एका वाघिणीचा अंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:40 AM2017-10-16T00:40:36+5:302017-10-16T00:41:16+5:30

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक!

End of a Waghini! | एका वाघिणीचा अंत!

एका वाघिणीचा अंत!

googlenewsNext

सात जणांचे बळी घेतलेल्या, चंद्रपूरच्या जंगलातील नरभक्षक वाघिणीचा अखेर करूण अंत झाला. तसाही तिच्या ललाटी मृत्यू लिहिल्याच गेला होता. बंदुकीच्या गोळीऐवजी विजेच्या धक्क्याने जीव गेला, एवढाच काय तो फरक! विजेचा धक्का बसला नसता तर ती कदाचित आणखी दोन-चार दिवस जगली असती. त्या काळात ती आणखी एखाद्याचा बळीही घेऊ शकली असती आणि म्हणून जे झाले ते चांगलेच झाले, अशा प्रतिक्रिया नक्कीच उमटल्या असतील. जंगलांमध्ये अथवा जंगलांनजीक वास्तव्य करणा-या मंडळीच्या व्यथा त्यांनाच ठाऊक! शहरातून पर्यावरण रक्षणासाठी अश्रू ढाळणे, समाजमाध्यमांवर ‘सेव्ह टायगर’च्या ‘पोस्ट’ ‘फॉरवर्ड’ करणे फार सोपे असते, हेदेखील अगदी बरोबर; पण म्ह्णून काय समूळ नष्ट होण्याच्या पंथाला लागलेल्या वंशातील अवघ्या तेरा-चौदा महिन्यांच्या उमद्या जनावराचा जीव घेणेच गरजेचे होते? काला असे नामकरण करण्यात आलेल्या सदर वाघिणीच्या गळ्यात ‘रेडिओ ट्रॅकिंग कॉलर’ होती. त्यामुळे तिच्या सर्व हालचाली वन विभाग टिपत होता. गत काही दिवसात तिने सुमारे ६०० किलोमीटरचा प्रवास केला होता. प्रवासादरम्यान प्रत्येक क्षणी ती नेमकी कुठे आहे, हे वन विभागाला ठाऊक होते. मग असे असताना तिला ठार मारणेच का गरजेचे होते, जिवंत पकडणे का शक्य नव्हते, याचे उत्तर वन विभागाने द्यायलाच हवे. तिला यापूर्वी वन विभागाने पकडले होते, हे येथे ध्यानात घ्यायला हवे. भीतीच्या सावटाखालील नागरिकांनी नरभक्षक वाघास त्वरित ठार मारण्याची मागणी करणे समजून घेता येईल; पण इथे तर वन विभागालाच वाघिणीला ठार मारण्याची घाई झाली होती की काय, अशी शंका येते. वाघिणीला बंदुकीची गोळी घालण्याऐवजी ‘ट्रँक्विलायझर गन’द्वारा बेशुद्ध करणे आणि एखाद्या प्राणी संग्रहालयातील पिंज-यात ठेवणे सहज शक्य होते. हा पर्याय का निवडण्यात आला नाही, हे अनाकलनीय आहे. आधीच पृथ्वीवरून वाघाचा वंश समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगात जेवढे वाघ शिल्लक आहेत, त्यापैकी ७० टक्के एकट्या भारतातच आहेत. हा ठेवा वाचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, की केवळ नरभक्षक झाला म्हणून एखाद्या वाघाला ठारच करायला हवे? मुळात मनुष्य हे वाघांचे भक्ष्य नाही; अन्यथा भारतातील सुमारे १७०० वाघ दर आठवड्यात एक याप्रमाणे वर्षभरात ज्या ८५ हजारावर शिकारी करतात, त्यामध्ये मनुष्यांचाच भरणा अधिक असता! काला तर गेली. किमान यापुढे तरी अशी पाळी येऊ नये, यासाठी वन विभागाचे उच्च अधिकारी आवश्यक ती पावले उचलतील, अशी अपेक्षा करावी का?

Web Title: End of a Waghini!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.