परंपरेत रुजलेली शिक्षण पद्धती स्वीकारायला हवी, तरच ‘विश्वगुरू’ स्थान पुन्हा मिळेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:33 AM2018-09-05T03:33:54+5:302018-09-05T03:34:08+5:30
आपल्या देशातील शिक्षकांनी आणि विचारवंतांनी जगातील सर्वश्रेष्ठ ज्ञान ग्रहण करून त्यातून आपल्या देशासाठी मार्ग निश्चित केला. त्यामुळे भारताला ‘विश्वगुरू’ हा दर्जा प्राप्त झाला.
- व्यंकय्या नायडू
(उपराष्ट्रपती)
उपराष्ट्रपती झाल्यापासून मी अनेक विद्यापीठांच्या दीक्षान्त समारंभांना संबोधित केले आहे. प्राचीन काळी भारतीय शिक्षणाचा दर्जा केवढ्या उंचीवर पोचला होता, याविषयी बोलताना आपल्या शिक्षणात उत्कृष्टतेची भावना रुजविण्यासाठी कोणते मार्ग स्वीकारायला हवेत, याबद्दल मी विचार मांडत होतो. आपले राष्ट्र हे युगानुयुगे परंपरेने शिक्षणाचे केंद्र राहिले आहे. गुरू-शिष्य यांच्यातील रचनात्मक संवादाचे दृश्य रूप आपल्याला उपनिषदात पाहावयास मिळते. आपल्या देशातील शिक्षकांनी आणि विचारवंतांनी जगातील सर्वश्रेष्ठ ज्ञान ग्रहण करून त्यातून आपल्या देशासाठी मार्ग निश्चित केला. त्यामुळे भारताला ‘विश्वगुरू’ हा दर्जा प्राप्त झाला.
‘भारताने आम्हाला असे ज्ञान दिले, ज्यामुळे जगात आम्ही वैज्ञानिक संशोधन करू शकलो,’ असे उद्गार भौतिकशास्त्रज्ञ हा अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी काढले, त्याला हेच कारण आहे. सुप्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक मार्क टष्ट्वेन यांनी भारताचे वर्णन ‘मानव वंशाची कूस, मानवी संभाषणाचे जन्मस्थान, इतिहासाची माता आणि परंपरांची खापरपणजी,’ असे केले आहे.
प्राचीन भारतात तक्षशिला, नालंदा आणि पुष्पगिरीसारखी शिक्षणाची केंद्रे होती, जेथे जगातील तत्त्ववेत्ते शिक्षण घेण्यासाठी येत होते. तेथे वेदांशिवाय कृषी, तत्त्वज्ञान, गणित, युद्धशास्त्र, शल्यक्रिया, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, संगीत, नृत्य आदी विषय शिकविले जायचे. सातव्या शतकात झुआनझांग हे चीनी विचारवंत अनेक बौद्ध अभ्यासकांसह नालंदा येथे शिक्षण घेत होते. येथून परत जाताना त्यांनी संस्कृतातील ६५७ हस्तलिखिते आपल्यासोबत नेली. तेथील राजाच्या सहकार्याने त्याने त्या हस्तलिखितांच्या अनुवादासाठी एका संस्थेची निर्मिती केली, तर तक्षशिला येथील केंद्रातून अर्थशास्त्राचे जनक चाणक्य आणि आयुर्वेदाचे निर्माते चरक यांनी शिक्षण घेतले होते.
भारताने शून्याचा शोध लावला, तसेच दशमान पद्धतीही विकसित केली. धातू शास्त्रात भारताने केलेल्या प्रगतीमुळे येथील समाजाची महानता दिसून येते. जॉन डाल्टन याने अणूचा शोध लावण्यापूर्वी कितीतरी शतके अगोदर भारतातील कणाद ऋषींनी ‘अणू’चा शोध घेतला होता. सुश्रुत यांना प्लास्टिक शस्त्रक्रियेचे जनक म्हणून ओळखले जाते.
जगात जे जे चांगले आहे, त्याचा स्वीकार भारताने केला आहे. आनो भद्र: कुण्वन्तु विश्वत: (उदात्त विचार सर्व दिशेने आपल्याकडे येवोत), असे ऋग्वेदाने म्हटले आहे. विचारांच्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीमागे अन्य विचार स्वीकारून ते आपल्यात जिरवून ते स्वीकारण्याचे तत्त्व दडलेले आहे. तेव्हा कोणताही विचार आंधळेपणाने न स्वीकारता, नवीन विचारांची पृष्ठभूमी निर्माण करण्याची गरज आहे. भारतीय शिक्षणाचे पाश्चात्तीकरण झाल्यामुळे भारताच्या मूलभूत विचारापासून आपण वंचित राहिलो आहोत, असे मत प्रा. कोेनेस रामकृष्णराव यांनी व्यक्त केले आहे. पाश्चात्त्यांचे ते सर्व चांगले या मनोभूमिकेतून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्या वैचारिक परंपरांचे सखोल अध्ययन केले पाहिजे व त्यातून आपल्या शिक्षण पद्धतीत नवे चैतन्य आणले पाहिजे.
शिक्षण ही शिकण्याची दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. मुलांना चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी ते मातृभाषेतूनच शिकवायला हवे. मूल्याधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. आपल्या परंपरांशी न जुळणाऱ्या शैक्षणिक मॉडेलचे अंधानुकरण करणे योग्य ठरणार नाही.
‘सा विद्या या विपुच्यते’ ही आपली शिकवण आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी विद्येच्या पुनरुज्जीवनाचा विचार मांडताना ‘मन हे भयमुक्त असावे आणि मस्तक उंच असावे,’ असे म्हटले होते. त्यासाठी वसाहतवादी मानसिकतेचा त्याग करायला हवा, तरच आपली बौद्धिकदृष्ट्या मुक्तता होऊ शकेल. ‘जुने ते सर्व चांगलेच असते असे नाही, तसेच जे जे आधुनिक ते ते टाकाऊ असेही समजण्याचे कारण नाही. मूर्ख माणसे इतरांच्या विचारांचे अंधानुकरण करतात, तर शहाणे सर्व विचारांचा विचार करून निष्कर्ष काढीत असतात,’ असे विचार महान संस्कृत कवी कालिदास यांनी व्यक्त केले आहेत, ते समजून घ्यायला हवे. प्राचीन वाङ्मयात असे अनेक प्रेरणादायी विचार पाहावयास मिळतात. आपण आपल्या जुन्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून योग्य तो बोध घेतला पाहिजे. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास धरा, आपल्यात सुधारणा करीत राहा. जे शिकाल, त्याचा वापर करा आणि आपले ज्ञान इतरांना देत राहा. आपल्या पूर्वजांचा आदर करा. आपले माता-पिता, शिक्षक यांना परमेश्वर स्वरूप माना. चांगले काय, वाईट काय यांचा विचार करून योग्य आहे तेच स्वीकारा. आपल्या शिक्षण संस्थांचे रूपांतर ज्ञानाची केंद्रे असे व्हायला हवे. आपल्या परंपरेत रुजलेली शिक्षण पद्धती आपण स्वीकारायला हवी, तरच आपण ‘विश्वगुरू’ हे स्थान पुन्हा मिळवू शकू.