'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र

By अमेय गोगटे | Published: June 25, 2022 09:33 AM2022-06-25T09:33:15+5:302022-06-25T09:43:37+5:30

एका गोष्टीच्या बाबतीत गेल्या १६-१७ वर्षांत शिवसेना बदललेली दिसत नाही, असं म्हणावं लागेल आणि ती गोष्ट म्हणजे 'शिवसेनेतील बडवे'. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी कुणाचंच नाव घेतलं नव्हतं, पण चार-पाच नावांची जोरदार चर्चा झाली होती.

Eknath Shinde revolt: Raj Thackeray talked on middle men in Shiv Sena, MLA's are complaining the same against Uddhav Thackeray | 'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र

'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र

googlenewsNext

'तेव्हाची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना', 'बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना', ही चर्चा गेली काही वर्षं महाराष्ट्राच्या राजकारणात अधूनमधून घडत आलीय. पण, गेल्या चार दिवसांपासून तर शिवसेनेचं बदललेलं रूप-स्वरूप यावर प्रत्येक 'सोशल-वर्कर' हिरीरीने बोलतोय-लिहितोय. अर्थात, कारणही तसंच आहे. 'शिवसेनेचे निष्ठावंत नेते, कट्टर शिवसैनिक' म्हणून ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडावी, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच 'ती' शिवसेना आणि 'ही' शिवसेना, असा खल सुरू आहे. "मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवेसनेनं दिलं हे कृपा करून लक्षात ठेवा", हे तर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधान. म्हणजे, २०१२ पूर्वीची (बाळासाहेबांच्या निधनापूर्वीची) शिवसेना आणि २०१२ नंतरची शिवसेना अशी विभागणी करता येऊ शकेल. या काळात शिवसेना कशी बदलली, किती बदलली, यावर प्रत्येकाचं वेगळं मत असेल किंवा आहे. पण, एका गोष्टीच्या बाबतीत गेल्या १६-१७ वर्षांत शिवसेना बदललेली दिसत नाही, असं म्हणावं लागेल आणि ती गोष्ट म्हणजे 'शिवसेनेतील बडवे'. एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रातील बडव्यांच्या उल्लेखामुळे २००५ मधील दोन बंडांची आठवण ताजी झालीय.  

"माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही, त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. आजपर्यंत या बडव्यांच्या मर्जीने माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेत आलो. हे माझ्या विठ्ठलाचं मंदिर आहे, बडवे त्यांचं मंदिर समजायला लागले. चार कारकून शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली बलाढ्य संघटना सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही. शिवसेना संपवणाऱ्यांच्या पापाचा वाटेकरी मी होऊ शकत नाही'', हे गाजलेलं भाषण आहे तत्कालीन शिवसेना नेते, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सध्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत जाऊ दिलं जात नाही, चार जणांचा कंपू निर्णय घेतो, चुकीच्या गोष्टी बाळासाहेबांपर्यंत पोहोचवल्या जातात, काहींनी शिवसेना संपवायची सुपारी घेतलीय, असा हल्लाबोल करत २७ नोव्हेंबर २००५ रोजी कृष्णकुंज निवासस्थानासमोर राज ठाकरेंनी शिवसेना नेतेपद सोडत असल्याची घोषणा केली होती. राज यांनी कुणाचंच नाव घेतलं नव्हतं, पण चार-पाच नावांची जोरदार चर्चा झाली होती. उद्धव ठाकरेही त्यापैकी एक असल्याची कुजबूज झाली होती. त्यानंतर, आज स्वतः उद्धव यांनीही, बाळासाहेब असताना आपल्याला बडवे ठरवण्यात आल्याचा उल्लेख केला. 

राज यांच्याआधी काही महिने नारायण राणे यांनी शिवसेनेविरोधात बंड केलं होतं. शिवसेनेत पदांचा बाजार सुरू असल्याचा गौप्यस्फोट करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. बाळासाहेबांबद्दल आदर कायम असल्याचं ते वारंवार सांगत होते. इतकंच कशाला, बाळासाहेबांनी फक्त एक फोन केला तरी थांबेन, असंही ते काही पत्रकारांशी खासगीत बोलले होते. म्हणजेच, त्यांचा रोख काही विशिष्ट व्यक्तींवर होता. पुढे त्याच व्यक्तींना राज यांनी 'बडवे' म्हटल्याचं जाणकार सांगतात. 

