सेवा, सुशासन अन् गरीब कल्याणाची आठ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 07:29 AM2022-05-30T07:29:50+5:302022-05-30T07:30:07+5:30

जिथे सर्व एक आहेत, सगळे सुखी आणि समृद्ध आहेत असा देश बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप कटिबद्ध आहे.

Eight years of service, good governance and poor welfare | सेवा, सुशासन अन् गरीब कल्याणाची आठ वर्षे

सेवा, सुशासन अन् गरीब कल्याणाची आठ वर्षे

googlenewsNext

- जगत प्रकाश नड्डा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान आणि निर्णायक नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारची आठ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण होत आहे. या काळात भारत जातीयवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला बाजूला सारून विकासाच्या, एकतेच्या आणि राष्ट्रवादाच्या राजकारणाच्या मार्गाने अग्रेसर झाला.  हा प्रवास ‘या देशात काहीच शक्य नाही’ या भारतीय मानसिकतेत बदल करणारा आणि ‘सरकार आणि जनतेची इच्छा आणि वचनबद्धता असेल तर सर्व काही शक्य आहे’, या मानसिकतेकडे नेणारा आहे.

नेत्याकडे धोरण आणि कार्यक्रम असेल, उद्दिष्ट आणि समर्पित वृत्ती असेल तर प्रत्येक आव्हानाला तोंड देता येते, प्रत्येक समस्या सोडवता येते हे या काळात सिद्ध झाले. बदलत्या भारताच्या आठ वर्षांची चमक आज प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांमध्ये दिसते. गेल्या आठ वर्षात देशातील गरिबीचा दर २२ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे तर अतितीव्र गरिबीचा दर १ टक्केच्या खाली येऊन ०.८ टक्क्यांवर स्थिर झाला आहे. गेल्या आठ वर्षात आपले दरडोई उत्पन्न दुप्पट झाले आहे तर परकीय चलनाचा साठादेखील दुप्पट झाला आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या  ७० वर्षात केवळ ६.३७ लाख प्राथमिक शाळांची उभारणी झाली होती. पण नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत ६.५३ लाख शाळा उभारण्यात आल्या आहेत. गेल्या आठ वर्षात आपल्या साक्षरतेच्या दरात ६ टक्के सुधारणा झाली  आहे. १५ नव्या ‘एम्स’ना (भारतीय आयुर्विज्ञान संस्था) मंजुरी मिळाली आहे, ज्यापैकी १० कार्यरत झाल्या आहेत तर ५ ‘एम्स’ची उभारणी अखेरच्या टप्प्यामध्ये आहे. रस्त्यांचे जाळे वेगाने वाढले, सौर आणि पवन ऊर्जानिर्मितीची क्षमता गेल्या पाच वर्षात दुप्पट झाली आहे. २०१२-१३मध्ये आपले अन्नधान्य उत्पादन २५५ दशलक्ष टन इतके होते, ते २०२१-२२मध्ये वाढून ३१६.०६ दशलक्ष टन झाले, जे आजवरच्या इतिहासात सर्वोच्च आहे. 

कोरोना महामारीशी लढताना भारताने  भारतीय बनावटीच्या दोन लसी जगाला दिल्या शिवाय  गेल्या दोन वर्षात ८० कोटी भारतीयांना विनामूल्य धान्य देण्यासाठी सरकारी तिजोरी उघडली. त्यासाठी ३.४० लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. भारताने जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम विनामूल्य राबवला. भारताची अन्नधान्य वितरण योजनाही जगातील सर्वात मोठी धान्य वितरण योजना आहे. भारताच्या या दोन महत्त्वाच्या यशांबद्दल जगभरात प्रशंसा होत आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या काळात ‘आयुष्मान भारत’ योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला विनामूल्य वैद्यकीय विमा कवच मिळाले तर शेतकरी आणि कामगारांना मासिक निवृत्तीवेतन मिळाले. शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान निधी’ योजनेचे लाभ मिळण्यास सुरूवात झाली शिवाय  सरकारकडून सेंद्रिय शेतीचे धोरणही निश्चित केले गेले.

‘जनधन योजना, उज्ज्वला योजना, किसान सन्मान निधी, आयुष्मान भारत योजना, गरीब कल्याण योजना, स्वच्छ भारत योजना, आवास योजना, जलजीवन मिशन, डिजिटल इंडिया, ग्रामविकास योजना, जीएसटी’ या सर्वच योजनांनी भारताला स्वयंपूर्ण होण्यात मदतच केली आहे. ‘आत्मनिर्भर भारत योजना, व्होकल फॉर लोकल, गतिशक्ती योजना, पीएलआय’ (उत्पादन संलग्न प्रोत्साहन ) या योजनांमुळे भारत वैश्विक जागतिक व्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानावर सुसाट वेगाने झेपावला.

पूर्वीच्या राजवटींमध्ये  प्रत्येक गोष्ट  नशिबावर सोडून दिली जात असे. परंतु, प्रश्नांशी भिडण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढाकार आणि निर्णायक दृष्टिकोनामुळे मोठा फरक पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाम निर्धारामुळेच, घटनेचे कलम ३७० रद्द करण्यात आले, अयोध्येत भव्य राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले, तिहेरी तलाकची प्रथा रद्द करण्यात आली, सीएए कायदा मंजूर करण्यात आला आणि सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले करण्यात आले. १८०० कायदे कालबाह्य झाल्याचे निश्चित करण्यात पंतप्रधान मोदी यांची कार्यशैलीच कारणीभूत ठरली आणि त्यापैकी १४५० कायदे रद्द करण्यात आले. यामुळे नागरिकांचे आयुष्य सहजसोपे झाले आणि सरकारची कार्यक्षमताही सुधारली.

परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परराष्ट्र धोरणाची पुनर्रचना करण्यात आली आहे.  दहशतवाद, जागतिक तापमानवाढ, जागतिक सौर आघाडी, क्वाडची परिणामकारकता आणि शेजारी देशांशी असलेले मजबूत संबंध या मुद्द्यांवरही भारताने आघाडी घेतली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आठ वर्षे हा भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा काळ आहे. योग आणि आयुर्वेदाने जगाचे लक्ष वेधून घेतले असताना, भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांनी गतवैभव परत मिळवले आहे. यात काशी विश्वनाथ धाम आणि केदारनाथ धाम सारख्या आपल्या पवित्र स्थानांचा कायापालट समाविष्ट आहे. भारत आपला गौरवशाली इतिहास पुन्हा प्राप्त करण्याच्या प्रतीक्षेत असून, ही केवळ सुरूवात आहे.

आज १८ कोटींपेक्षा अधिक सदस्यांसह भाजप ही जगातील सर्वात मोठी राजकीय संघटना आहे. २०१४मध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची ७ राज्यांत सरकारे होती, आज ही संख्या १८ वर पोहोचली आहे. भाजपने प्रथमच राज्यसभेत १०० खासदारांचा आकडा पार केला आहे. १३५ कोटी भारतीयांचा आमच्या पक्षाने जिंकलेला विश्वास आणि आशीर्वाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या यशाचे गमक आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’साठी कटिबद्ध असलेले सरकार आपल्या उत्थानासाठी कार्य करते, याची देशभरातील जनतेला खात्री आहे. जिथे सर्व एक आहेत, सगळे सुखी आणि समृद्ध आहेत, असा देश बनविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. 

(लेखक भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)

- लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांचा साप्ताहिक स्तंभ या आठवड्यात मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध होईल.

Web Title: Eight years of service, good governance and poor welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.