आज तेरी महफील से उठे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:06 AM2021-07-08T11:06:16+5:302021-07-08T11:06:47+5:30

दिलीपकुमार यांना अभिनयाच्या क्षेत्राचा असा कोणताही वारसा लाभला नाही. आपण क्रिकेटच्या क्षेत्रात पाय रोवून वेस्ट इंडिजविरोधात शतक ठोकावे, असे युसुफ यांचे स्वप्न होते.

Editorial On Veteran Actor Dilip kumar | आज तेरी महफील से उठे

आज तेरी महफील से उठे

Next

रुपेरी पडद्यावरील ‘ट्रॅजेडी किंग’ युसुफ खान अर्थात दिलीपकुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ राज कपूर, देव आनंद व दिलीपकुमार यांनी अक्षरश: गाजवला. त्यापैकी राज व देव यांनी यापूर्वीच चाहत्यांचा निरोप घेतला होता. या सुवर्णकाळाचा बिनीचा शिलेदार असलेल्या दिलीपकुमार यांनीही अलविदा केल्याने आता त्या युगाच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. राज यांना नाटकात काम करण्याची आवड होती तर देव यांच्या कुटुंबात नाट्यकलेचा वारसा होता. 

दिलीपकुमार यांना अभिनयाच्या क्षेत्राचा असा कोणताही वारसा लाभला नाही. आपण क्रिकेटच्या क्षेत्रात पाय रोवून वेस्ट इंडिजविरोधात शतक ठोकावे, असे युसुफ यांचे स्वप्न होते. योगायोगाने युसुफ यांचा परिचय बॉम्बे टॉकिजच्या देविका राणी यांच्याशी झाला आणि सिनेसृष्टीला एका युगप्रवर्तक अभिनेत्याची देणगी लाभली. देव आनंद म्हणत, “दिलीप आपल्या अभिनयासंबंधी आधी विचार करील आणि मग अभिनयाचा आविष्कार दाखवेल!”  चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढउतार आणि नजरेतील उत्कटता यात दिलीपकुमार यांचे अभिनयकौशल्य सामावले होते. 

चौफेर वाचनाने त्यांच्यातील अभिनेत्याला विद्वत्तेचे तेजही लाभले होते. सुरुवातीला हा लाजराबुजरा तरुण या चंदेरी दुनियेत पाय रोवताना अडखळला खरा, मात्र मेहबूब खान यांच्या अंदाज (१९४९)ने त्यांना ‘शोकांतिकेचा बादशहा’ ही ओळख प्राप्त करून दिली. त्यांच्या चित्रपटाची यादी भलीमोठी आहे. मात्र दिलीप यांच्या अफाट कारकिर्दीचा विचार देवदास (१९५६)चा उल्लेख केल्याखेरीज पूर्ण होऊ शकत नाही. यापूर्वी पी. सी. बारुआ यांनी के. एल. सैगल यांना घेऊन देवदासची निर्मिती केली होती. त्यामुळे बिमल रॉय यांच्या देवदासमध्ये प्रमुख भूमिका देऊ केल्यावर सैगल यांनी अजरामर केलेली भूमिका करण्यात धोका असल्याची शंका त्यांना सतावत होती. परंतु दिलीप यांचा देवदास इतका लोकप्रिय झाला की आचार्य अत्रे यांनी, “देवदासची फिल्म शरीराभोवती गुंडाळून बसावे असे वाटते,” अशी प्रतिक्रिया दिली होती. 

नया दौर (१९५७) या चित्रपटात यंत्रयुग विरुद्ध मानवी श्रम यांचा संघर्ष होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकीकडे पायाभूत सुविधा, उद्योगधंदे यांचा विस्तार होत असतानाच कामगारांचे लढे उभे राहत होते. साम्यवादी विचार प्रबळ होत होता. तोच संघर्ष नया दौरचा गाभा होता. ज्वारभाटा चित्रपटाच्या वेळी नायिकेला मिठी मारताना हात-पाय लटपटल्याने पायाला साखळी बांधलेल्या दिलीपकुमार यांच्या मधुबाला हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे चित्रपटसृष्टीत नवे वादळ त्या वेळी उठले होते. के. असिफ यांच्या मुगल-ए-आझम (१९६०)पर्यंत या प्रेमसंबंधांची चर्चा, कोर्टकज्जे सुरू होते. मुगल-ए-आझमने मोठा इतिहास घडवला. या चित्रपटाकरिता दिलीपकुमार यांनी मोगल राजघराण्यातील लोकांच्या चालण्यावागण्याचा बारकाईने अभ्यास केला होता. ‘कोहिनूर’ चित्रपटात सतार वादनाचा अभिनय न करता उस्ताद अली जाफर यांच्याकडून दिलीप यांनी सतार वादनाचे धडे गिरवले. ‘दीदार’ चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारण्याकरिता ते महालक्ष्मी मंदिरापाशी भीक मागणाऱ्या अंध भिकाऱ्यांच्या हालचालींचे निरीक्षण करीत बसत असत. 

सायरा बानो यांच्याशी त्यांचा अचानक झालेला विवाह हा त्यांच्या चाहत्यांना बसलेला धक्का होता; तसेच अस्मा नावाच्या महिलेसोबत त्यांनी केलेला दुसरा विवाह आणि काडीमोडापर्यंतचा प्रवास हाही दिलीप यांच्या आयुष्यातील खडतर काळ! १९७६ पासून पाच वर्षे ते चित्रपटांपासून दूर राहिले. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन या सुपरस्टारचा उदय झाला होता. शोककथांवरील चित्रपटांची जागा सूडकथांनी घेतली होती. मात्र पुन्हा पडद्यावर येऊन त्यांनी शक्ती (१९८२)सारख्या चित्रपटांद्वारे आपली छाप पाडलीच. फाळणीनंतरही भारतात वास्तव्य केलेल्या दिलीप यांचे मुस्लीम असणे काही हिंदुत्ववादी पक्ष, संघटना यांना सातत्याने बोचत राहिले. कधी त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध जोडला गेला तर कधी पाकिस्तानने त्यांना दिलेल्या ‘निशान-ए-इम्तियाज’ या पुरस्कारावरून वादळ उठवले गेले. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगे उसळले. त्यानंतर लोकांचे अश्रू पुसण्याकरिता घराबाहेर पडल्यावरही त्यांच्यावर चिखलफेक केली गेली. मुंबईचे शेरीफपद तसेच राज्यसभा सदस्यत्व त्यांनी भूषविले होते. गेली काही वर्षे ते विस्मृतीच्या आजाराने ग्रस्त होते. देवदासमध्ये तलतच्या आवाजातील ‘आज तेरी महफिल से उठे, कल दुनिया से उठ जायेंगे, किसको खबर थी... हे काळीज चिरणारे गीत आहे. या श्रेष्ठ अभिनेत्याला अखेरचा निरोप देताना त्या गीताचे स्मरण होते.
 

Web Title: Editorial On Veteran Actor Dilip kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.