सुशिक्षित तरुणांमध्ये नोकरी-उद्योगाची ‘लायकी’ नसते, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 08:02 AM2024-05-06T08:02:14+5:302024-05-06T08:02:27+5:30

अभ्यासक्रमाच्या रचनेपेक्षा शिकण्या-शिकवण्याची पद्धत महत्त्वाची. ती भविष्याचा वेध घेणारी, सातत्याने बदलाला सामोरे जाणारी हवी!

Educated youths do not have the qulification of jobs, because... | सुशिक्षित तरुणांमध्ये नोकरी-उद्योगाची ‘लायकी’ नसते, कारण...

सुशिक्षित तरुणांमध्ये नोकरी-उद्योगाची ‘लायकी’ नसते, कारण...

- डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चर्चेत आल्यापासून एक विषय सारखा चर्चेत असतो; आपले शाळा-कॉलेजातील अभ्यासक्रम कालबाह्य झाले आहेत. नोकरी देणारे उद्योजक तक्रार करतात की, आजचे पदवीधर आजच्या गरजांसाठी उपयुक्त नाहीत, कारण त्यांना नीट प्रशिक्षण मिळत नाही. आजकाल कॉलेज, विद्यापीठाचा दर्जा ठरवताना गुणवत्तेचा एक निकष किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली हा असतो.

यानिमित्ताने एक प्रश्न मांडावासा वाटतो : वेगाने बदलणाऱ्या विज्ञान, तंत्रज्ञानामुळे उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, कामाचे म्हणजे नोकरीचे स्वरूप आरपार बदलले आहे. सातत्याने बदलते आहे. त्या वेगाने सारखे अभ्यासक्रम बदलणे, परीक्षेचे स्वरूप बदलणे शक्य तरी आहे का? उद्योग क्षेत्राचा विस्तार, त्यातील वैविध्य लक्षात घेता अभ्यासक्रम नेमका कोणत्या उद्योगाला पूरक ठरवायचा? 
दुसरे असे की कोणती नोकरी स्वीकारायची, याचे पूर्ण स्वातंत्र्य विद्यार्थ्याला आहे. ते कॉलेज, विद्यापीठ ठरवत नाही. हल्ली असे लक्षात येते की, ९० टक्के विद्यार्थी त्यांना जे शिकवले गेले, त्याचा पुढील आयुष्यात मुळीच प्रत्यक्ष उपयोग करत नाहीत. आयआयटीतून केमिकल इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी संगणक क्षेत्रात काम करतो. मोठ्या कंपन्या उभारतो. अन् शेवटी हे सारे सोडून मराठीत मोठमोठे सुलभ ग्रंथ लिहितो! 
चेतन भगत मेकॅनिकल इंजिनिअर पण काम परदेशी बॅंकेत... नंतर चक्क कादंबरी, चित्रपट लेखन. आयआयटीचे काही विद्यार्थी तर चक्क आध्यात्मिक गुरू, संत झाले आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. कॉलेज सोडताच नोकरीत, व्यवहारात आपण जे काही ज्ञान, विज्ञान वापरतो ते सारे अभ्यासक्रमाबाहेरचे असते. मग उद्योगाच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम तयार करा हा आग्रह कशासाठी?

कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम सर्वंकष असावा लागतो. मूलभूत संकल्पना, त्याचे ॲप्लिकेशन, समस्यांचे आकलन, विश्लेषण, मिळून काम करण्याचे धोरण, नैतिक मूल्यांचे महत्त्व, स्वतंत्र तार्किक विचार करण्याची पद्धत, क्षमता हे सारे शिकवायचे असते. 


प्रत्येक प्रश्नाचे एकच ठोकळेबाज उत्तर या भ्रमातून बाहेर पडून, एकापेक्षा जास्त उत्तरांची संभाव्यता तपासायची असते. त्या अनेक उत्तरांतून सर्व दृष्टीने उत्तम, कमी खर्चिक, सोपे उत्तर कोणते हा शोध व्यवहारात जास्त महत्त्वाचा असतो. अभ्यासक्रम तयार करताना काय, किती, कसे, केव्हा शिकवायचे अन् शिकवले त्याचे उचित, योग्य मूल्यमापन कसे करायचे, यावर जास्त विचार व्हायला हवा. पूर्वी पाढे पाठ असण्याला महत्त्व होते. आता त्याची गरज नाही. समीकरणे सोडवायला संगणक आहेत. हव्या त्या माहितीसाठी इंटरनेट  आहे. आता फळ्यावर प्रमेये सिद्ध करून दाखविण्याची गरज नाही. जे पुस्तकात आहे तेच कशाला शिकवायचे? त्याऐवजी त्या प्रमेयामागची संकल्पना, त्याचा व्यवहारात उपयोग सोदाहरण समजावून सांगा. ते जास्त फायद्याचे. 

अभ्यासक्रम हा केवळ गाइडलाइन म्हणून वापरायचा असतो शिक्षकाने. तो अभ्यासक्रम किती रंजक, उपयोजित पद्धतीने शिकवायचा याचे पूर्ण स्वातंत्र्य शिक्षकाला असते. आपण ते वापरत नाही. आपले शिकवणे आगळेवेगळे आऊट ऑफ बॉक्स असावे, असा प्रयत्न प्रत्येक प्राध्यापकाने करायला हवा. अभ्यासक्रमाच्या रचनेपेक्षा शिकविण्याची-शिकण्याची  पद्धत जास्त महत्त्वाची. ती भविष्याचा वेध घेणारी, उद्याच्या गरजा ओळखून त्यानुसार सातत्याने बदलाला सामोरे जाणारी अशी हवी.

आपल्या प्रयोगशाळांतून जे विज्ञानाचे प्रयोग शिकवतात ते जुने, वापरण्यात येणारी यंत्रे जुनी... आता अनेक क्षेत्रांत ऑटोमेशन झाले आहे. मेडिकल क्षेत्रात आधुनिक दवाखान्यातील यंत्रणा पाहिली की, हे लक्षात येते. इंटरनेटमुळे सेवा क्षेत्र पूर्ण बदलले आहे. हे बदल शिकण्यात, शिकविण्यात म्हणजेच अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होणे गरजेचे आहे. आपल्याकडील अभ्यास मंडळे, विद्वत परिषदा, सिनेट या सर्वांचे या महत्त्वपूर्ण बाबींकडे पूर्ण दुर्लक्ष होते. याचे कारण या सर्व क्षेत्रांत प्रचंड प्रमाणात वैचारिक दारिद्र्य आहे. राजकीय घुसखोरी आहे. तिथला अजेंडा वेगळा, चुकीचा आहे. त्यामुळे ‘रोग एकीकडे, उपचार दुसरीकडे’ अशी अवस्था आहे.
विद्यापीठातील संशोधन, त्यातला भ्रष्टाचार, पीएच. डी.ची  निरर्थकता हादेखील  गंभीर अन् गांभीर्याने विचार करण्याचा मुद्दा आहे. पण... वो किस्सा फिर कभी!! सध्या अभ्यासक्रमाकडे बघण्याचा, तो नीटपणे अमलात आणण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तरी पुरे... 
    vijaympande@yahoo.com

Web Title: Educated youths do not have the qulification of jobs, because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.