रोजगार खाणारी मशीन्स आणि....नव्या नोकऱ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 04:39 AM2021-03-16T04:39:39+5:302021-03-16T04:40:19+5:30

कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन बाजारपेठेमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणत आहेत. रॉबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेव्यतिरिक्त क्लाऊड, मोबाइल ॲप्लिकेशन डिव्हलपमेंट आणि इंटरनेट ऑफ थिंग्ससारख्या संकल्पना  व्यावसायिक अवकाशाला नवे आयाम देत आहेत.

Employment eating machines and .... new jobs! | रोजगार खाणारी मशीन्स आणि....नव्या नोकऱ्या!

रोजगार खाणारी मशीन्स आणि....नव्या नोकऱ्या!

Next

डॉ. एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष, भारतीय तंत्रशिक्षण परिषद

रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगमधली प्रगती स्वयंचलनाची नवनवी दालने उघडेल, त्यातूनच नव्या नोकऱ्या आत येणार आहेत!ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि यंत्रांच्या अध्ययन क्षमतेविषयी बरेच काही लिहून झालेले आहे.  त्यांच्या संगमातून उद्‌भवणाऱ्या अवकाशात भविष्यात अनेक प्रकारचे रोजगार तयार होतील.

कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन बाजारपेठेमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणत आहेत. रॉबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेव्यतिरिक्त क्लाऊड, मोबाइल ॲप्लिकेशन डिव्हलपमेंट आणि इंटरनेट ऑफ थिंग्ससारख्या संकल्पना  व्यावसायिक अवकाशाला नवे आयाम देत आहेत. सरकारने डिजिटल तंत्रज्ञानासाठी लावलेले बळ आणि आयटी बाजारपेठेतल्या नवनव्या संकल्पना यांमुळे येणाऱ्या वर्षांत लाखो रोजगारांची निर्मिती होणार आहे.

पण हे रोजगार नेमके कुठे असतील? तर  सॉफ्टवेअर उद्योग तसेच बिझनेस प्रोसेसेस, औद्योगिकी, कंट्रोल आणि रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशनमध्ये या संधी असतील.

हे बदल घडवून आणणारे कोण असेल? या प्रश्नाचे उत्तर इंडस्ट्री ४.० हे आहे. आपण औद्योगिक स्वयंचलनाबाबतीत ऐकलेले आहेच. यापुढे आपण लवचिक कारखान्यांचा अनुभव घेणार आहोत. इथले उत्पादन लवचीक (बदलते) असेल; या स्मार्ट कारखान्यांना उत्पादन श्रेणीत गतिमान बदल करत वेळ वाचवणे शक्य होईल. अर्थात यासाठी उद्योगांनी डिजिटलायझेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यांच्याशी नीट जुळवून घ्यावे लागेल. आज बहुतेक कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मोठी मागणी असलेल्या उत्पादन प्रक्रियांच्या ऑटोमेशनमध्ये गुंतलेल्या आहेत. सर्वसाधारण जिचे आरेखन शक्य आहे अशा कोणत्याही प्रक्रियेचे स्वयंचलन करता येईल.

कुशल कामगारांद्वारे पुन्हा पुन्हा करावी लागणारी, नेहमीची प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी लागणारी सॉफ्टवेअर प्रणाली म्हणजे आरपीए अशी व्याख्या आयबीएम करते. अनेक क्षेत्रांत तिचा वापर आताही होत आहे. ऑनलाइन शॉपिंगची साइट असो वा ऑनलाइन क्रेडिट कार्ड प्रक्रिया, आरपीएची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच आपल्याला अडचणरहित डिजिटल अनुभव मिळत असतो. देवाण-घेवाणीशी संबंध असलेले अनेक उद्योग आता आरपीए तंत्राकडे वळत असून, त्यातून त्यांची कार्यक्षमता वाढते आणि चुका होण्याचे प्रमाण घटते, असा अनुभव आहे.  

बँकिंग आणि वित्तसेवा पुरवणाऱ्या क्षेत्रातही स्वयंचलित चॅट बॉटसच्या मदतीने ग्राहकांविषयीच्या माहितीचे पृथक्करण करणे, त्यांना आवश्यक असलेल्या सेवेविषयी अचूक अनुमान काढणे शक्य होते. आरोग्य विम्याचे दावे करताना सतत द्यावा लागणारा तपशील,  रुग्णांच्या अपॉइंटमेंटचे व्यवस्थापन यांसारख्या किचकट गोष्टींमध्ये आरपीए  मदतीला येते. जागतिक आरपीए बाजारपेठेचा विचार करता  आपल्याकडे मनुष्यबळ आहे आणि आरपीएसाठी लागणारी कल्पनाशक्तीही विपुल आहे. आपण आरपीएतले जागतिक केंद्र बनू शकतो; मात्र आपली शिक्षण व्यवस्था आणि  विद्यापीठांनी या तंत्रज्ञानासाठीच्या प्रचंड मागणीचे आव्हान पेलण्यास सज्ज व्हायला हवे. आवश्यक कौशल्यांच्या हस्तांतरणासाठीची व्यवस्था विकसित करायला हवी. नित्य बदलत्या आयटी बाजारपेठेच्या नित्य बदलत्या मागण्यांचे समाधान करणाऱ्या ‘एड-टेक’ कंपन्यांना सरकारनेही मदतीचा हात द्यायला हवा.

रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगमधली प्रगती स्वयंचलनाची नवनवी दालने उघडत आहे. त्यामुळे यंत्रांची क्षमता मानवी बुद्धीच्या तोडीची किंवा त्याहून उत्तम ठरते आहे. मॅककिन्स्की ग्लोबल इन्स्टिट्यूट अनुसार माणसांना यापुढे यंत्रांना प्राधान्य देत काम करावे लागणार असून, यंत्रांमुळे रोजगार गमावलेल्यांना अन्यत्र उदरनिर्वाह शोधावा लागेल. 

 रोजगाराच्या बाजारपेठेचा जो पिरामिड  आहे, त्याचा पायाच झपाट्याने बदलतो आहे. पाया स्थिर ठेवण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरजच आक्रसते आहे. तिथे आता उच्चतम कौशल्य असलेल्यांनाच स्थान असेल. आपल्या कौशल्यांना नव्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार पुन्हा पुन्हा धार काढावी लागणार आहे. त्मनिर्भरतेसाठी याहून वेगळे काय लागते?
 

Web Title: Employment eating machines and .... new jobs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.