‘निवडणुकीच्या शिपुरड्यांनो’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 02:24 AM2018-03-02T02:24:30+5:302018-03-02T02:24:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षार्थींकरिता ‘एक्झाम वॉरियर’ या नावाची पुस्तिका अलीकडेच प्रकाशित केली. त्यामध्ये तणावमुक्तीकरिता २५ सल्ले दिले आहेत.
- संदीप प्रधान
(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षार्थींकरिता ‘एक्झाम वॉरियर’ या नावाची पुस्तिका अलीकडेच प्रकाशित केली. त्यामध्ये तणावमुक्तीकरिता २५ सल्ले दिले आहेत. मात्र २०१९ मध्ये होणा-या लोकसभेच्या (जमल्यास झाडून साºया राज्यांच्या) निवडणुका तणावमुक्त वातावरणात व्हाव्या याकरिता मोदींना सल्लावजा सूचना करणारे ‘निवडणुकीच्या शिपुरड्यांनो’ हे पुस्तक बाजारात येत आहे...)
१) भाषण करताना स्थळ, काळ, व्यक्ती यांचे भान राखा. त्यामुळे सिमला करार इंदिरा गांधी व बेनझीर भुत्तो यांच्यात झाला, अशा चुका होण्याचा वेंधळेपणा टाळता येईल.
२) आता मी एक घोषणा करणार आहे, हे वाक्य उच्चारू नका. लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात व त्यामुळे मते घटू शकतात.
३) निवडणुकीच्या काळात मोहन भागवत, विनय कटियार, साक्षी महाराज, साध्वी प्राची, प्रवीण तोगडिया या मंडळींना दूरदेशी पर्यटनाला पाठवून द्या. तणावमुक्त वातावरणात निवडणुका पार पडतील.
४) अर्थमंत्री जेटलींनी संरक्षणाबद्दल बोलायचे, संरक्षणमंत्री सीतारामन यांनी शिक्षणाबद्दल प्रवचन द्यायचे असे प्रकार प्रचारात टाळा हे म्हणजे गणिताच्या पेपरच्या दिवशी भूगोलाचा अभ्यास करून जाण्यासारखे आहे.
५) तोंडात ‘पप्पू’ हा शब्द येणार नाही याकरिता वर्षभरात शेंडी वाढवून त्याला रोज गाठ मारा. ‘विदेशी बहू’ बोलल्याने यापूर्वी घात झालाय हे विसरू नका.
६) दिसला माणूस की मार मिठी, असे प्रचारात करू नका. मिठीत येणारा हळूच ‘मै भी नीरव मोदी, विजय मल्ल्या जैसा व्होटिंग के पहले भाग जाना चाहता हू,’ असं सांगून टाकेल.
७) पुन्हा नोटाबंदीची सक्ती करू नका. सक्तीच्या नसबंदीचा त्रिकोण या देशानं उधळून लावला होता. लोकांच्या दुखºया नसेवर पुन्हा बोट ठेवू नका.
८) जिकडे तिकडे आधार लिंक करण्याचा आग्रह धरू नका. आधार लिंक करणे म्हणजे काही काशीयात्रा करणे नव्हे, हे पक्के ध्यानात ठेवा.
९) मनमोहनसिंग मौनी पंतप्रधान होते, अशी टीका पुन्हा करू नका. गेल्या पाच वर्षांत घोटाळे, वाद-विवाद, संघर्ष यावर आपण साधलेली चुप्पी म्हणजे वर्गात शिक्षकांनी उभे केलेल्या विद्यार्थ्याने हातावर पट्ट्या खाऊनही तोंड न उघडल्यासारखीच होती.
१०) चहा, पकोडे, फाफडा, जिलेबी या खाद्यपदार्थांना प्रचारात आणून भुकेकंगाल जनतेचा अंत पाहू नका.
११) भाषणात सतत गुजरातचे गोडवे गाऊ नका. अन्यथा बुलेट ट्रेनच्या वेगानं अहमदाबाद गाठावं लागेल.
१२) मित्रपक्षांना खिजवू, हिडीसपीडिस करू नका. २०१४ चा पेपर सोपा होता. २०१९ चा कठीण असणार आहे.
१३) दहा लाखांचा कोट बोहारणीला देण्याचा जाहीर कार्यक्रम करून पंचा नेसून प्रचार करा.
१४) इतिहास कच्चा असेल तर विषय आॅप्शनलाच टाका.
१५) लोकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख जमा करा अन्यथा उठाबशा काढून तो चुनावी जुमला असल्याची जाहीर कबुली द्या.
लेखक : पिंट्या गलबले (दहावी फेल)