इलॉन मस्क ‘आकाश’मार्गे भारतात आले, की मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:02 IST2025-03-17T09:01:35+5:302025-03-17T09:02:12+5:30

‘स्टारलिंक’ने जिओ आणि एअरटेलशी करार केला आहे. उपग्रहाद्वारे दिली जाणारी वेगवान इंटरनेट सेवा भारतात उपलब्ध झाल्यावर नेमका काय बदल घडू शकेल?

Elon Musk came to India via 'sky' column about starlink | इलॉन मस्क ‘आकाश’मार्गे भारतात आले, की मग....

इलॉन मस्क ‘आकाश’मार्गे भारतात आले, की मग....


प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क हे आपल्याला एक्स (ट्विटर) आणि टेस्ला या कंपन्यांचे मालक म्हणून माहीत आहेत. इलॉन मस्क यांची ‘स्टारलिंक’ नावाची कंपनी सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सेवा देते. स्टारलिंक कंपनीने नुकताच जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांसोबत भारतामध्ये त्यांची सेवा वितरित करण्यासाठीचा करार केला. त्यामुळे आता लवकरच स्टारलिंकची इंटरनेट सेवा भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सेवेमुळे भारतात काय नेमका बदल घडू शकेल?

सध्या आपल्या घरामध्ये इंटरनेट  दोन मार्गांनी येतं, फायबर ऑप्टिक केबलमधून किंवा मोबाइल नेटवर्कमधून. फायबर ऑप्टिक केबलमधून आलेले इंटरनेट हे घरामधल्या रूटर नावाच्या उपकरणाला जोडलेलं असतं. तिथून वायफायद्वारे ते घरातल्या मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप इत्यादी उपकरणांना दिलं जातं. मोबाइल नेटवर्कद्वारे येणारं इंटरनेट  प्रामुख्याने आपल्या मोबाइल फोनवर येतं. तसंच, जियोचं एअर फायबर किंवा एअरटेलचं एअरटेल एक्स्ट्रीम या सेवांमध्ये घरावर एक रिसिव्हर डिश बसवली जाते.

थोडक्यात, आपल्या घरामध्ये इंटरनेट येण्यासाठी आपल्या घरापर्यंत फायबर ऑप्टिक केबल टाकावी लागते किंवा आपलं घर  मोबाइल टॉवरच्या रेंजमध्ये असावं लागतं. भारतातल्या शहरी भागांमध्ये केबल आणि नेटवर्क टॉवर या दोन्हींचं प्रचंड मोठं जाळं असल्याने हायस्पीड इंटरनेटची मुबलक उपलब्धता आहे. मात्र, भारतातल्या ग्रामीण भागांमध्ये फायबर ऑप्टिक केबलचं जाळं पोहोचवणं  प्रचंड खर्चीक  आहे. शिवाय ग्रामीण भागात मोबाइल टॉवर्सचं जाळंही तुरळक आहे. शिवाय त्यावर आधुनिक 5G सेवा उपलब्ध असतेच असं नाही. त्यामुळे भारतातल्या मोठ्या शहरांपासून अगदी चाळीस-पन्नास किलोमीटर लांब गेलं तर तिथेही हायस्पीड इंटरनेट उपलब्ध नसतं. 

केबल किंवा मोबाइल टॉवरद्वारे इंटरनेट देण्याऐवजी सॅटेलाइटद्वारे दिलं तर देशातील सर्व भागांमध्ये हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल.  स्टारलिंक कंपनीने पृथ्वीच्या नजीकच्या कक्षेमध्ये (Low Earth Orbit) फिरणाऱ्या उपग्रहांचं जाळं तयार केलं आहे. या उपग्रहांद्वारे इंटरनेटचा सिग्नल पुरविला जातो. हा सिग्नल घेण्यासाठी घरावर बसवलेल्या रिसिव्हरमधून आलेला सिग्नल घरातील रूटरद्वारे घरातल्या इतर उपकरणांना देता येतो. या तंत्रज्ञानामुळे जिथे केबल अथवा मोबाइल टॉवर नाहीत अशा कोणत्याही ठिकाणी हायस्पीड इंटरनेटची सेवा उपलब्ध होते. 

ही सेवा भारतात देण्यासाठी स्टारलिंकला केंद्र सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. स्टारलिंकच्या या सेवेचा आपल्या ग्राहकांवर परिणाम होईल म्हणून जियो आणि एअरटेलचा त्याला विरोध होता असं म्हटलं जातं. मात्र, स्टारलिंकने या दोन कंपन्यांशीच वितरणाचे करार केल्याने हा विरोध आता मावळला असावा, असं दिसतं.  केंद्र सरकारने परवानगी दिली की स्टारलिंकची इंटरनेट सेवा भारतात उपलब्ध होईल. मात्र, उपग्रहाद्वारे मिळणारी इंटरनेट सेवा ही केबल अथवा मोबाइलद्वारे मिळणाऱ्या सेवेपेक्षा जास्त महाग असते. शिवाय, घरावर लावावा लागणारा रिसिव्हर आणि रूटर इत्यादी उपकरणांचा खर्चही ग्राहकांना करावा लागतो. स्टारलिंकने त्यांचे भारतातले प्लॅन्स अद्याप जाहीर केलेले नाहीत. अमेरिकेत त्यांचे प्लॅन्स १२० डॉलर्स प्रतिमहिना (सुमारे १०,००० रुपये) इतके महाग आहेत. भारतासाठी किमान हजार ते चार हजार रुपये महिना असे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्याला सध्या तीन-चारशे रुपये महिन्यामध्ये धोधो इंटरनेट वापरण्याची सवय आहे. त्याच्या काही पट किंमत असलेलं इंटरनेट, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये वापरलं जाईल का, हा  मोठा प्रश्न आहे.  

‘डिजिटल इंडिया’चं स्वप्न पूर्णत्वाला येण्यासाठी देशाच्या प्रत्येक भागात हायस्पीड इंटरनेट पोहोचणं गरजेचं आहे. यासाठी केबल, मोबाइल टॉवर आणि उपग्रह अशा सर्व उपलब्ध मार्गांचा वापर करावा लागेल. भारतासारख्या विशाल देशामध्ये उपग्रहाद्वारे मिळणारं इंटरनेट हे खरोखर वरदान ठरू शकेल. मात्र ते ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत देण्याची तारेवरची कसरत स्टारलिंक, जियो आणि एअरटेल यांना करावी लागेल!
    prasad@aadii.net
 

Web Title: Elon Musk came to India via 'sky' column about starlink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.