मनोहर पर्रीकरांनंतर काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 11:30 AM2018-09-17T11:30:05+5:302018-09-17T11:42:06+5:30
मनोहर पर्रीकर यांचा आजार हा गोव्यात साऱ्यांच्याच चिंतेचा विषय बनला आहे आणि त्यातल्या त्यात भाजपासाठी, सरकारच्या अस्तित्वासाठी तो आणखीनच गंभीर विषय आहे.
- राजू नायक
मनोहर पर्रीकर यांचा आजार हा गोव्यात साऱ्यांच्याच चिंतेचा विषय बनला आहे आणि त्यातल्या त्यात भाजपासाठी, सरकारच्या अस्तित्वासाठी तो आणखीनच गंभीर विषय आहे. त्या पार्श्वभूमीवर या एकूणच प्रकरणाचा घेतलेला आढावा.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना शनिवारी सकाळी दिल्लीत नेण्यात आले. ते सध्या भारतीय वैद्यकीय अनुसंधान केंद्रात उपचार घेत आहेत. स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी ते लढत आहेत. अजून सरकारने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी आजाराचे स्वरूप जाहीर केलेले नाही; परंतु एखाद्या प्रमुख नेत्याला झालेला आजार किती काळ लपून राहू शकतो?
मुंबईत पहिल्यांदा ते लीलावतीत दाखल झाले व त्यांच्यावर डॉ. जगन्नाथ उपचार करू लागले. तेव्हाच या आजाराचे स्वरूप कोणीही ताडू शकले असते. जगन्नाथ कॅन्सरवरचे देशातील प्रमुख डॉक्टरांपैकी एक आहेत. तेथे काही दिवस राहिल्यानंतर अमेरिकेला जाण्याचा निर्णय पर्रीकरांनी घेतला तेव्हा एकतर डॉ. जगन्नाथांनी आपली असमर्थता व्यक्त केलेली असावी किंवा अमेरिकेत आणखी अद्ययावत उपचार पद्धती विकसित झालेली असावी, असा निष्कर्ष काढण्यात आला. वास्तविक कॅन्सर सर्जन आता अत्यंत स्पष्ट नीती अवलंबितात. ते रुग्ण आणि त्यांच्या जवळच्या आप्तांना कोणत्याही भ्रमात ठेवत नाहीत. डॉ. जगन्नाथ यांची नीती तर एवढी सुस्पष्ट आहे की ते आप्तांना रुग्ण नेमके किती दिवस जगणार आहे, ते सांगू शकतात.
कॅन्सर हा एक असा आजार आहे, ज्याच्यावर जेवढे संशोधन होते ते क्वचित दुसऱ्या आजारांवर होत असेल. तरुण वयात तर हा आजार झपाट्याने संपूर्ण शरिरावर ताबा मिळवितो. एखाद्या धडधाकट माणसाचे सारे शरीर कुरतडून टाकतो. नंतर केमोथेरपी त्याचा उरला-सुरला हुरूप संपविते. या आजाराने ग्रस्त रुग्णाने नेहमी सकारात्मक राहावे, असे सांगितले जाते; परंतु भारतात तरी आज ज्या पद्धतीची केमोथेरपी दिली जाते ती अत्यंत वेदनादायी आणि व्यक्तीचे संपूर्ण खच्चीकरण करणारीच आहे. त्या तुलनेने अमेरिकेत स्लोन संशोधन केंद्रात जेथे पर्रीकरांवर उपचार झाले, तेथे नॅनो या आधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करण्यात आला. म्हणजे ज्या भागाला कॅन्सरचा दंश झाला, तेथेच औषधांचा मारा करणे. त्यामुळे केस जात नाहीत, माणूस जास्त थकत नाही आणि साइड इफेक्टही कमी असतात; परंतु त्यासाठी रुग्णानेही सहकार्य करायला हवे. या उपचार पद्धतीत रुग्णाने पूर्णपणे उपचारांच्या अधीन व्हायचे असते.
