महाराष्ट्रातील शिक्षणाचा आधारवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 06:37 AM2018-09-19T06:37:09+5:302018-09-19T06:39:46+5:30

दहा वर्षांच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले.

educationalist v v chiplunkar demise has left void in maharashtras education sector | महाराष्ट्रातील शिक्षणाचा आधारवड

महाराष्ट्रातील शिक्षणाचा आधारवड

googlenewsNext

- हेरंब कुलकर्णी

माजी पंतप्रधान नरसिंहराव आणि राज्यातील अनेक माजी मुख्यमंत्री ज्यांना आदर देत होते, असा एक शिक्षक या महाराष्ट्रात होता. शिक्षक हृदयाचा अधिकारी. महाराष्ट्रातील आज गती घेतलेल्या शिक्षणाला ज्यांनी वळण दिले, त्यातील प्रमुख नाव सरांचे आहे. अनेकांना संचालक म्हणजे वि. वि. चिपळूणकर असेच आजही वाटते. त्या काळात आजच्यासारखे प्रत्येक विभागाला संचालक नव्हते, सचिवमहात्म्य इतके वाढले नव्हते. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांखालोखाल शिक्षण संचालकच सर्व निर्णय घेत. आज अधिकारी सामान्य शिक्षक विद्यार्थ्यांना माहीत नाहीत, कारण भेटी खूप कमी होतात. सर त्या काळात दुर्गम असलेल्या महाराष्ट्रात गावोगाव फिरले. अनेक खेड्यांत रात्री मुक्काम केला. रात्री पारावर पालकसभा घेऊन शिक्षणाचे महत्त्व निरक्षर पालकांना समजावून सांगितले. ही तळमळ होती. डहाणू तालुक्यातील ग्राममंगल संस्थेने काढलेल्या बालवाड्या बघायला डोक्यावर टॉवेल गुंडाळून ते पानसे सरांसोबत पायी डोंगरात फिरले. हा माणूस अधिकारी होता की, समाजसेवक असा प्रश्न पडतो.
दहा वर्षांच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरले. ग्रामीण भागातील गुणवत्ता शोधणारी विद्यानिकेतन त्यांनी मधुकरराव चौधरीसोबत स्थापन केली. त्यातील बुद्धिमान मुले ही त्या घरातली शिकणारी पहिली पिढी होती. त्यातून शिकलेली मुले पुढे जीवनाच्या किती क्षेत्रात पुढे आली, हा खरेच सर्वेक्षण करण्याचा कौतुकाचा विषय आहे. विद्यानिकेतनच्या धर्तीवर जवाहर नवोदय योजना ही नंतर खूप वर्षांनी आली हे या योजनेचे द्रष्टेपण होते.
‘वंचितांचे शिक्षण’ हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. जे. पी. नाईक यांनी शाळाबाह्य मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणाची कल्पना मांडली. त्या कल्पनेची प्रभावी अंमलबजावणी सरांनी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रभावीपणे केली. त्यातून हजारो मुले मुख्य प्रवाहात आली. मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी सावित्रीबाई फुले याच प्रेरणादायी असू शकतात हे ओळखून, त्यांनी नायगावला सावित्रीबाई जन्मदिन कार्यक्रम तर सुरू केलाच, पण गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत देणारी सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरू केली. त्यातून हजारो मुली शिकल्या. रात्रशाळा बंद करण्याचा प्रयत्न होताच ते आक्रमक झाले, यात बालकामगारांची काळजी होती. पहिली, दुसरीला नापास करू नका, या आदेशामागे डोळ्यासमोर खेड्यात शिकणारी बहुजनाची पहिली पिढी होती. वंचितांच्या शिक्षणाबाबत ही त्यांची कणव होती. कागदी कामात अधिकारी म्हणून हरवून न जाता, हा माणूस महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत फिरून अधिकारी, शिक्षक आणि गावकरी या जिवंत माणसांशी बोलत फिरला. फोन किंवा वीज चांगले रस्ते नसताना बहुजनांना शिक्षण मिळावे, यासाठी तळतळ करणाऱ्या महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, जे. पी. नाईक यांचे स्वप्न तो साकार करीत होता आणि अंत:करणात साने गुरुजींची प्रेमाची भाषा होती.
आज स्पर्धा परीक्षेतून आलेले तरुण अधिकारी झाले आहेत, त्यांना तंत्रज्ञान समजते. अतिशय वेगाने ते माहितीची जुळवाजुळव करतात, पण चिपळूणकर सरांची तळमळ आणि कणव कोणत्या वेबसाइटवरून डाउनलोड करायची, हा प्रश्न आहे. सरांची तळमळ अधिकारी आणि शिक्षकांत संक्रमित करणे हेच आजच्या शैक्षणिक प्रश्नाला उत्तर आहे.

(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत)

Web Title: educationalist v v chiplunkar demise has left void in maharashtras education sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.