संपादकीय - थयथयाट करणारी यमुना संतापून सांगतेय, पुरे करा !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:17 AM2023-07-19T10:17:53+5:302023-07-19T10:18:26+5:30

दिल्लीत यमुना रौद्ररूप धारण करून सांगतेय, 'माझ्या पूरक्षेत्रातील राक्षसांना हटवा! मी म्हणजे कचरापेटी नव्हे! माझ्याशी नीट वागा, अन्यथा खैर नाही!"

Editorial - Yamuna is angry and says, "Enough!" politics on flood | संपादकीय - थयथयाट करणारी यमुना संतापून सांगतेय, पुरे करा !

संपादकीय - थयथयाट करणारी यमुना संतापून सांगतेय, पुरे करा !

googlenewsNext

योगेंद्र यादव

यावर्षी दिल्लीत आलेल्या महापुरात खरे म्हणजे विशेष असे काही नाही. जर असेलच तर ते इतकेच असेल की. यावेळी जेथे पूर आला तेथे टीव्हीचा कॅमेरा फिरतो आहे तिथेच सत्तेचे केंद्र आहे. त्यामुळे भारताच्या राजधानीची दुर्दशा सगळ्या देशाला दिसते आहे, ऐकू येते आहे.
देशात दरवर्षी पूर येतात. प्रत्येक वर्षी सरासरी सोळाशे लोक पुरामुळे मृत्यूची शिकार होतात. आसामातील मोठा भाग जलमय होतो. वित्त आणि पशुधनाचे नुकसान जीवित, वित्त होते. प्रत्येक वर्षी बिहारमध्ये लाखो हेक्टर जमिनीवर पुराचे पाणी जमा होते आणि महिनोन्महिने साचून राहते. त्या पुराची कोणी दखलही घेत नाही. या वर्षी तो थेट दिल्लीतच आल्यामुळे आपण पूर पाहण्यासाठी आपले डोळे उघडले आहेत. 
परिस्थिती किती भीषण आहे; ते आता आपल्याला उमगले आहे; तर मग आता आपण बुद्धीचे दरवाजे उघडणार काय? या पुरापासून आपण काही धडा घेणार काय? 

प्रत्येक पुराबरोबर आरोप, बहाणे, असत्य यांनाही पूर येत असतो, या वेळचा पूर दिल्लीत आला असल्याने आरोप-प्रत्यारोपांचे पाणीही लाल निशाणाच्या वरून वाहू लागले नसते तरच नवल हरयाणाने जाणूनबुजून हाथनीकुंड धरणातून जास्त पाणी सोडले काय? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दरवर्षीप्रमाणे पूरनियंत्रणासाठी बैठक घेतली नाही काय? दिल्ली सरकारने पाणी बाहेर काढण्याची यंत्रे सुस्थितीत ठेवण्याची काळजी घेतली नाही काय? एनडीआरएफ आणि सैन्याला बोलावण्यात उशीर झाला काय? प्रश्नांची फेर संपतच नाही. परस्परांवर दोषारोप करण्याची ही स्पर्धा पाहून वाटते की, या राजकीय लठ्ठालठ्ठीत पुरामुळे निर्माण झालेले मुख्य प्रश्नच वाहून जातील. पुन्हा एकदा आपण एका मोठ्या खोटेपणात वाहून जाऊ पूर केवळ नैसर्गिक आपत्ती आहे असे म्हणणे हा पुराशी जोडलेला पहिला मोठा खोटेपणा. सरकार नेहमीच पक्ष खोटेपणाचा आधार घेतो. पूर ही भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती नाही, पूर कमी होऊ शकतो. पुराचे वेळापत्रक असते, मार्गही असतो. अपवाद सोडला तर पूर केव्हा येईल हे सगळ्यांना माहीत असते; म्हणजे पूर येणे ही काही आपोआप, अचानक ओढवणारी दुर्घटना नाही. पुरामुळे होणारी जीवित-वित्त हानी नक्कीच टाळता येऊ शकते. 

