"राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात..."; मुख्यमंत्री शिंदेंच्या या ब्रँडिंगला भाजपची सहमती आहे का?

By यदू जोशी | Published: June 13, 2023 10:55 AM2023-06-13T10:55:53+5:302023-06-13T11:00:10+5:30

दहा महिन्यांनी होणारी लोकसभा निवडणूक व त्यानंतर सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वात लढायची तर त्यांच्या लोकप्रियतेचा टक्का वाढणे अत्यंत आवश्यक आहे.

Eknath shinde's branding as future CM of Maharashtra; what BJP leaders are thinking? | "राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात..."; मुख्यमंत्री शिंदेंच्या या ब्रँडिंगला भाजपची सहमती आहे का?

"राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात..."; मुख्यमंत्री शिंदेंच्या या ब्रँडिंगला भाजपची सहमती आहे का?

googlenewsNext

>> यदु जोशी

मंगळवरची सकाळ एका जाहिरातीच्या चर्चेने सुरू झाली. बहुतेक सर्वच वृत्तपत्रांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने जाहिरात दिली. मथळा आहे, 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे'... या जाहिरातीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क व्यक्त व्हायला सकाळपासूनच सुरुवात झाली. सोशल मीडियात चर्चा रंगली. या जाहिरातीत एका सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला आहे. हे सर्वेक्षण केले कोणी याचा कुठलाही उल्लेख मात्र नाही. तथापि, हे सर्वेक्षण असे म्हणते की भाजपला राज्यातील ३०.२ टक्के तर शिवसेनेला (शिंदे) १६.२ टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप व शिवसेना युतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी इच्छुक आहे. मुख्यमंत्री पदासाठीच्या सर्वेक्षणात राज्यातील २६.१ खक्का जनतेने पुन्हा शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी हवेत असा कौल दिला. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असा कौल २३.२ टक्के जनतेने दिला आहे. याचा अर्थ ४९.३ टक्के जनतेने या जोडीला पसंती दिली आहे.

'दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र' अशी घोषणा गेल्या निवडणुकीत गाजली होती. किंबहुना, भाजपाचा प्रचार या घोषणेभोवतीच फिरला होता. आता येत्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपाने सुरुवात केली असताना, अचानक 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' ही जाहिरात झळकली आहे. या जाहिरातीत केलेल्या दाव्यांवरून आता आरोप-प्रत्यारोपांची, दावे-प्रतिदाव्यांची राळ नक्कीच उठेल. या जाहिरातीच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात. शिंदे यांनी नेमके आजचेच टायमिंग का साधले? कारण त्यांना स्वत:च्या आणि पक्षाच्या राजकीय भवितव्यासाठी हे ब्रँडिंग करणे आवश्यक आहे. दहा महिन्यांनी होणारी लोकसभा निवडणूक व त्यानंतर सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वात लढायची तर त्यांच्या लोकप्रियतेचा टक्का वाढणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला १६ टक्के लोकांनी कौल दिल्याचे जाहिरातीत म्हटले असले तरी माहिती अशी आहे की भाजप व काही नामवंत संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार शिंदेंची शिवसेना ६ टक्क्यांपेक्षा आजतरी पुढे नाही.भाजप ३३ टक्क्यांवर आहे. शिंदेंचा हा टक्का १० किंवा त्यापेक्षा अधिक वाढवणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. त्याचवेळी भाजपचा टक्का किमान चार टक्के वाढवावा म्हणजे दोघांमिळून ४६्-४७ टक्केपर्यंत मजल जाईल व लोकसभेच्या ४० जागा जिंकता येतील असे हे गणित आहे. शिंदेचा टक्का दुपटीहून अधिक होणे भाजपची मजबुरी आहे. कारण तसे झाल्याशिवाय महाविकास आघाडीवर मात करता येणार नाही याची भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला कल्पना आहे आणि त्यातूनच शिंदे-फडणवीस यांच्यातील चर्चेनंतर ही जाहिरात दिली गेली असा तर्क मांडता येतो. भाजप-शिवसेना युतीमध्ये आज शिवसेना लंगडी वाटते. समोर महाविकास आघाडी आहे. आगामी निवडणुका जिंकायच्या असतील तर शिंदेंचा टक्का वाढवावाच लागणार आहे. भविष्यात शिंदे खूपच वाढले तरच दोन पक्षांमध्ये संघर्षाचे काही प्रसंग उद्भवतील.

शिंदे वाढू नयेत म्हणून महाविकास आघाडी व विशेषत: ठाकरे सेना असा प्रचार करत आहे की शिंदेंच्या खासदार, आमदारांच्या हाती एक दिवस कमळच असेल. ते कमळावरच लढतील. मात्र तसे काहीही होणार नसून आम्ही युतीमध्येच लढू आणि त्यातही वरचष्मा, नेतृत्व हे शिंदे यांचेच असेल असे आजच्या जाहिरातीतून अधोरेखित करण्यात आले आहे. भाजपच्या नेतृत्वात आम्ही जाण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, उलट आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना-भाजप युती लढणार आहे असे या जाहिरातीतून सूचित केले आहे. शिंदे यांच्या समर्थक पाच मंत्र्यांना डच्चू दिला जाणार अशा बातम्या माध्यमांमधून गेले चार-पाच दिवस येत आहेत. तथापि, शिंदे यांनी आपल्या समर्थक खासदार, आमदारांची जी बैठक सोमवारी रात्री मुंबईत घेतली, त्यात आपले सगळे सहकारी मंत्री चांगले काम करत आहेत अशी शाबासकी दिली. त्यामुळे डच्चूची चर्चा ही चर्चाच राहणार असे दिसते. मात्र अनिर्बंध वागत असलेल्या दोन-चार मंत्र्यांना कडक शब्दात समज दिली जाईल व वर्तन सुधारण्याची हमी घेतली जाईल असे दिसते.

Web Title: Eknath shinde's branding as future CM of Maharashtra; what BJP leaders are thinking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.