शांतीदूताची अखेर

By admin | Published: September 29, 2016 04:14 AM2016-09-29T04:14:49+5:302016-09-29T04:14:49+5:30

‘तुम्हाला मुलं असतील तर तुम्ही त्यांना न्याहारीसाठी झेंडे आणि जेवणासाठी बंदुकीच्या गोळ्या देऊ शकत नाही, त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. ते द्या. संघर्षात शक्ती

The End of Peace | शांतीदूताची अखेर

शांतीदूताची अखेर

Next

‘तुम्हाला मुलं असतील तर तुम्ही त्यांना न्याहारीसाठी झेंडे आणि जेवणासाठी बंदुकीच्या गोळ्या देऊ शकत नाही, त्यांना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. ते द्या. संघर्षात शक्ती खर्च करण्यापेक्षा ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि उद्योग यावर पैसा आणि शक्ती खर्च करा, अन्यथा तुम्हाला काहीही भविष्य नाही’, हा सल्ला पाकिस्तानच्या आजच्या शासकांना भलेही लागू पडणारा असला आणि त्यांनी तो अंमलात आणणे त्यांच्याच हिताचे असले तरी प्रत्यक्षात तो वीसेक वर्षांपूर्वी अरबांना दिला होता सिमॉन पेरेस यांनी. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले व इस्त्रायलच्या निर्मितीचा अखेरचा शिल्पकार काळाआड गेला. इस्त्रायलला लष्करीदृष्ट्या सक्षम बनवितानाच शस्त्रास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर बनविणारे पेरेस दोनदा पंतप्रधान म्हणून निवडले गेले व अखेर ते त्या देशाचे अध्यक्षदेखील बनले. मंत्रिमंडळातील सर्व महत्वाच्या खात्यांची जबाबदारी पेलणारे पेरेस ओळखले जातात ते प्रामुख्याने अरब आणि इस्त्रायल दरम्यानच्या संघर्षाची इतिश्री करणारे नेते म्हणून. हा संघर्ष संपवून त्यांनी ख्रिश्चन आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचे प्रमुख ठिकाण असणारे जेरुसलेम तणावमुक्त केले आणि तितकेच नव्हे तर पॅलेस्टिनी लिबरेशन आॅर्गनायझेशनचा (पीएलओ) स्वयंशासनाचा अधिकारही त्यांनी मान्य केला. अत्यंत संघर्षशील व्यक्तिमत्व ते शांतीदूत हा त्यांचा प्रवास मोठा मनोज्ञ ठरला. पीएलओचे यासर अराफत यांच्याशी शांतता करार करण्याबाबत पुढाकार घेताना ते परराष्ट्र मंत्री होते पण त्यांनी तत्कालीन पंतप्रधान यित्झॅक रेबीन यांनाही राजी केले आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या साक्षीने शांती करार केला गेला (ओस्लो अ‍ॅकॉर्ड) व त्या प्रित्यर्थ पेरेस, रेबीन आणि यासर अराफत यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केला गेला. परंतु हा करार जेमतेम सातेक वर्ष टिकू शकला आणि संघर्ष पुन्हा सुरु झाला. तब्बल सहा दशके सिमॉन पेरेस इस्त्रायली राजकारणात सक्रीय होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात खुद्द अमेरिकेशीही संघर्ष निर्माण झाला होता. साहजिकच एक वादग्रस्त नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात ते त्या देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले. त्यामुळे दीर्घ काळची आपली वादग्रस्त प्रतिमा आणि नंतरची लोकप्रियता यापैकी नेमके कोणते सुखकर हे कळत नाही असे ते म्हणत व ते खरे होते.

Web Title: The End of Peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.