ईल आय & फिंगर अटॅक
By सचिन जवळकोटे | Published: April 19, 2018 02:55 AM2018-04-19T02:55:49+5:302018-04-19T02:55:49+5:30
वैद्यक शास्त्राच्या इतिहासात प्रथमच असा बाका प्रसंग उभा ठाकला होता. जगातले अनेक नामवंत डॉक्टर भारतात एकत्र जमले होते. एका मोठ्या हॉस्पिटलच्या आॅपरेशन थिएटरमध्ये हे सारे गोल करून उभे होते. या डॉक्टरांसमोर इरसालवाडीचा एक तरुण रुग्ण गंभीर अवस्थेत ठेवण्यात आला होता. साऱ्यांचं लक्ष त्याच्यावरच !
गेल्या काही दिवसांपासून म्हणे या रुग्णाला असाध्य अन् अज्ञात अशा दुर्मीळ रोगानं झपाटलं होतं. भल्या-भल्या डॉक्टरांनीही आजपावेतो या तरुणाच्या वेगवेगळ्या तपासण्या केलेल्या. परंतु शेवटपर्यंत त्यांना याच्या विचित्र रोगाचा शोध काही लागलाच नव्हता. नामवंत डॉक्टरांनीही अखेर थकून त्याच्यासमोर हात टेकले होते.
... म्हणूनच की काय, आधुनिक वैद्यक शास्त्राला चॅलेंज देणाºया या रुग्णाची पाहणी करण्यासाठी जगभरातली काही विख्यात तज्ज्ञ मंडळी इथं जमलेली.. मात्र या रुग्णाला जगाशी काहीच देणं-घेणं नसावं. सोयरसुतक नसावं. बोटांचे विचित्र चाळे करत तो छताकडं स्थिर नजरेनं बघत राहिलेला. पापण्यांच्या केसाइतकीही बुब्बुळांची हालचाल न झालेली. अमेरिकेचा डॉक्टर पुटपुटला, ‘इटस् अॅमेझिंगऽऽ अशा ईल आय रुग्णाचा मी प्रथमच आय विटनेस ठरतोय.’
एवढ्यात हा रुग्ण स्वत:च्याच तंद्रीत अकस्मातपणे आॅपरेशन टेबलावरून उठला. लगतच्या ब्लडप्रेशर मॉनिटरवर उजव्या हाताच्या तर्जनीचं बोट गराऽऽगराऽऽ फिरवू लागला. डान्सबारमध्ये नोटा उडवितात तसं... ‘ओह माय गॉडऽऽ ईटस् व्हेरी डेंजरस. याला फिंगर अटॅक नावाचा नवीन रोग जडलाय बहुधा..’ जर्मनीच्या डॉक्टरनं डोकं खाजवत वेगळीच शंका व्यक्त केली.
शेजारीच उभारलेल्या रुग्णाच्या आई- वडिलांना जपानच्या डॉक्टरनं हेल काढत विचारलं, ‘याची हालचाल अशीऽऽ कशीऽऽ?’ तेव्हा हतबल आईनं भेदरलेल्या आवाजात त्याच्या रोगाची कर्म कहाणी उलगडून सांगितली, ‘चार-पाच वरसागुदर आमचं पोरगं लईऽऽ चांगलं हुतं. गपगुमानं भाजी-भाकर खाऊनशान रात्तीच्याला डाराडूर झोपत हुतं. मातुर आता त्याला येळ-काळ म्हैत न्हाय. रात्तंंदिस जागा राहतुया. आमच्यासंगं काय बोलत न्हाय. आमच्याकडं बगतबी न्हाय. येकटाच हसत बसतुया. एकटाच हातवारं करत राहतुया.’
हे ऐकून काही डॉक्टराचं म्हणणं पडलं, ‘हा फिजिकल आणि टोटल मेन्टल प्रॉब्लेम आहे,’ ..तर काही डॉक्टरांनी ठामपणे मत मांडलं की, ‘याच्या शरीरात अज्ञात विषाणू घुसल्यानं महाभयंकर दुर्मीळ रोग जडलाय.’ एका आयुर्वेदिक डॉक्टरानं मात्र, त्याला देशी गायींचा उताराच फायदेशीर असल्याचा दावा केला, ‘विषाणू शरीरम्... बुद्धीम् भ्रष्टम्..ऽऽ गोमूत्रम् फायदम्ऽऽ’ असंच काहीतरी पुरातन भाषेत सांगितलं.
एवढ्यात या रुग्णाचे आजोबा काठी टेकवत आॅपरेशन थिएटरमध्ये आले. त्यांच्याभोवती डॉक्टरांनी घेराव घातला. ‘तुमच्या नातवाला काय झालंय, हे तुम्हाला माहीत आहे काय?’ असं एका डॉक्टरानं विचारलं. तेव्हा कपाळावर आठ्या घालत आजोबा उत्तरले, ‘माज्या लेकराला कसला डोंबल्याचा रोग झालाया? फकस्त इंटरनेट का फिंटरनेटचा मोबाईल हातामंदी आल्यापासनं तो असा वागतूया.’
(तिरकस)