या दोन बंडांनंतर, शिवसेनेतीलच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी केलंय. शिवसेनेच्या ५५ पैकी ३८ आमदारांचा गट त्यांच्यासोबत आहे. खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची, असा पेच निर्माण झालाय. मविआ सरकारवर काळे ढग दाटलेत. आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाची पूजा कोण करणार?, यावरून तर्क लढवले जात आहेत. अशातच, पुन्हा बडव्यांचा विषय चर्चेत आला आहे. 

औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रात, बडव्यांबद्दलचा राग स्पष्टपणे जाणवतो. वर्षावर प्रवेश मिळावा यासाठी आम्हाला लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधानपरिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करावी लागत होती, असं त्यांनी नमूद केलं आहे. यातून त्यांनी कुणावर (कुणाकुणावर) बाण सोडलाय, हे लक्षात येतं. राणे आणि राज यांच्या बंडावेळीही याच नेत्यांची चर्चा झाली होती. म्हणूनच, शिवसेना बदलली असली, तरी बडवे 'जैसे थे' आहेत, असंच दिसतंय.  

Shivsena: उद्धवजी, तुमच्या आजुबाजूच्या बडव्यांनी आमची व्यथा कधीच ऐकली नाही; 'शिंदेसेने'च्या आमदाराचं रोखठोक पत्र

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज बडव्यांवरून टीका करणाऱ्यांवर बडगा उगारला आहे. "आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे. हीच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का? आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं का? तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावंसं वाटतं मग मला वाटणार नाही का?", असा थेट प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे. या सगळ्याचा आपल्याला वीट आलाय आणि ही वीट आता डोक्यात हाणणार असल्याचं ते म्हणताहेत. पण, त्यापेक्षा दरवेळी आपल्यावरच हा ठपका का लागतो, याचा विचार त्यांनी करायला हवा असं वाटतं. छोटी-मोठी बंड अन्य पक्षांमध्येही होत असतात, नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षातही जातात, पण त्यात कुठेच 'बडवे' हे कारण अजून तरी समोर आलेलं नाही.

"आदित्यला 'बडवे' म्हणायचं आणि स्वतःचा मुलगा खासदार; ही वीट डोक्यात हाणणार!"

शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्याही खास मर्जीतील काही नेते आहेत. पण, त्यांच्याबाबतीत 'बडवे' वगैरे अशी चर्चा कधी झाली नाही. याचं कारण, पवारांचं सहज उपलब्ध असणं, लोकांना भेटणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, फोन करणं, फोन उचलणं, हे असू शकतं का, याचा अभ्यास उद्धव ठाकरे आणि खास करून आदित्य ठाकरे यांनी करणं गरजेचं वाटतं. शरद पवारांसारखी इतरही काही उदाहरणं देता येतील. पण, सध्या पवार आणि ठाकरे यांची युती पक्की आहे. त्यामुळे हे उदाहरण अधिक पॉवरफुल्ल ठरू शकतं. 

शिवसेनेचे 'मिशन इमोशन'; शरद पवार बनणार उद्धव ठाकरेंचे 'संकटमोचक'

एकूण सगळं वातावरण पाहिलं, तर कोण खरं - कोण खोटं, कोण बरोबर - कोण चूक हे ठरवणं महाकठीण आहे. शिवसेनेचा पुढचा प्रवास कसा असेल, हे भविष्यही आत्ता वर्तवता येणार नाही. कारण, 'वर्षा' बंगला सोडला असला, तरी जिद्द सोडलेली नाही, अशी डरकाळी उद्धव ठाकरे यांनी फोडलीय, नव्याने सुरुवात करायचा संकल्प केलाय. फक्त, ही नवी सुरुवात करताना अनुभवातून धडा घेणं त्यांच्याच फायद्याचं ठरेल. 

Web Title: Eknath Shinde revolt: Raj Thackeray talked on middle men in Shiv Sena, MLA's are complaining the same against Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.