गोंधळी गुरुजींचा धडा वगळा!
By सुधीर लंके | Published: September 14, 2018 11:58 AM2018-09-14T11:58:42+5:302018-09-14T12:14:01+5:30
रविवारी नगरच्या प्राथमिक शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा आहे. ही सभा शांततेत होणार की नेहमीप्रमाणे गोंधळ होणार? याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे.
रविवारी नगरच्या प्राथमिक शिक्षकबँकेची सर्वसाधारण सभा आहे. ही सभा शांततेत होणार की नेहमीप्रमाणे गोंधळ होणार? याची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. शिक्षकांच्या सभेबाबत असा प्रश्नच निर्माण व्हायला नको. पण, दुर्दैवाने तो होतो आहे. राजकारणाचा अड्डा असणारे साखर कारखाने, जिल्हा सहकारी बँकांच्या सभा खेळीमेळीत व शिक्षकांच्या सभेत ‘धिंगाणा’ असा विचित्रच गोंधळ आहे. या गोंधळी गुरुजींचा धडा वगळायचा कसा? हा चिंतेचा व चिंतनाचाही विषय आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बँका आणि तेथे चालणारे राजकारण हा विषय आता मंत्रिमंडळानेच आपल्या अजेंड्यावर घेण्याची वेळ आली आहे, इतका तो बिकट बनत चालला आहे. या बँकांच्या आडून शिक्षकांचे जे राजकारण सुरु आहे ते किळसवाणे व शिक्षणक्षेत्र नासविणारे आहे. राज्याला मागे नेणारे आहे. परवा सांगलीच्या शिक्षक बँकेच्या सभेत शिक्षक नेते एकमेकांच्या अंगावर तुटून पडल्याचे छायाचित्र राज्यात झळकले. नगरच्या बँकेचाही असा गोंधळ घालण्यात हातखंडा आहे. शिक्षक गोंधळ घालतात म्हणून नगरच्या जिल्हा सहकारी बँकेने आपले सभागृह या सभांसाठी देणे बंद केले. गतवर्षी नगरला अनेक शिक्षक नशेत तर्र्रर्र होऊन सभेत आले होते. मद्यपान करुन त्यांनी सभेत गोंधळ घातला. प्रकरण पोलिसात गेले. जेव्हा गुन्हे दाखल होण्याची वेळ आली तेव्हा मात्र या गोंधळी गुरुजींनी शेपूट घालून दयेची याचना सुरु केली.
अगोदर नोकरी व फावल्या वेळेत शिक्षक बँकेचे राजकारण असा शिक्षक नेत्यांचा प्राधान्यक्रम असायला हवा. पण, अनेकांनी तो उलटा केला आहे. पूर्णवेळ शिक्षकांचे राजकारण व जमेल तेव्हा शाळा, असा काही लोकांचा ‘पोटभरु धंदा’ झाला आहे. पोलिसांना संघटना काढण्यास बंदी आहे. लोकशाहीने तो हक्क शिक्षकांना दिला, पण त्याचा असा गैरफायदा घेतला जात आहे. संघटना ही शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. शिक्षकांची प्रतिमा मलीन करण्यासाठी नाही, या मूलभूत तत्वाचाच अनेक शिक्षक नेत्यांना विसर पडला आहे.
असे करणारे शिक्षक फार नाहीत. ते बोटावर मोजण्याइतकेच आहेत. सुदैवाने सज्जन शिक्षकांची संख्या तुलनेने अधिक आहे. मात्र, सज्जन गप्प आहेत म्हणून या प्रवृत्तींचे फावते आहे. दुर्र्दैवाने त्यात हकनाक सर्वच शिक्षकांची प्रतिमा मलीन होते. जिल्हा परिषदाच्या शाळांचे महत्त्व अपार आहे. या शाळा म्हणजे ‘गरिबांचे स्कूल’ आहे. अनेक धनवान पालकही आता खासगी शाळांची महागडी चव चाखून पुन्हा जिल्हा परिषदांच्या शाळांकडे वळू लागले आहेत. खासगी शाळांनाही मागे टाकतील अशा दर्जाच्या शाळा जिल्हा परिषदांकडे आहेत. अनेक शिक्षकांचे चांगले उपक्रम सुरु आहेत. पण, या मूळ कामावर बँकेच्या ‘गोंधळी’ सभा बोळा फिरवतात. आदर्श शाळांची चर्चा होण्याऐवजी गोंधळी शिक्षकांची चर्चा अधिक रंगते.
नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक येत्या १९ सप्टेंबरला शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. बँकेचे हे शताब्दी वर्ष आहे. या बँकेचे दहा हजार सभासद आहेत. ७६७ कोटीच्या ठेवी आणि ५९५ कोटींचे कर्जवाटप, असा मोठा पसारा आहे. या बँकेला मोठी परंपरा आहे. रात्री बँकेच्या बैठका घ्यायच्या व दिवसा शाळा करायची, अशी शिस्त एकेकाळी या बँकेतील शिक्षक नेत्यांनी पाळली. काही शिक्षक नेते तर हॉटेलांत जेवण देखील घेत नव्हते. पूर्वी या बँकेच्या बैठकांना जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित राहत होते. त्यावेळी बैठकीत सखोल चर्चा होई, हिशेब घेतला जाई, पण कुणी गोंधळ घालत नसे. चर्चा व उत्तर असे बैठकांचे स्वरुप हवे.
यावर्षीची सभा शांततेत घेण्यासाठी बँकेच्या अध्यक्षांनी गुरुवारी सर्व नेत्यांची बैठक बोलावली होती. पण, नेतेमंडळी न आल्याने बैठक झाली नाही. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याची राजकीय परंपरा विनाकारण येथेही अशी येऊ लागली आहे. बँकेचे अध्यक्ष व सर्वच संघटनांच्या प्रमुखांनी आपापल्या संघटनेत काही आचारसंहिता ठरवायला हवी. जे शिक्षक गोंधळ घालतील त्यांना संघटनेत ठेवायचे की नाही? याचाच विचार व्हायला हवा. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व शिक्षण समिती यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही सर्व शिक्षक संघटनांना सभेपूर्वीच आचारसंहितेचे भान द्यायला हवे. जिल्हा परिषद कर्मचारी (शिस्त व अपील) नियम समजावून सांगायला हवा. शिक्षकांना दुखवायला राजकारणी सहसा तयार नसतात. पण, गोंधळी गुरुजींचा धडा पाठ्यक्रमात येणे शिक्षण क्षेत्राला परवडणारे नाही. म्हणून जिल्हा परिषद प्रशासन व शासन या दोघांनीही आता कठोर होण्याची वेळ आली आहे.
(लेखक ‘लोकमत’ अहमदनगरचे आवृत्तीप्रमुख आहेत)