विम्बल्डनचा सम्राट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:45 AM2017-07-18T03:45:09+5:302017-07-18T03:45:09+5:30

रॉजर फेडररने रविवारी अपेक्षेनुसार विक्रमी आठवे विम्बल्डन अजिंक्यपद खिशात घातले आणि तोच विम्बल्डनचा अनभिषिक्त सम्राट असल्याची द्वाही थाटात फिरवली

Emperor of Wimbledon! | विम्बल्डनचा सम्राट!

विम्बल्डनचा सम्राट!

Next

रॉजर फेडररने रविवारी अपेक्षेनुसार विक्रमी आठवे विम्बल्डन अजिंक्यपद खिशात घातले आणि तोच विम्बल्डनचा अनभिषिक्त सम्राट असल्याची द्वाही थाटात फिरवली. आजवर केवळ आठ पुरुष टेनिस खेळाडूंना ‘करिअर ग्रँड स्लॅम’ (आॅस्टे्रलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन व यूएस ओपन या चारही ‘ग्रँड स्लॅम’ स्पर्धांच्या अजिंक्यपदावर नाव कोरणे) जमले आहे. त्या आठ जणांमध्ये फेडररचा समावेश आहे. चारही ‘ग्रँड स्लॅम’ स्पर्धा वेगवेगळ्या पृष्ठभागांवर खेळवल्या जात असल्याने, त्या सर्व जिंकणे हे अत्युच्च दर्जा असल्याशिवाय शक्य होत नाही. फेडररने ते करून दाखवले यातच सगळे काही आले. आॅस्टे्रलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन व यूएस ओपन या चारही स्पर्धांना ‘ग्रँड स्लॅम’ म्हणून ओळखल्या जात असले तरी त्यामध्ये विम्बल्डनचे महत्त्व काही आगळेच आहे. ज्योतिर्लिंग बारा असले तरी त्यामध्ये काशी विश्वनाथाचे महात्म्य जसे आगळेच आहे तसे! आयुष्यात एकदा तरी विम्बल्डनच्या हिरवळीवर खेळायला मिळावे, हे प्रत्येक टेनिस खेळाडूचे स्वप्न असते. जिथे अनेकांसाठी ते अखेरपर्यंत स्वप्नच राहते, तिथे फेडररने एकदा-दोनदा नव्हे तर चक्क आठवेळा विम्बल्डन अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे आणि निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी आणखी एक-दोनदा त्याने तो पराक्रम केला तरी आश्चर्य वाटू नये! आठपैकी पाच अजिंक्यपदे तर त्याने ओळीने मिळवली होती. त्याच्या आजवरच्या एकूण १९ ‘ग्रँड स्लॅम’ अजिंक्यपदांपैकी तब्बल आठ विम्बल्डनच्या हिरवळीवरील आहेत, ही एकमेव बाब फेडररचा दर्जा समकालीन खेळाडूंच्या तुलनेत किती उंच आहे, हे सिद्ध करायला पुरेशी आहे. इतर काही श्रेष्ठ खेळाडूंप्रमाणे फेडररला ‘कॅलेंडर ग्रँड स्लॅम’ शक्य झाले नाही आणि करिअर उतरणीला लागल्याने आता तशी शक्यताही दिसत नाही; मात्र तरीही अनेक समीक्षक त्याला सर्वकालीन सर्वश्रेष्ठ पुरुष टेनिस खेळाडूचा बहुमान देतात. तो बहुमान त्याला केवळ त्याच्या अजिंक्यपदांच्या संख्येमुळे दिल्या जात नाही, तर टेनिसप्रतीच्या त्याच्या बांधिलकीमुळे दिल्या जातो. फेडररने वयाची पस्तिशी पूर्ण केली आहे. बहुतांश टेनिस खेळाडू तिशीतच निवृत्त होतात आणि इथे हा खेळाडू पस्तिशी पूर्ण झाल्यावर केवळ विम्बल्डन जिंकतच नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा मैदानात उतरण्याची जिद्द बाळगतो. यावर्षी त्याच्यासाठी अजिंक्यपद सोपे नव्हते. एक तर २०१२ पासून त्याला एकही ‘ग्रँड स्लॅम’ स्पर्धा जिंकता आलेली नव्हती. भरीस भर म्हणून गुडघ्याच्या दुखण्यामुळे तो तब्बल पाच महिने टेनिसपासून दूर होता. तरीही त्याने भरात असल्याप्रमाणे अगदी सहजगत्या विम्बल्डन जिंकले. फेडररचे थोरपण यामध्ये सामावलेले आहे. फेडररपूर्वी रॉड लेव्हर, बिजाँ बोर्ग, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर यासारख्या मोजक्या खेळाडूंनी विम्बल्डनप्रेमींना मोहिनी घातली होती; पण विम्बल्डनचा सर्वकालीन अनभिषिक्त सम्राट मात्र फेडररच!

Web Title: Emperor of Wimbledon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.