CoronaVirus News : स्वनियमन टाळून स्वयंस्फूर्त बंद...

By किरण अग्रवाल | Published: June 25, 2020 08:12 AM2020-06-25T08:12:33+5:302020-06-25T08:19:42+5:30

सावधानता बाळगून व खबरदारी घेत या आपत्तीला सामोरे जाण्याऐवजी स्वयंस्फूर्ततेच्या नावाखाली बंद पुकारले जात आहेत.

editorial view on Spontaneous shutdown avoiding self-regulation over corona virus | CoronaVirus News : स्वनियमन टाळून स्वयंस्फूर्त बंद...

CoronaVirus News : स्वनियमन टाळून स्वयंस्फूर्त बंद...

Next

किरण अग्रवाल

संकटाला तोंड देण्यापेक्षा त्यापासून दूर पळणे हे सहज सोपे असते; परंतु ते तोंड लपवण्यासारखेही ठरते. कोरोनाच्या बाबतीत काही ठिकाणी आता तेच होताना दिसत आहे. सावधानता बाळगून व खबरदारी घेत या आपत्तीला सामोरे जाण्याऐवजी स्वयंस्फूर्ततेच्या नावाखाली बंद पुकारले जात आहेत. जागोजागची राजकीय मंडळी त्यासाठी पुढे सरसावलेली दिसत आहे, त्यामुळे सामान्यांचे जनजीवन पुन्हा अडचणीत येण्याची भीती व्यक्त होणे साधार ठरून गेले आहे.

कोरोनाचा कहर जागतिक पातळीवरच सुरू असल्याने आपण त्यात अपवाद ठरू नये. आपल्याकडेही म्हणजे भारतात कोरोनाबाधितांची संख्या सुमारे साडेचार लाखांवर पोहोचली आहे, अर्थात भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ५६.३८ टक्के झाले आहे. शिवाय आतापर्यंत देशात ७० लाखांहून अधिक नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, पुढच्या काही दिवसात या तपासण्यांची संख्या प्रतिदिनी दोन लाखांपर्यंत नेण्याची शासनाची तयारी सुरू आहे, त्यामुळे जसजशा तपासण्या वाढतील त्याआधारे रुग्णांचे ट्रेसिंग होऊन या आपत्तीवर नियंत्रण मिळवणे सुलभ होणार आहे. आपल्या राज्याबद्दल बोलायचे तर जगात महाराष्ट्र १७व्या स्थानी आहे ही गंभीरच बाब आहे. महाराष्ट्रात बाधितांचा आकडा एक लाख ३५ हजारांच्या पुढे गेला असून, सहा हजारपेक्षा अधिक बळी कोरोनाने घेतले आहेत. बाधित व बळी या दोघांच्याही आकड्याच्या बाबतीत महाराष्ट्र चीन, दक्षिण आफ्रिका, स्वीडन, बांगलादेश यांसारख्या काही देशांपेक्षा पुढे आहे, शिवाय राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर व नाशिक यासारख्या महानगरांमधील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे त्यामुळे चिंता वाटणे स्वाभाविक आहे. परंतु ७० हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचीही वस्तुस्थिती आहे. बरे, कोरोना हा काही जा म्हणता जाणारा नाही, तेव्हा घाबरून उपयोगाचे नाही तर सावधानता बाळगणे गरजेचे आहे. समाधानाची बाब म्हणजे अनेक ठिकाणी आता स्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढतच आहे तेथे स्थानिक नागरिकांकडूनच आता स्वयंस्फूर्तीने बंद पुकारले जाण्याचे प्रकार सुरू झाल्याने काही बाबतीत अडचणींना सामोरे जाणे क्रमप्राप्त ठरत आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या सोबतच यापुढील आयुष्याची किंवा जगण्याची सवय लावून घ्यावी लागणार आहे याबाबत विविध पातळ्यांवर अनेकांनी स्पष्टता केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेला आत्मनिर्भरतेचा संदेश दिला आहे. प्रारंभीच्या काळात गरजेचा भाग म्हणून देशभर लॉकडाऊन केले गेले होते. या अडीच-तीन महिन्याच्या कालावधीत अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. विशेषत: उद्योग-व्यवसाय पूर्णत: उन्मळून पडल्यागत झाले. सामान्यांची तर खूपच दैना झाली. हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे जे स्थलांतर घडून आले व त्यातून त्यांना ज्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले तेही संपूर्ण देशाने पाहिले; तेव्हा आता हळूहळू कुठे पूर्वपदावर येऊ लागलेली व्यवस्था व सावरू पाहात असलेल्या बाजारपेठा पुन्हा लॉकडाऊन करणे हे खचितच योग्य ठरणार नाही, परंतु शासन पुन्हा लॉकडाऊन करत नाही म्हणून जागोजागचे स्थानिक पुढारी पुढाकार घेऊन आपापला परिसर व गावे बंद करून त्याला स्वयंस्फूर्ततेचे नाव देण्याचा प्रकार करू लागल्याने सामान्य व विशेषत: मजूर वर्गाचे हाल होणे व त्यांनी घाबरून जाणे स्वाभाविक ठरले आहे. काही कालावधीसाठी बंद होणाºया या परिसरातील दुकानांवर पुन्हा रांगा लागणे, गर्दी उसळणे व त्यातून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याचे प्रकार घडू लागल्याने धोका कमी होण्याऐवजी तो वाढण्याचीच शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे, बंद हा काही कोरोनावरील कायमस्वरूपीचा उपाय नाही. परंतु गाव व गल्लीतील पुढारी आता आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी गाव व परिसर बंदचे प्रकार करू लागले आहेत. यात सामान्यांची अडचण होताना दिसत आहे, शिवाय गेल्या तीन महिन्यांपासून जे छोटे-मोठे व्यवसाय पूर्णत: उद्ध्वस्त झाले होते ते पूर्ववत सुरू होऊ पाहत असताना पुन्हा त्यांना हात धरून बसण्याची वेळ आली आहे. बंद करण्यापेक्षा सावधानता बाळगणे किंवा काळजी घेण्यासंबंधी आग्रह धरणे तसेच स्वनियमन गरजेचे आहे; पण येथे राजकारण डोकावताना दिसते. एरवी लॉकडाऊनच्या काळात परागंदा राहिलेले व उपाशीपोटी झोपणाऱ्यांच्या तोंडी घास भरवताना न दिसलेले अनेकजण आता पुढारक्या करताना दिसत आहेत. अपघात होतो म्हटल्यावर सावधानता बाळगण्याचे सोडून वाहन चालवणेच सोडून देण्यासारखा हा प्रकार ठरावा. खरे तर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत उगाच फिरणाऱ्यांना व घोळकेबाजांना आता हटकले जात नाही, पोलीस यंत्रणा याबाबत हात वर करून वागत असल्याचे दिसते. जीवनावश्यक म्हणवणाऱ्या वस्तूंचा साठा करू नका म्हणून केवळ इशारे दिले जातात; परंतु कारवाई होताना दिसत नाही. मास्क न वापरणाऱ्यांवरही कारवाईचे इशारे दिले जातात, परंतु त्याचेही प्रमाण जुजबीच दिसते. अशा बाबतीत दखल घेतली जाणे गरजेचे आहे, परंतु त्याबाबत यंत्रणेला भाग न पाडता बंद पुकारण्याचे प्रकार वाढू लागले आहेत; त्यातून अर्थचक्राला धक्का देण्याबरोबरच अन्य समस्यांना आमंत्रण मिळून गेले तर आश्चर्य वाटायला नको.  

 

Web Title: editorial view on Spontaneous shutdown avoiding self-regulation over corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.