याबाबतीत पर्रीकरांचे गुण काही प्रमाणात अवगुणही ठरले असण्याची शक्यता आहे. पर्रीकरांवर हृदयरोगावर जेथे उपचार करणारे डॉक्टर सांगतात की डॉक्टरांचे सांगणे त्यांनी कधी निमूटपणो ऐकले नाही. पर्रीकरांनी आपल्या आरोग्याकडे कधी लक्ष दिले नाही. गोव्याने इतके मुख्यमंत्री पाहिले; परंतु राजकारणात संपूर्णत: बुडून गेलेला आणि रात्रंदिवस राजकारणाशिवाय दुसरा विचार न करणारा मुख्यमंत्री दुसरा नाही. त्यांनी आपले कुटुंब, पत्नी आणि प्रापंचिक जबाबदाऱ्यांचीही हेळसांड केलेली असणार; परंतु त्यामुळे भाजपाला इतक्या कमी अवधीत सुगीचे दिवस पाहाता आले. भाजपा एक प्रमुख राजकीय शक्ती बनली. ज्यांनी आयुष्यात आमदारकीचे स्वप्न पाहिले नाही ते मंत्रीही बनले.
ज्यांनी ही किमया आपल्या अथक परिश्रम, जीव तोडून केलेले काम, अफाट बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि पराकोटीची सचोटी तसेच राजकीय नैपुण्य या जोरावर केली ते आज आत्यंतिक यातनांमध्ये आहेत, याची जाणीव सर्वाना आहे. जीवन-मरणाची ही एक निकराची झुंज आहे. ज्याने राजकारणात कधी हार मानली नाही आणि पराभव हा क्षणिक असतो, असे हा लढवय्या मानीत आला, त्याला मृत्यूला शरण जावे लागेल का, हाच तो अवघड प्रश्न आहे. तसे घडले तर ती केवळ एका पर्रीकरांची नव्हे तर एका काळाची अखेर ठरणार आहे.
पर्रीकरांचे ढासळणारे आरोग्य हा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या चाहत्यांना, कार्यकर्त्यांना खूप मोठा धक्का आहे. त्या दृष्टीने हा राजकारणात, समाजकारणात वावरणाऱ्यांना एक धडाच आहे. जनतेचे प्रेम तुम्ही असे गृहीत धरू शकत नाही. आम्हाला माहीत आहे, पर्रीकरांना काही झाले तर त्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख खूप मोठे राहणार आहे; कारण मुले लहान असताना त्यांची पत्नी मेधा त्यांना सोडून गेली. पर्रीकरांनी राजकारण एके राजकारण केले, तरी मुले स्वतंत्रपणे उभी राहिली आणि आज ती आपापल्या पायावर उभी आहेत. ती संसाराला लागली आहेत; परंतु सार्वजनिक व्यक्ती म्हणून अनेक चाहते विशेषत: कार्यकर्ते पर्रीकरांना धरून राहून राजकारणात आले. त्यांचे राजकीय जीवन सैरभैर बनेल. या तरुणांनाही दोष देता येणार नाही.
पर्रीकर राजकारणात एका सुखद झुळकेसारखे आले होते. ते उच्च शिक्षित होते. प्रामाणिक, सचोटी ही त्यांची बलस्थाने होती. महत्त्वाचे म्हणजे 1994 मध्ये पर्रीकर पहिल्यांदा जिंकून आल्यावर भाजपाने मागे वळून पाहिलेच नाही. पर्रीकरांनी स्वत:ची अशी प्रतिमा बनविली की केवळ पणजीतील आमदार नव्हे तर अनेक मतदारसंघांमध्ये, ख्रिस्ती प्राबल्याच्या भागांमध्येही त्यांना चाहता वर्ग लाभला. त्याची परिणती म्हणजे २०१२ मध्ये त्यांना अत्यंत स्पष्ट बहुमत देताना ख्रिस्ती चर्चनेही त्यांची पाठराखण केली.
याचा अर्थ पर्रीकर आले आणि त्यांनी जिंकले, असे घडले नव्हते. सुरुवातीला किमान १० वर्षे ते राजकारणात धडपडत होते. ते काही निवडणुका हरले व त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली होती; परंतु पर्रीकरांना काँग्रेसनेच आपली अकार्यक्षमता व भ्रष्टाचार यामुळे आयती संधी प्राप्त करून दिली. 1994 मध्ये लोक काँग्रेस पक्षाला कंटाळले होते व देशात हिंदुत्वाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. पर्रीकर संघातून आले होते आणि संघाबद्दल जनमानसात एक चांगली प्रतिमा होती; परंतु बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता हे नेत्यामध्ये अभावानेच दिसणारे गुण पर्रीकरांकडे आहेत. त्यांनी अर्थसंकल्प मांडले ते कल्पक आणि जनतेला चकित, खुश करणारे होते. त्यांनी विकासकामेही भरपूर केली. या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतही त्यांनी पूल आणि हमरस्त्याची कामे केंद्रीय मदतीने करून विकासाचा धडाका लावला, हे कोणाला नाकारता येणार नाही. तसे पाहिले तर पर्रीकर यांना लोकशाहीचे भोक्ते म्हणता येणार नाही. ते हुकूमशहाच आहेत. पक्षात त्यांनी लोकशाही राबविली नाही. होयबा पुढे आणले; विधानसभेत कोणाला बोलू दिले नाही; परंतु जनता कोणा एकावर फिदा झाली की अपाली सद्सद्विवेकबुद्धी गमावून बसते. एखाद्याला निष्ठा आणि प्रेमाच्या वर्षावाने भिजवून टाकते. पर्रीकरांनीही २०११ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुरुवात खूप दमदार केली. त्यांनी प्रशासनावर संपूर्ण नियंत्रण ठेवले. चुकार व भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वठणीवर आणले. संपूर्णत: धाक निर्माण केला. त्यांनी विरोधी काँग्रेस पक्षातील भ्रष्ट नेत्यांवर जरब बसविली. जुवारकरांसारख्यांना वेसण घातली. बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. त्यामुळे त्यांचे सरकार कोसळले असेल; परंतु जनतेच्या मनात त्यांनी जे घर निर्माण केले ते हल्लीपर्यंत टिकविले.
हल्लीपर्यंत म्हणण्याचे कारण पर्रीकरांना दिल्लीला जावे लागल्यानंतर ते गोव्यात हस्तक्षेप करू लागले. त्यांनी खाणप्रश्नी केलेली तडजोड खाणपट्टय़ात त्यांना जादा आमदार मिळवून देऊ शकली असेल; परंतु खाणचालकांशी त्यांनी जुळवून घेतले असल्याची जनतेची भावना बनली. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी जनमत नसतानाही संरक्षणमंत्रीपद सोडून देऊन गोव्यात परतणे आणि मुख्यमंत्रीपद मिळविणे; त्यांना खूपच महागात पडले. ते ‘आजारी’ असतानाही मुख्यमंत्रीपदाला चिकटून राहाणे, आपल्याकडच्या 26 खात्यांचे वाटप न करणे हासुद्धा लोकांच्या चेष्टेचा विषय बनलाय. वास्तविक आजाराचा अंदाज आल्याबरोबर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असता तर ते संयुक्तिक ठरले असते; परंतु पक्षात नेतृत्वाची असलेली वानवा हा त्यांचाही चिंतेचा विषय ठरला. नवे नेतृत्व तयार करण्यात त्यांना आलेले अपयश; शेवटी त्यांच्याच प्रतिमेला गालबोट लावून गेले! पर्रीकरांच्या प्रतिमेवर सध्या कधी नव्हे तेवढा परिणाम झालाय.
पक्षाला पुढे घेऊन जाणारे नव्या दमाचे नेतृत्व हा भाजपाचा नेहमीच प्रश्न राहिला आहे. आज केंद्रातही ‘एक’ नरेंद्र मोदी आहेत. गोव्यात त्यांना नवे नेतृत्व तयार करता आलेले नाही आणि या पक्षाची गेली 25 वर्षे धुरा सांभाळणाऱ्या पर्रीकरांवर हा दोष खात्रीने येणार आहे. मधल्या काळात नेतृत्वाची ही उणीव भरून काढण्यासाठी रवी नाईक व रमाकांत खलप यांना पक्षात घेण्याचाही प्रयोग करण्यात आला. वर्षभरापूर्वी मगोपला भाजपात विलीन करून घेण्याचाही प्रयत्न झाला.
