निवडणुका आणि संगणकीय तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:51 AM2018-11-07T04:51:10+5:302018-11-07T04:51:39+5:30

लोकसभा व विधानसभेच्या आता कदाचित एकत्र निवडणुका वर्षअखेर जाहीर होतील. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत.

Elections and computational technology | निवडणुका आणि संगणकीय तंत्रज्ञान

निवडणुका आणि संगणकीय तंत्रज्ञान

Next

- डॉ. दीपक शिकारपूर 
( संगणक तज्ज्ञ)

लोकसभा व विधानसभेच्या आता कदाचित एकत्र निवडणुका वर्षअखेर जाहीर होतील. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. आधुनिक तंत्राचा वापर आता वैयक्तिक व व्यावसायिक स्तरावर होत असल्याने निवडणूक त्याला कशी अपवाद ठरेल. आपल्या संसदीय लोकशाही व्यवस्थेत संसद, विधिमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था असे तीन स्तर आहेत. मतदान यादी, प्रत्यक्ष मतदानापासून विजयी उमेदवाराबाबतचे अंदाज वर्तविण्यापर्यंतच्या अनेक पैलूंमध्ये हे तंत्रज्ञान समाविष्ट झालेले आढळते.

मतदारांना निवडणुकीसंदर्भातील सुविधा आणि माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी ट्रू वोटर नावाचे मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना मतदार यादीतील आपले नाव, मतदान केंद्र सहजपणे शोधता येते. उमेदवारांनी शपथपत्राद्वारे भरलेली माहिती पाहता येते. उमेदवारांना या अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणूक खर्च सादर करता येतो. हे अ‍ॅप मुख्यत: नागरिक, मतदार, निवडणुकीशी संबंधित अधिकारी/कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे व राजकीय विश्लेषक यांना उपयोगी ठरणार आहे. या अ‍ॅपचे मुख्य कार्य, मतदारांना यादीतील नावाचा शोध उपलब्ध करून देणेआहे.

आता महत्त्वाचे पाऊल म्हणजे मतदानाचे. मतदान करण्यापासूनच सुरुवात करू, इव्हीएम उर्फ इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनबाबत आरंभी बऱ्याच शंका व्यक्त झाल्या व आपल्याकडील अशिक्षित आणि अर्धशिक्षितांना हे तंत्र जमेल काय, अशी विचारणा झाली, परंतु सुरुवातीपासून इव्हीएमच वापरत असल्याप्रमाणे लोक सराईतपणे मतदान करताना दिसतात! या वेळी नोटा (NOTA) म्हणजेच नन आॅफ द अबॉव्ह या बटनाचीच चर्चा जास्त आहे! मतमोजणीदेखील अतिशय वेगाने, अचूकतेने आणि गैरप्रकार होऊ न देता करणे इलेक्ट्रॉनिक तंत्रांमुळे शक्य झाले आहे.

सर्वच उमेदवारांच्या मतदानाआधीच्या प्रचाराची धामधूम आता सोशल मीडियामुळे चांगलीच बदलली आहे! उमेदवाराची प्रतिमा, त्याने केलेली विधाने अशांसारख्या बाबींना एफबी आणि टिष्ट्वटरवर जास्तीतजास्त लाइक्स आणि शेअरिंग मिळविणे हे प्रत्यक्ष मिरवणुका, पोस्टर्स आणि हॅँडबिलांइतकेच किंवा त्यांपेक्षाही महत्त्वाचे मानले गेले आहे!! स्मार्ट फोन आणि इतर तंत्रांच्या प्रसाराच्या विलक्षण वेगामुळे हे शक्य झाले आहे़ अगदी गेल्या निवडणुकीतही सोशल मीडियाची इतकी हवा नव्हती.|

निवडणुकांमध्ये गैरप्रकार होणे आपल्याकडे नवीन नाही, परंतु त्यांची खबर, चित्रफितीच्या रूपातील पुराव्यासहित! - तत्काळ संबंधितांपर्यंत पोहोचविणे आता स्मार्ट फ ोन आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या इंटरनेटमुळे शक्य झाले आहे. याला साधारणत: स्टिंग आॅपरेशन असे म्हटले जाते. मतदानाआधी आणि निकालापूर्वीच्या दिवसांत टीव्हीवरून अंदाज वर्तविण्याला अगदी जोर येतो. या कल-चाचण्या (ओपिनियन पोल्स) मतदारांना प्रभावित करू शकतात का? हे अंदाज खरे आणि भरवशाचे असतात की फुगवलेले आणि फेरफार केलेले? त्यावर बंदी घालावी का? इ. मुद्द्यांची चर्चा, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून, आपापल्या सोईनुसार, सतत घडविली जाताना आपण पाहतोच, तसेच आॅनलाइन सॅँपलिंग पद्धतीनेही मतदारांच्या मनाचा कल, त्यांना भावणारे आणि खुपणारे मुद्दे अशा बाबींचे चित्र मिळविता येते.

Web Title: Elections and computational technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.