शैक्षणिक मूल्यांसाठी हवे प्रभावी अध्यापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 06:28 AM2018-11-27T06:28:26+5:302018-11-27T06:28:31+5:30

शिक्षण हे व्यक्तिविकास साधण्याचे एक प्रमुख साधन मानले जाते.

Effective Teaching for Educational Values | शैक्षणिक मूल्यांसाठी हवे प्रभावी अध्यापन

शैक्षणिक मूल्यांसाठी हवे प्रभावी अध्यापन

Next

साहजिकच हे कार्य ज्यांच्या हाती असते, त्यांना या कार्याची दिशा माहीत असणे आवश्यक आहे. शिक्षणाची उद्दिष्टे व मूल्ये, शिक्षण प्रक्रियेचा अर्थ, अध्यापनाचे तंत्र, वर्तन व्यवस्थापनाचे तंत्र, बालमनाची ओळख, लोकशाहीप्रधान समाजरचनेच्या विशिष्ट गरजा, शिक्षण व राष्ट्रविकास यांचा संबंध इ. गोष्टींचे ज्ञान त्यांना असणे आवश्यक आहे. विशिष्ट विषयाचे अध्यापन करणे एवढेच मर्यादित कार्य शिक्षकाचे राहिले नसून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास, चारित्र्यसंवर्धन, नागरिकत्वाचे शिक्षण इ. व्यापक उद्दिष्टे समोर ठेवून शिक्षकाने कार्य करावे ही काळाची गरज आहे.


शैक्षणिक मूल्ये, अभ्यासक्रम, अध्यापनपद्धती, शैक्षणिक साधने, मूल्यमापनपद्धती ही शिक्षणप्रणालीची विविध अंगे शिक्षकांना ज्ञात असणे आवश्यक आहे. शिक्षणप्रक्रियेत विद्यार्थ्याप्रमाणे अध्यापक हाही एक प्रमुख घटक आहे. शिक्षणव्यवस्थेचा तो कणाच मानला जातो. शिक्षणव्यवस्थेत भौतिक साधनसामग्री, अभ्यासक्रम इ. सर्व घटकांपेक्षा शिक्षकाचे महत्त्व अधिक आहे. शैक्षणिक मूल्ये साकार होण्यासाठी अध्यापनकार्य प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी व शिक्षणाची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी अध्यापक योग्य त्या संस्कारांनी युक्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्याच्या प्रशिक्षणावर आज सर्व देशांत भर दिला जात आहे. अध्यापकांना प्रशिक्षण दिले पाहिजे या गोष्टीची जाणीव मार्टिन ल्यूथर याला झाली होती. पुढे पेस्टालोत्सी व हेर्बार्ट या शिक्षणतज्ज्ञांच्या देखरेखीखाली जर्मनी, स्वित्झर्लंड देशांत प्रशिक्षणाचे काही वर्ग सुरू झाले व अध्यापनशास्त्राला प्रतिष्ठा मिळाली.


राष्ट्रउभारणीच्या भावनेने भारलेल्या आणि केवळ शिक्षक म्हणून नाही, तर उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याच्या उद्दिष्टातून एक पथदर्शी चळवळ माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणे आणि डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली.
‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ (एनटीसी) या तीन दिवसीय परिषदेचे पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात गेली दोन वर्षे आयोजन करण्यात येते. ‘शिक्षकांना प्रेरित करून सक्षम पिढी घडविणे’ हा या परिषदेच्या आयोजनामागील उद्देश आहे. देशभरातून आठ हजार शिक्षक यात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.


प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेचे चिफ पॅट्रन तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पॅट्रन आहेत. या राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाचे फाउंडिंग पेट्रन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, चेअरमनपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, अध्यक्षपदी विश्वशांती केंद्र (आळंदी), एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे आहेत.
या तीन दिवसीय परिषदेचा उद्घाटन समारंभ ४ जानेवारी २0१९ रोजी, तर समारोप ६ जानेवारी २0१९ रोजी होणार आहे. भारतीय उच्चशिक्षण पद्धतीच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध असलेल्या प्रत्येकाने या चळवळीत सहभागी व्हायलाच पाहिजे!

प्रा. डॉ. रवी चिटणीस। शिक्षणतज्ज्ञ

Web Title: Effective Teaching for Educational Values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.