म्हराठीचा बोलु कवतिके ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 07:32 AM2018-08-03T07:32:34+5:302018-08-03T07:33:13+5:30
यंदाचा रेमॅन मॅगसेसे पुरस्कार घोषित झालेले लडाखमधील अभियंता सोनम वांगचुक यांचे मातृभाषेतून शिक्षणाविषयीचे कार्य या पुरस्काराच्या निमित्ताने देशभर पोहोचले.
- मिलिंद कुलकर्णी
यंदाचा रेमॅन मॅगसेसे पुरस्कार घोषित झालेले लडाखमधील अभियंता सोनम वांगचुक यांचे मातृभाषेतून शिक्षणाविषयीचे कार्य या पुरस्काराच्या निमित्ताने देशभर पोहोचले. शांतताप्रिय असलेल्या लडाखमध्ये शिक्षणव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला असताना वांगचुक यांनी ‘आॅपरेशन होप’ हे अभियान हाती घेतले. ९५ टक्के विद्यार्थ्यांवर नापासाचा शिक्का असण्याचे कारण म्हणजे मातृभाषेतून शिक्षण नसल्याने विद्यार्थ्यांना गोडी वाटत नसे. हे मूळ दुखणे हेरुन त्यांनी कार्य सुरु केले आणि त्याला चांगले फळ लाभले. हजारो विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. मॅगसेसे पुरस्काराने त्यांच्या या कार्याचा गौरव झाला आहे. प्रश्न असा आहे की, लडाखमधील जनतेला वांगचुक यांच्यासारखा धडपड्या सामाजिक कार्यकर्ता भेटला, तसा महाराष्ट्रातील आदिवासी, भटक्या विमुक्त जाती जमातींना कोणी भेटेल काय? आदिवासी समाज, भटक्यांची भाषा वेगळी आहे. त्यांना मराठीतून शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली. दिवसभर ही मुले त्यांच्या बोलीभाषेत मित्रांशी, नातेवाईकांशी बोलतात आणि शाळेच्या चार तासांमध्ये आम्ही त्याला प्रमाण मराठी भाषेचा डोस पाजत होतो. त्याचा पाया ठिसूळ राहणार आहे. त्याला संकल्पना स्पष्ट होणार नाही, पर्यायाने शिक्षणाची व्यवस्था आहे तोपर्यंत शिक्षण घेईल. आणि पुढे शिक्षण सोडेल. विद्यार्थी गळतीचे हेदेखील एक कारण आहे, याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
मुक्तार्इंनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा या फासेपारधींची वस्ती असलेल्या खेड्यांना नुकतीच भेट दिली. हलखेडा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. पहिली ते चौथीपर्यंत सुविधा असून पटसंख्या ८० आहे. तीन शिक्षक कार्यरत आहेत. एक किरकोळ रजेवर होते. दुसरे शिक्षक तिसऱ्याच शाळेवर काम करतायत. राहुल शिंदे नावाचे शिक्षक भेटले. त्यांनी मुलांची दोन वर्षातील प्रगती सांगितली. वाचता न येणारी मुले आता चांगले वाचतात, असे प्रात्यक्षिकासह दाखविले. मुलांचे अडखळणे, चेह-यावरील हरवलेपण खरे काय ते सांगत होतेच. शिक्षकांना विचारले, जंगलात जैवविविधता असताना त्यांना क कमळाचा आणि ब बदकाचा शिकविला जात आहे. क केळीचा आणि ब बेडकाचा...सांगितला तरी तो पटकन कळू शकेल, नाही का ? शिक्षक विभागाचे आदेश, असे म्हणून त्यांनी हतबलता दाखविली.
गावाच्या उपसरपंच बॅलेस्टिनबाई आणि त्यांचे पती शफी भोसले यांची भेट घेतली असता ते म्हणाले, आमची भाषा वेगळी आहे. आम्ही मूळ राजस्थानातील, त्यानंतर विदर्भात वाशिमजवळ आमची वस्ती होती. ३०-३५ वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यात आलो. या जोडप्याला ब-यापैकी मराठी आणि हिंदी बोलता येते. पण १६०० लोकवस्तीच्या गावातील इतरांना तेवढीही बोलता येत नाही. गळतीचे प्रमाण मोठे आहेच.
भाषिक तिढा गंभीर आहे. तिकडे भाषिक जनगणनेच्या आकडेवारीत मराठी चौथ्या क्रमांकावरुन तिस-या क्रमांकावर आल्याचा आनंद आम्ही साजरा करीत आहोत. पण ज्यांच्या भाषांमध्ये पुस्तके नाहीत, लिप्या नाहीत, ज्यांच्या भाषांच्या अस्तित्वाची खूण सहजासहजी आढळत नाही,अशा ५ टक्क्यांहून अधिक लोकांच्या भाषेकडे समाज व शासनाचे दुर्लक्ष होत आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची पावरी भाषा सुमारे ३ लाख २५ हजार ७७२ लोक बोलत असून जनगणनेत हिंदीचीच बोलीभाषा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. आदिवासी आणि भटक्यांच्या बोलीभाषांची अशी अवस्था झालेली आहे. त्याचे सोयरसुतक ना समाजाला ना शासनाला आहे.