शत्रूचा शत्रू तो मित्र...

By admin | Published: May 23, 2016 03:49 AM2016-05-23T03:49:32+5:302016-05-23T03:49:32+5:30

अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यात फार मोठे सख्य असल्याचा इतिहास नाही.

Enemy of the enemy ... | शत्रूचा शत्रू तो मित्र...

शत्रूचा शत्रू तो मित्र...

Next

केन्द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यात फार मोठे सख्य असल्याचा इतिहास नाही. उलटपक्षी कर्जावरील व्याजदरात कपात करण्याच्या मुद्द्यावर दोहोंमध्ये असलेले मतभेद यापूर्वी उघडही झाले आहेत. देशातील उद्योगांना चालना मिळावी आणि जेणेकरून सरकारी खजिन्यातील आवकेत भर पडावी यासाठी अर्थमंत्री या नात्याने जेटली व्याजदरातील कपातीचे प्रथमपासून आग्रही होते व आजही आहेत. त्याउलट कर्जे स्वस्त झाली तर चलनवाढीचा वेग वाढेल ही राजन यांच्या मनातील भीती असल्याने त्यांनी कधीही जेटली यांना उपकृत केले नाही. चलनवाढ आटोक्यात ठेवण्याची जबाबदारी प्राय: े्नसरकारची असते, तर वित्तपुरवठ्याचे नियंत्रण हा भाग पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतला असतो. त्याबाबत राजन यांनी उघड उघड सरकारच्या कामकाजावर प्रसंगी टीकादेखील केली आहे. अशा परिस्थितीत जेटली यांनीच राजन यांच्याविषयी प्रशंसोद्गार काढावेत आणि त्यांना ‘तीक्ष्ण आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे’ असे विशेषण बहाल करावे याचे काहींना जरूर आश्चर्य वाटू शकेल. पण तसे वाटण्याचे काही कारण नाही. राजन यांची नियुक्ती संपुआच्या द्वितीय सत्ताकाळात झाली होती आणि जोवर संपुआ सत्तेत होती तोवर राजन यांनी त्या सरकारच्या विरोधात कधीही ब्र उच्चारला नाही पण भाजपा सरकारवर मात्र ते प्रत्यही टीका करीत असतात. याबद्दलचा राग व्यक्त करण्यासाठी भाजपाच्या काही खासदारांनी जेटली यांची भेट घेतली असता जेटली यांनी या खासदारांची समजूत काढताना राजन यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण वा कारक म्हणजे भाजपाने अलीकडेच ज्यांना राज्यसभेचे सदस्यत्व बहाल करून उपकृत केले ते सुब्रह्मण्यम स्वामी. स्वामी स्वत:ला थोर अर्थतज्ज्ञ मानतात आणि जेटलींपेक्षा आपणच कितीतरी पटींनी अधिक चांगले अर्थमंत्री होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे. पण स्वामींच्या लक्ष्यावर एकटे जेटली नाहीत, रघुराम राजन हेदेखील आहेत. राजन यांना गव्हर्नरपदाची मुदतवाढ देण्याच्या ते विरोधात आहेत व तसे पत्रदेखील त्यांनी पंतप्रधानांना दिले आहे. या स्थितीत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने जेटलींना राजन यांच्याविषयी ममत्व वाटणे स्वाभाविकच ठरते.

Web Title: Enemy of the enemy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.