शिक्षणमंत्र्यांना घरचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:05 AM2017-10-06T03:05:46+5:302017-10-06T03:06:29+5:30
मेकाले पद्धतीची शिक्षण प्रणाली सदोष असून ती सुशिक्षित तरुणांच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी
मेकाले पद्धतीची शिक्षण प्रणाली सदोष असून ती सुशिक्षित तरुणांच्या भवितव्यासाठी धोकादायक असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीकेचे आसूड ओढणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय महामंत्री आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत गडचिरोली येथील अभाविप कार्यकर्त्यांनी त्यांना परवा दाखविलेले काळे झेंडे म्हणजे तावडेंना घरचा अहेर होय. गोंडवाना विद्यापीठाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शहरात प्रवेश करताच विनोद तावडेंना अभाविप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राष्ट्रीय महामंत्री असताना विद्यापीठाच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेण्याचा आग्रह धरणारे अभाविपचे नेते विनोद तावडे यांना शिक्षण मंत्री होताच आपल्या मागणीचा विसर पडला. मागील तीन वर्षांपासून याबाबत नुसती घोषणा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. म्हणून की काय, अभाविपने खुद्द आपल्या माजी राष्ट्रीय महामंत्र्यालाच फैलावर घेतले. केवळ थापा मारून चालणार नाही तर कृतीसुध्दा करावी लागणार, या भाषेत शिक्षण मंत्र्यांना सुनावण्यात आले. जमत नसेल तर खुर्ची रिकामी करा, अशा घोषणा देण्याची वेळ या कार्यकर्त्यांवर का आली, याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. खरे तर राज्य सरकारमध्ये अभाविपचे दोन माजी राष्ट्रीय महामंत्री आहेत. तावडेंपूर्वी चंद्रकांतदादा पाटलांनी संघटनेची धुरा सांभाळली आहे. एव्हाना ‘सेव्ह कॅम्पस’, ‘छात्र शक्ती, राष्ट्र शक्ती’ सारख्या घोषणा देत शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मोठमोठी आंदोलने करणारे हेच नेते आज सरकारमध्ये आहेत. त्यामुळे अभाविपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण हीच नेतेमंडळी जर काँग्रेस पॅटर्नने वागू लागतील तर गडचिरोलीतील अभाविप कार्यकर्त्यांच्या आक्रोशाची धग राज्यातही पसरू शकते. विद्यार्थी दशेतच युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अभ्यासवर्ग घेणारी अभाविप आपल्या कार्यकर्त्याला दरी उचलण्यापासून उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचे प्रशिक्षण देते. त्याच्यातील संघटन क्षमता वाढविते. कार्यकर्ता हाच संटघनेचा आधारस्तंभ असल्याचा बौद्धिक डोजही पाजते. मात्र याच संघटनेतील काही नेते जेव्हा सत्ताधाºयांच्या फळीत जाऊन बसतात, तेव्हा त्यांना या नैतिकतेचा विसर पडत असेल तर असा उद्रेक होणारच. अहो, ज्यांच्या खांद्याला खांदा लावत आम्ही संघटनेसाठी झटलो, रात्रभर फिरून भिंती रंगविल्या, आंदोलने केली, प्रसंगी पोलिसाचा मार खाल्ला तेच नेते मंत्री झाल्याबरोबर ओळखत नाहीत, ही एका कार्यकर्त्याची बोलकी प्रतिक्रिया.