शिवचरित्राचा ज्ञानकोश ! ... अन् बाबासाहेब खऱ्या अर्थाने ‘शिवशाहीर’ झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:39 AM2021-11-16T05:39:29+5:302021-11-16T06:09:57+5:30
‘आमची तो रीत ऐसी की, गगनाएवढी कामे केली तरी, तळ्याएवढीही न लिहावे’ या गोविंदपंत काळे यांच्या वचनाचा दाखला देऊन मराठीत इतिहास लेखनाला टाकाऊ समजले जाते, याबाबतची चीड त्यांनी राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे
‘शतायुषी भव’ असा आशीर्वाद अनेकांना दिला जातो. परंतु खरोखरच आयुष्याच्या शताब्दी वर्षात पदार्पण करून सारी हयात शिवचरित्र घराघरांत पोहोचविण्याची अजोड कामगिरी करणारा ‘शिवचरित्राचा ज्ञानकोश’ बाबासाहेब पुरंदरे यांच्या रूपाने हरपला आहे. शिवचरित्राला असंख्य पैलू, त्यामध्ये कित्येक जाणिवा त्यामुळे शिवचरित्र कथन करायचे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. परंतु पुरंदरे यांनी २५ डिसेंबर १९५४ पासून सुरू केलेला शिवचरित्र कथनाचा प्रवास थोडीथोडकी नव्हे तर १२ हजारांहून अधिक व्याख्याने झाल्यानंतर वयपरत्वे थांबला. मात्र बाबासाहेबांच्या ठायी असलेला उत्साह अखेरपर्यंत कायम होता. शिवचरित्र निर्माण करण्याकरिता रात्रभर दप्तरे चाळायची व सामग्री गोळा करायची, अशी अथक मेहनत घेऊन लिहिलेले शिवचरित्र प्रसिद्ध करण्याकरिता एकेकाळी बाबासाहेबांनी मुंबईच्या बाजारात कोथिंबीर विकली होती.
आचार्य अत्रे यांनी या शिवचरित्रावर पसंतीची मोहोर उमटवली आणि मग बाबासाहेब खऱ्याअर्थाने ‘शिवशाहीर’ झाले. गेल्या आठवड्याभरातील आजारपण सोडले, तर सह्याद्रीच्या अवघड व अवाढव्य डोंगररांगा या अवलियाने अक्षरश: उभ्या-आडव्या पायी तुडवल्या होत्या. सनावळी, ऐतिहासिक संदर्भ, घडामोडी मुखोद्गत असलेल्या बाबासाहेबांसोबत गड-किल्ल्याचा प्रवास करायचा, ही तर दुर्गप्रेमींकरिता पर्वणीच असायची. वयाच्या १८ व्यावर्षी ‘सिंहगड’ चित्रपट पाहून बाबासाहेबांच्या मनावर इतिहासाचे प्रेम एखाद्या शिल्पासारखे कोरले गेले. तत्पूर्वी वयाच्या १४ व्यावर्षी शाळेत असताना बाबासाहेबांनी एक छोटेखानी उतारा सादर करून नानासाहेब नारळीकर या मुख्याध्यापकांची शाबासकी मिळवली होती. इतिहासाकडे कुचेष्टेच्या दृष्टीने पाहिले जाते, ही पुरंदरे यांच्या मनातील खंत होती. इतिहासाकडे मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले तरी चालेल; पण इतिहास ही दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट नाही. भविष्यातील अनेक संकटांच्या सूचना इतिहास देत असतो, असे ते आवर्जून सांगत. सरहद्दीचा बंदोबस्त करा, ही शिवरायांच्या मनात असलेली जाणीव पेशव्यांच्या मनात नव्हती. पेशव्यांची ती चूक होती, असे ते स्पष्टपणे सांगत. शिवाजी महाराज हे राष्ट्र उभारणी करणारे होते. ‘इस्टेट बिल्डर’ नव्हते, असे ते सांगत. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना, लेखन करताना ७० टक्के लिखित माहिती पर्शियन, पोर्तुगीज, अरबी व इंग्लिश अभ्यासकांकडून प्राप्त होते, याबाबत बाबासाहेबांच्या मनात खंत होती.
‘आमची तो रीत ऐसी की, गगनाएवढी कामे केली तरी, तळ्याएवढीही न लिहावे’ या गोविंदपंत काळे यांच्या वचनाचा दाखला देऊन मराठीत इतिहास लेखनाला टाकाऊ समजले जाते, याबाबतची चीड त्यांनी राज ठाकरे यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि दंतकथा याबाबतचे विवेचन करताना, पुरंदरे यांनी त्यांच्याबद्दल घडलेला किस्सा सांगितला आहे. ते एका शाळेत भाषणाला गेले असता, शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांचा परिचय करून देताना शिवचरित्राकरिता पुरंदरे यांनी घरदार विसरून लग्नकार्य केले नाही, असे सांगून टाकले. पुरंदरे यांनी कार्यक्रमानंतर या उल्लेखाबाबत नाराजी व्यक्त केली असता, विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा मिळावी याकरिता, असा उल्लेख केल्याचे सांगितले. पुरंदरे म्हणतात की, कुठल्याही व्यक्तीबद्दल दंतकथा अशाच पसरतात. आपण सांगत असलेले शिवचरित्र हेच शंभर टक्के खरे शिवचरित्र हा आपला दावा नाही. पुढे नवनवीन पुरावे प्राप्त झाले, तर आपण मांडलेले तर्क चुकीचे ठरू शकतील. याचा अर्थ इतिहासकार म्हणून बाबासाहेब हे हटवादी किंवा आपल्याच मताला चिकटून बसणारे नव्हते. नवनवे संशोधन स्वीकारण्याचे मोकळेपण त्यांच्यापाशी होते. बाबासाहेबांनी स्वत:ला शिवचरित्र कथनाला, शिवकालीन वस्तूंच्या संग्रहाला वाहून घेतले असले, तरी आपल्या पुढच्या पिढीनेही आपलाच वारसा चालवावा, असा दुराग्रह त्यांनी केला नाही. ‘जाणता राजा’ या महानाट्याची निर्मिती ही पुरंदरे यांची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला लाभलेली विलक्षण देणगी होती. अफझलखानाच्या भेटीला निघालेले महाराज भावुक मावळ्यांना म्हणाले होते की, “आम्हास दगाफटका झाला तरी राज्य राखावे, राज्य वाढवावे. ज्यास जे काम सांगितले ते त्याने चोख करावे.” बाबासाहेबांच्या पश्चात शिवचरित्राच्या कथनाचे कार्य त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींनी पुढे चालू ठेवणे, हीच शिवशाहिरांना खरी श्रद्धांजली ठरेल.