दुसरे असत्य म्हणजे पूर पूर्णपणे मानवीय, तांत्रिक आणि प्रशासकीय मार्गांनी नियंत्रित करता येतो. निसर्गाला पूर्णपणे ताब्यात ठेवता येते, या आधुनिकतेच्या अहंकारामुळे देशात ठिकठिकाणी पूरनियंत्रण कार्यक्रम चालवले गेले, बंधारे बांधले गेले. पाण्यासारखा पैसा ओतला गेला. मात्र या अशा सरकारी प्रयत्नांतून हाती काहीच लागले नाही.बिहारमध्ये कोसी नदीला बंधारे घालून पाणी अडविण्याची योजना असफल झाली. पाऊस, अतिवृष्टी नदीमध्ये येणारे उधाण, नदीने किनारा सोडून वाहणे, या सगळ्या सामान्य नैसर्गिक घटना होत. आपल्याला ही काही पाण्याच्या प्रवाहाबरोबर जगणे शिकावे लागेल.

हिमांशू ठक्कर यांच्या 'साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल' या संस्थेने दिल्लीच्या पुराचे अधिक विश्लेषण केले आहे. हा अभ्यास सांगतो की, यमुनेला आलेल्या पुराचे प्रमुख कारण अचानक झालेला पाऊस नाही. सर्वाधिक पाऊस उत्तर प्रदेशमधील ज्या जिल्ह्यात झाला तिथले पाणी यमुनेत येत नाही. हथनीकुंड धरणातून सोडलेले पाणीही या पुराला जबाबदार नाही. दिल्लीत पाणी पोहोचण्याच्या आधी पाच नियंत्रण केंद्रे येतात. तेथे कोठेही यमुना धोक्याच्या निशाणावरून वाहत नव्हती. 

या अहवालानुसार पुराचे मुख्य कारण म्हणजे यमुनेच्या आसपास असलेल्या खुल्या प्रदेशावर, यमुनेच्या पूरक्षेत्रावर झालेला कब्जा दिल्लीत यमुनेच्या १७०० हेक्टर पूरक्षेत्रामध्ये एक हजार हेक्टरहून अधिक जमिनीवर पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून पक्क्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. राष्ट्रकुल खेलग्राम ६४ हेक्टर अक्षरधाम मंदिर १०० हेक्टर आणि मेट्रो डेपो- १०० हेक्टर याचा समावेश आहे. दिल्लीमध्ये यमुनेवर २६ पूल आणि तीन बंधारे बांधण्यात आले आहेत. या सगळ्यांमुळे दिल्लीपर्यंत पोहोचताना यमुनेच्या पाण्याला पसरण्यासाठी जागाच मिळाली नाही आणि पावसाच्या पाण्याचे सामान्य उधाण मानवी दुर्घटनेमध्ये रूपांतरित झाले.

शहरीकरणामुळे दिल्लीतील तलाव आणि जोहड नष्ट झाले आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. पावसाळी नाले आता घाण पाणी वाहून नेणारे नाले झाले आहेत आणि ही घाण यमुनेमध्ये सोडत असताना नदीचा तट उंच झाला आहे. या परिस्थितीत सामान्य पावसापेक्षा जास्त पाऊस झाला आणि सरकारी व्यवस्था कोलमडली त्यामुळे ही एक मोठी दुर्घटना घडली.

यमुना बचाव या अभियानामार्फत विजेंद्र कालिया गेल्या तीन दशकांपासून या धोक्याकडे वारंवार लक्ष वेधत आले आहेत. गांधीवादी कार्यकर्ते रमेशचंद शर्मा यांनी दिल्लीमधील या पुराकडे 'आपण घ्यावयाचा धडा' म्हणून बोट दाखवले. ते म्हणतात, 'यमुना रौद्ररूप धारण करून आपल्याला हे सांगते आहे की, तिचे पूरक्षेत्र तिला परत केले पाहिजे, या क्षेत्रात जे राक्षस येऊन उभे राहिले आहेत. त्यांना हटवले पाहिजे, आईला आईसारखे राहू या. तिची कचरापेटी करू नका. नदीचे पूरक्षेत्र मुक्त करा, नदी स्वातंत्र्य मागते आहे!"

नदी वाचली तर जीव वाचेल' हा संदेश ऐकला नाही तर आपल्याला फक्त पश्चात्ताप करत बसावे लागेल. आसाम आणि बिहारमधल्या पुरापासून आपण आजवर धडे घेतले नाहीत, दिल्लीचा पूर तरी आपले डोके ठिकाणावर आणेल का?

(लेखक अध्यक्ष, स्वराज इंडिया, सदस्य, जय किसान आंदोलन आहेत)

 

Web Title: Editorial - Yamuna is angry and says, "Enough!" politics on flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.