेला नाही! भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने अशीच भूमिका एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटसंदर्भातही घेतली होती. अर्थात, पुढे बीसीसीआयने त्या दोन्ही प्रकारांच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावला, ही बाब अलहिदा! अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम म्हणजेच डीआरएससंदर्भातही असाच घोळ घालण्यात आला होता.
दैवाने सौरव गांगुलीसारखा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान झाला आणि भारतीय क्रिकेटमध्येही दिवस-रात्रीच्या कसोटी क्रिकेटचा गुलाबी अध्याय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. दुपारी १ वाजता सुरू होऊन रात्री ८ वाजेपर्यंत गुलाबी चेंडूने खेळला जाणारा हा नवा प्रकार क्रिकेटप्रेमींना कसोटी क्रिकेट बघण्यासाठी मैदानाकडे आकृष्ट करेल, अशी अपेक्षा आहे. अर्थात, केवळ तेवढ्यानेच कसोटी क्रिकेटचा सुवर्णकाळ परतेल, अशी भाबडी आशा करण्यातही काही अर्थ नाही. त्यासाठी जोडीला आणखी काही पावले उचलण्याची गरज आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांमध्ये वर्षभराचे कसोटी क्रिकेट कॅलेंडर तयार असते. त्यामुळे त्या देशांमधील क्रिकेटप्रेमींना सामने बघायला जाण्याचे नीट नियोजन करता येते. परिणामी, अजूनही त्या दोन्ही देशांमध्ये कसोटी क्रिकेट बघायला गर्दी होते. भारतानेही असा प्रयोग करण्याची गरज आहे. भारत ही आता क्रिकेटमधील महाशक्ती आहे. त्यामुळे भारताने क्रिकेट जगताचे नेतृत्व करण्याची गरज आहे. सातत्यपूर्ण बदल हे नव्या युगातील यशाचे गमक आहे. भारतीय क्रिकेटच्या कर्त्याधर्त्यांनीही नकारात्मकतेला सोडचिठ्ठी देऊन नव्या प्रयोगांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे!