संपादकीय - दुष्काळात तेरावा महिना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:38 AM2019-04-05T07:38:51+5:302019-04-05T07:42:49+5:30

बातमी जीव टांगणीला लावणारी, पोटात गोळा आणणारी आहे. या वर्षी पाऊस कमी होणार असे हवामानाचा,

Editorial - Thirteen months in the famine! | संपादकीय - दुष्काळात तेरावा महिना!

संपादकीय - दुष्काळात तेरावा महिना!

Next

बातमी जीव टांगणीला लावणारी, पोटात गोळा आणणारी आहे. या वर्षी पाऊस कमी होणार असे हवामानाचा, पाऊस-पाण्याचा अंदाज वर्तवणारी ‘स्कायमेट’ नावाची संस्था म्हणते. तिच्या म्हणण्यातही निरीक्षण, संशोधन, वैज्ञानिक सिद्धांत आणि अभ्यासाची जोड असल्याने जोर आहे. म्हणूनच चित्त थाऱ्यावर नाही. सध्या दुष्काळाने कंबरडे मोडले. गेल्या चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. येणारे वर्ष चांगले असेल अशा आशेवर असणाऱ्यांना गेले वर्ष चांगले होते अशी प्रचिती येते. आता पुढचे वर्षही खडतर असणार असे दिसत असताना जगण्यावरची वासनाच उडावी अशी अवस्था आहे. शेती पार मोडून गेली, गावंच्या गावं रोज घाघरभर पाण्यासाठी रात्रंदिवस टँकरची वाट पाहत दिवस ढकलत आहेत. पाणीच नसल्याने खेड्यांमध्ये उदासीनता भरून राहिलेली. कोणाच्या चेहºयावर की वातावरणात कुठेही चैतन्याचा टिपूस नाही. जनावरांना चारा नाही; मिळेल तो चघळचोथा खात ती रानोमाळ भटकताना दिसतात. चारा मिळत नाही आणि मिळालाच तर त्याचे अस्मानाला भिडलेले भाव पाहता विकत घेण्याची ऐपत नाही.

हाताला काम नसल्याने गावागावात लोक हातावर हात ठेवून बसलेले दिसताना आढळतात. जगण्याची उमेदच संपल्याने ना त्यांच्यात्त संवाद होतो ना गप्पांचे फड रंगतात. काय बोलावे हाही प्रश्न आहेच असा विचित्र विळखा या दुष्काळाने घातला असताना आता पुढच्या वर्षी हेच वाढून ठेवल्याचे चित्र ‘स्कायमेट’ने चितारले आणि उरलासुरला जीवनरस आटून गेला. ग्रामीण महाराष्ट्राचे जनजीवन उद्ध्वस्त करणारा हा अंदाज आहे. ‘अल निनो’च्या परिणामाचा अनुभव आपल्या गाठीला आहे. स्कायमेटच्या आजवरच्या अंदाजाचा मागोवा घेतला तर गेल्या चार वर्षांत एकदाच म्हणजे २०१५ साली तो अचूक ठरला. या वर्षीच्या अंदाजाचे विश्लेषण करायचे म्हटले तर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ५५ टक्के आहे. याचाच अर्थ लावायचा तर दुष्काळ पाठ सोडायला तयार नाही आणि यामुळे ग्रामीण महाराष्ट्र मोडून पडणार यात शंका नाही. पॅसिफिक महासागरातील ‘अल निनो’ हा प्रवाह आपल्यावर मोठा परिणाम करतो. हा ‘स्कायमेट‘चा अंदाज म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे. असे अनेक विचारप्रवाह हवामान क्षेत्रात आहेत. डॉ. श्रीनिवास औंधकर या शास्त्रज्ञांनी तीन वर्षांपूर्वी पृथ्वीवर अल्पकालीन हिमयुग अवतरणार, असा अंदाज वर्तविला होता आणि त्यावरून मोठा गदारोळही उठला होता. परंतु गेल्या तीन वर्षांत पृथ्वीवर झालेली बर्फवृष्टी आणि तापमानात झालेला बदल पाहता त्यांच्या निरीक्षणाला पुष्टी मिळते, असे अल्पकालीन हिमयुग यापूर्वी इ.स. १५०० ते १५५० आणि १७९० ते १८३० या काळात अवतरले होते. हवामानशास्त्रात डालटन मिनिमम आणि माउंडट मिनिमम या नावांनी ती ओळखली जातात. तशीच अवस्था आता निर्माण झाली आहे. पृथ्वीचे वातावरण थंड होत असतानाच विषुववृत्तीय पट्ट्यात ते वाढते आणि त्याचा हा परिणाम असतो. आताची ही अवस्था २०२३ पर्यंत राहील व पुढे २०३२ पर्यंत हळूहळू त्यात सुधारणा होईल, असाही अंदाज आहे.

दुसºया आणखी एका मतप्रवाहानुसार गेल्या वर्षभरात देशभरातील थंडीचे प्रमाण आणि कालावधी वाढला. त्यामुळे चांगल्या पावसाचे संकेत आहेत. कारण समुद्रावरून निघालेल्या ढगांना हिमालयातच थंड हवा मिळण्याने तेथे पाऊस वाढला; पण इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहूनही पाऊस पडला नाही. कारण सांद्रीभवनासाठी तेवढे थंड वातावरण या भागात नव्हतेच. आता वातावरण थंड झाले आहे. एरव्ही फेब्रुवारीत ४० चा पारा गाठणारे तापमान या वर्षी एप्रिलपर्यंत लांबले. त्यावरून या वर्षी सांद्रीभवनासाठी योग्य वातावरण असल्याने चांगले पर्जन्यमान होईल, अशी मतमतांतरे असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही; पण या सगळ्याचा एकत्रित परिणाम जनमानसावर होत असतो. वर्ष कसेही गेले, मराठवाड्याच्या भाषेत ‘बखाडी’ पडली, तरी उद्यावर भरवसा ठेवत बळीराजा पुन्हा उभारीने उभा राहतो. कारण दुष्काळाशी दोन हात करणे काही नवे नाही; पण हा अंदाज म्हणजे दुष्काळात तेरावा महिना!.



मैलोन् मैल ओसाड जमीन, नजर थंड होईल असा हिरवाईचा साधा ठिपकाही नाही. गेल्या चार-पाच वर्षांत नदीनाल्यातून पाणी गेले नाही. शेतातूनच ते बाहेर पडले नाही. परिणामी विहिरी आटल्या. त्यात पाण्याचा टिपूस नाही. मग शेतकऱ्यांनी जगायचे कसे?

Web Title: Editorial - Thirteen months in the famine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.