इलेक्शन वर्ष आहे, निघून ये...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:04 AM2018-08-04T03:04:22+5:302018-08-04T03:04:34+5:30
प्रिय विजय मल्ल्या,
स.न.वि.वि.
त्या दिवशी पेपरात बातमी वाचली, तू मायदेशी परतण्यास इच्छुक आहे. ‘सुबह का भुला शाम को घर आया’ म्हणून ऊर अभिमानाने भरून आला. छाती ५६ इंचाच्या वर गेली. अगदी राहवलं नाही म्हणून लगेच पत्र लिहायला घेतलं. आधी मोबाईलवरूनच काँग्रॅज्युलेशन करायचे होते पण, तुझा फोन सारखा नॉट रिचेबल येत होता. म्हटलं अख्ख्या भारत सरकारला तू नॉट रिचेबल असताना म्या पामराला कसा उपलब्ध होशील. मग पत्रच लिहायला घेतले.
आता तू येणार म्हटल्यावर आमच्या समस्त बँकवाल्यांचा जीव कसा भांड्यात पडला बघ! पडणार का नाही...! साधी रक्कम नव्हे तर ९००० कोटी डावावर लागले आहेत त्यांचे. मोदी साहेबांचे तर विचारूच नका...! कितीतरी दिवसांनी त्यांना अशी आनंदाची बातमी वाचायला मिळाली. २०१९ चे निवडणूक वर्ष तोंडावर आहे. काळा पैसा बाहेर काढू, पळून गेलेल्यांच्या मुसक्या बांधून हजर करू अशा घोषणा गेल्या चार वर्षांपासून करत होते, पण हाती काहीच आले नाही. भारतात पब्लिकमध्ये तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. (लोकं मात्र उगाच त्यांच्या वारंवार विदेशात जाण्याला नावे ठेवतात.) आता तू येणार म्हटल्यावर त्यांना अर्धी निवडणूक आत्ताच जिंकल्यासारखे वाटत आहे. या ‘पोस्टर बॉय’ ला कुठे ठेवू, कुठे नको असे झाले आहे बघ! देवेंद्रभाऊंना लगेच सूचना देऊन त्यांनी आर्थर रोड जेलमधील बराक नंबर १२ सर्व सोर्इंनी सज्ज ठेवायला सांगितली. खोलीत भरपूर सूर्यप्रकाश येईल, फ्रेश हवा खेळत राहील, मऊ बिछाना, पाश्चात्त्य पद्धतीचे टॉयलेट अशा सर्व सोई त्यांनी करून घेतल्या आहेत. मोदी साहेबांचे स्वच्छता मिशन कितीतरी दिवस त्यासाठी राबत होते म्हणे... या व्यवस्थेचे खास शुटिंग करून (यासाठी बॉलिवूडमधील काही चित्रपट निर्मात्यांची मदत घेतल्याचीही चर्चा आहे.) त्याचे फोटोग्राफ्स तुला आणि लंडनमधील तुझ्या त्या वकिलालाही पाठविले आहेत. तू मात्र विनाकारण या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावलेस. म्हणे फोटोग्राफ्स बनावट आहेत. आर्थरमधले वातावरण हायजिनिक नाही. आम्ही भारतीय येथे कोणत्या कचराकुंडीत राहतो याची तुला कल्पना नाही. आमची अनेक शहरे नुसती डम्पिंग यार्ड झाली आहेत.
बरं ते जाऊ दे. तुला या व्यवस्थेत आणखी काय काय सुधारणा पाहिजेत हे कळव म्हणजे त्या करून घेता येतील. आधी तू भारतात येणे महत्त्वाचे आहे. ‘बघा मी कसा मल्ल्याला भारतात खेचून आणला’ किमान एवढे तरी मोदी साहेबांना आपल्या प्रचार सभेत सांगता येईल. बाकी मुद्दे तर घासूनघासून गुळगुळीत झाले आहेत.
आणि हो...एक सांगायचे राहूनच गेले... तू आणि तुझ्यासाखेच ललित, नीरव (हेही मोदीच बरं का!) यांना भारतात आणण्यासाठी सरकारने मोठी शक्कल लढविली आहे. इलेक्शन फंडासाठी तुमच्यासारख्यापुढे हात पसरविण्यापेक्षा त्यांनी निवडणूक रोखे योजनाच आणली. यात तुम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या नावाने बॉण्ड घ्यायचे म्हणजेच त्यांना दक्षिणा द्यायची आणि आपला उल्लू सिधा करून घ्यायचा. बघ पटतं का...? सरळ भारतात ये...बीजेपीच्या नावाने हजार बाराशे कोटींचे बॉण्ड घेऊन टाक म्हणजे पुढचे काम सोप्पे. तर निघ लवकर, ‘बराक नंबर 12’ इज वेटिंग 4 यू...!
(तिरकस)