प्रभावी ‘व्यक्तिमत्व’
By admin | Published: December 24, 2015 11:28 PM2015-12-24T23:28:04+5:302015-12-24T23:28:04+5:30
अलीकडच्या काळात विशिष्ट वर्षातील, विशिष्ट वर्गातील किंवा विशिष्ट क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्वांची यादी जाहीर करण्याची एक नवी रीत अस्तित्वात आली आहे.
अलीकडच्या काळात विशिष्ट वर्षातील, विशिष्ट वर्गातील किंवा विशिष्ट क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्वांची यादी जाहीर करण्याची एक नवी रीत अस्तित्वात आली आहे. अशी यादी तयार करण्यासाठी कधी मतदान घेतले जाते तर कधी सर्वेक्षणं केली जातात. परंतु प्रभावी म्हणून जाहीर होणारी किंवा होणाऱ्या व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने व्यक्तीच असतात. परंतु यंदा याबाबत एका खासगी पोर्टलने चक्क एका चतुष्पादालाच सरत्या वर्षातील प्रभावी व्यक्तिमत्व (पर्सनॅलिटी आॅफ द इअर) म्हणून जाहीर केले आहे. हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून चक्क गाय आहे. महाराष्ट्र सरकारने गोमांसावर बंदी लागू केल्यामुळे गाय हा प्राणी सार्वजनिक चर्चेच्या केन्द्रस्थानी जाऊन बसला. राज्य विधिमंडळाबरोबरच संसदेतही गोमांसाच्या निमित्ताने गायीवर चर्चा होऊ लागली. पाठोपाठ दादरीचे प्रकरण झाले. ज्या पोर्टलने यंदा गायीला हा बहुमान अर्पण केला त्याचा याबाबतचा निकष अगदी सामान्य होता. माध्यमांमध्ये ज्या व्यक्तीची अधिक चर्चा होते आणि विभिन्न सर्च इंजिनांकडे ज्या व्यक्तीविषयक अधिक माहितीची पृच्छा केली जाते, तिला हा बहुमान दिला जातो. अशा व्यक्तींंमध्ये यंदा आणखीही काही लोक होते. परंतु सर्वाधिक पसंती गायीलाच मिळाली. गायीला मिळालेल्या या बहुमानाने प्रभावित होऊनच की काय मग लोकसभेतील एका सदस्याने गोमातेला थेट राष्ट्रमातेचा दर्जा बहाल केला जावा अशी मागणीच करुन टाकली. या सदस्याच्या मते गायीचे केवळ दूधच नव्हे तर तिचे गोमूत्र आणि गोमय हेदेखील अत्यंत उपयुक्त असते. या सदस्याचे प्रेरणास्थान बहुधा बाबा रामदेव असावेत! तसेही गायीला पूजणारे आणि तिच्या उदरात तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य असते असे मानणारे थोडेथोडके लोक देशात नाहीत. पण त्यांचेच कशाला अनेक मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारदेखील गायीेचे परमभक्त असतात व सरकारी निवासस्थानात त्यांची सोयही करीत असतात. त्या साऱ्यांना गायीला प्राप्त या बहुमानाने हर्ष झाला असणार.