पर्रीकरांच्या स्वभावात एककल्लीपणा आहे, लोकशाहीही फारशी त्यांच्या पचनी पडत नाही. परिणामी पक्षात अनेक विषयांत सर्वसमावेशकता त्यांना निर्माण करता आलेली नाही. त्यांच्या आमदारांमध्ये एक-दोन ख्रिस्ती नेते सोडले तर नेतृत्वात धमक नाही. आणि पक्षाच्या गाभा समितीतही होयबांचीच वर्णी लावण्यात आली आहे. सतीश धोंड सारख्या चिवट, जिगरबाज, धडाकेबाज संघटकाला येथे कोणी सामावून घेऊ शकले नाही. श्रीपाद नाईक यांचे नाव नेतृत्व बदलाचा प्रश्न येतो तेव्हा नेहमी पुढे केले जाते; परंतु भाजपा सोडून जातीय समीकरणातून समाज माध्यमांमध्येच हा उदो उदो होतो. भाजपात जे श्रीपाद नाईक यांना जवळून ओळखतात, ते हे धाडस करीत नाहीत; कारण श्रीपाद नाईक यांचे गेल्या ३० वर्षातील राजकीय कर्तृत्व फारसे दिलासाजनक नाही. केवळ प्रामाणिकपणा या तत्त्वावर त्यांनी इतकी वर्षे तड गाठली.
या पार्श्वभूमीवर तडजोड करून भाजपाला राज्यात पुढची दोन वर्षे दिवस काढावे लागतील. पक्षाशी मिळते-जुळते घेणाऱ्या नेत्यांना जे मधल्या काळात सोडून गेले त्यांना परत आणावे लागेल. त्यात दिगंबर कामत, बाबू आजगावकर व त्या प्रकृतीचे अनेक नेते आहेत. पर्रीकर वगळले तर कामत यांना वैयक्तिक विरोध करणारा भाजपात आता कोणी नाही. मगोप व गोवा फॉरवर्ड यांनाही चुचकारून पक्षात आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणे शक्य आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, पर्रीकरांवर विसंबून राजकारण केल्यामुळे गोवा फॉरवर्ड आपली स्वत:ची जिगर हरवून बसला आहे; परंतु भाजपाच्या तेरा सदस्यांमध्ये असलेले सात ख्रिस्ती सदस्य ही या पक्षाची व विजय सरदेसाई यांचीही जमेची बाजू आहे. त्यांना घेऊन पुढची दोन वर्षे पूर्ण करणे व त्यानंतर जिंकून येऊ शकणा-या इतर पक्षातील किमान १० जणांना भाजपात आणून नवीन राजकारणाची कास धरण्याचा प्रयत्न भाजपाला करावा लागेल.
संपूर्णत: नवे होतकरू, उत्साही राजकीय तरुण पक्षात आणून नवी राजनीती तयार करण्यास योग्य संधी आणि वातावरणही आता नाही. वास्तवात संघामधून कार्यकर्ते पक्षात यायला हवेत; परंतु गोव्यात संघ वेलिंगकरांनी अपहृत केला आणि हल्लीच्या वर्षात संघामधून जिगरबाज तरुण पक्षात येण्याची प्रक्रियाही थांबली आहे. याचे कारण संघात राजकीय शिक्षण खूप थोडे दिले जाऊ लागले आणि तशी हेतुपुरस्सर फळी तयार करण्याची प्रक्रियाच बंद पडली. ज्या पद्धतीचे हिंदुत्वाचे धडे देशात दिले जातात ते सौहार्द, सहमती, सहचर यांचा बळीच घेतात! याच संघ विचारांच्या मुशीतून वाजपेयी घडले होते. मनोहर पर्रीकर हेसुद्धा त्याच प्रवृत्तीतून निर्माण झाले; परंतु वाजपेयी यांनी कधी द्वेषाचे राजकारण केले नाही. नरसिंहराव यांच्यानंतर वाजपेयींनी आर्थिक उदारीकरणाचे धोरण पुढे नेले. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. काश्मीर प्रश्नावर आणखी एक पाऊल पुढे टाकले. मानवतावाद, लोकशाही आणि तेथील सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचा आदर ही त्रिसूत्री त्यांनी अवलंबिली. गोव्यात ख्रिस्ती समाजाला निकट जाण्याचे प्रयत्न पर्रीकरांनी केले. असे नेते संघातून येण्याची प्रक्रिया कधीच बंद पडली आहे.
आज तरी पर्रीकरांनी भाजपाचा हा तंबू एकहाती पेलला आहे. त्यादृष्टीने पाहिले तर पर्रीकरांशिवाय पुढची निवडणूकच काय, भविष्यातील एकूणच राजकारणच भयाण काळोखी पोकळी बनली आहे, असे नेत्यांना वाटले तर त्यांना दोष देता येणार नाही. पर्रीकरांसारखे नेते अभावानेच तयार होतात आणि ते प्रचंड मोठी पोकळीही निर्माण करून जातात यात तथ्य आहे!
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)