हिंदुत्वासाठीच संघाचे जाती निर्मूलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:08 AM2018-01-23T01:08:05+5:302018-01-23T01:08:27+5:30

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जातीयवादी आहे’ ही काळवंडलेली प्रतिमाच या संघटनेच्या प्रयत्नांतील सर्वात मोठा अडसर आहे. ‘संघाचे हिंदुत्व बहुजनवादी होईल का?’ हा प्रश्न मग मुद्दामच विचारावासा वाटतो.

 Elimination of RSS's caste for Hindutva | हिंदुत्वासाठीच संघाचे जाती निर्मूलन

हिंदुत्वासाठीच संघाचे जाती निर्मूलन

Next

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जातीयवादी आहे’ ही काळवंडलेली प्रतिमाच या संघटनेच्या प्रयत्नांतील सर्वात मोठा अडसर आहे. ‘संघाचे हिंदुत्व बहुजनवादी होईल का?’ हा प्रश्न मग मुद्दामच विचारावासा वाटतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदू धर्मातील जातीयवाद संपवायचा आहे आणि त्यासाठी संघपरिवार संत, महंत, धर्माचार्यांची मदत घेणार आहे. पंढरपुरातील ‘संत संगम’ कार्यक्रमात भागवतांनी ही नवी भूमिका विशद केली. जातीयवाद संपवायचा म्हणजे नेमके काय करणार? या प्रश्नाचे उत्तर संघ प्रभावळीतील या कुठल्याही महंतांजवळ नाही. त्यांना संघ परिवाराव्यतिरिक्त बाहेर कुणी किंमत देत नाही. हे संत-महंत स्वत:च जातीयवादी आहेत. हिंदू धर्मातील बहुजन संतांची नालस्ती करणे एवढेच काम ते करीत असतात. शंकराचार्य हे हिंदूंचे आध्यात्मिक प्रमुख असल्याचे सांगितले जाते. परंतु किती हिंदूंची त्यांच्यावर श्रद्धा आहे? कुणाच्या घरात त्यांचे फोटो कधी पाहिले आहेत का ? यातील एक शंकराचार्य तर वाचाळ आहेत. शनि शिंगणापूरच्या चौथºयावरील प्रवेशासाठी हिंदू धर्मातील माता-भगिनी पोलिसांच्या लाठ्या खात असताना त्यांना हीन लेखण्याचा अपराध या शंकराचार्यांनी केला. स्त्रीच्या मातृत्वाचा अपमान करणारे हे महाशय मध्यंतरी साईबाबांवरही घसरले होते. हिंदू धर्मातील ज्या जाती-पोटजातींनी जातीयवादाचे चटके सहन केले त्यांची या संत महंत, शंकराचार्यांवर कवडीचीही श्रद्धा नाही. अशा माणसांकडून जाती निर्मूलनाचे कार्य खरंच होईल का?
सरसंघचालक मोहन भागवतांचे व्यक्तिमत्त्व बाळासाहेब देवरसांसारखे सुधारणावादी आहे. ते सुदर्शन यांच्यासारखे बुरसटलेल्या विचारांचे नाहीत. हिंदू धर्मातील सर्व जाती, पोटजाती हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र याव्यात हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. हिंदुत्वाचा खरा अर्थ बंधुभाव आणि माणुसकी असल्याचे म्हणूनच ते अधूनमधून सांगत असतात. गुजरातच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या देवदर्शनाच्या वाºया आणि गळ्यात दिसणारे जानवे हा सामान्य हिंदूंचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी काँग्रेसने सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग होता. पुढच्या काळातही राहुल गांधींचे हे देवदर्शन असेच सुरु राहणार आहे. एकेकाळी काँग्रेस या राजकीय पक्षाची वैचारिक बांधिलकी मानणारा सामान्य हिंदू जसजसा काँगे्रसपासून दुरावू लागला तसेतसे भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित होऊ लागले. हिंदूंची ही मते पुन्हा काँगे्रसकडे वळत असल्याचे गुजरात निवडणुकीत प्रत्ययास आले. संघ परिवारासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यासाठीच हिंदू धर्मातील सर्व जातींना हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचा सरसंघचालकांचा हा खटाटोप आहे. पण हे प्रयत्न पुरेसे नाहीत. ‘राष्टÑीय स्वयंसेवक संघ ही संघटना जातीयवादी आहे’ ही काळवंडलेली प्रतिमाच या संघटनेच्या प्रयत्नांतील सर्वात मोठा अडसर आहे. ‘संघाचे हिंदुत्व बहुजनवादी होईल का?’ हा प्रश्न मग मुद्दामच विचारावासा वाटतो.
सामान्य हिंदू रामनवमीच्या उत्सवात आनंदाने सहभागी होतात. पण संघाचा ‘राम’ त्यांना खुणावत नाही. देवदर्शनाला नियमित जाणारा, सर्व सण-व्रतवैकल्ये धर्मश्रद्धेने करणारा सामान्य हिंदू आपल्यापासून फटकून का वागतो? महात्मा गांधी हेच बहुजन समाजाचे आणि सामान्य हिंदूंचेही खरे नायक. त्यांची हत्या करणाºया नथुराम गोडसेला हौतात्म्य बहाल करणारी विकृत माणसे आपल्याच हिंदुत्वाशी नाते सांगणारी आहेत. त्यांचा निषेध आपण कधी का करीत नाही? आचरट शंकराचार्यांना वेसण घालण्याची हिंमत आपल्यात का नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या आवर्तातच संघाच्या जातीनिर्मूलनाचे यशापयश दडलेले आहे.
- गजानन जानभोर
 gajanan.janbhor@lokmat.com

Web Title:  Elimination of RSS's caste for Hindutva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.