माझं नृत्य आनंद देण्या-घेण्यासाठी
By admin | Published: May 29, 2016 03:20 AM2016-05-29T03:20:45+5:302016-05-29T03:20:45+5:30
मला रियालीटी शोमध्ये बोलावलं नाही याचं अजिबात वाईट वाटत नाही. त्यांच्या प्रसिद्धीच्या, टीआरपीच्या, सेलीब्रिटीजच्या, परिमाणामध्ये मी बसत नसेन कदाचित. किंवा खरंच त्यांना
- अश्विनी एकबोटे
मला रियालीटी शोमध्ये बोलावलं नाही याचं अजिबात वाईट वाटत नाही. त्यांच्या प्रसिद्धीच्या, टीआरपीच्या, सेलीब्रिटीजच्या, परिमाणामध्ये मी बसत नसेन कदाचित. किंवा खरंच त्यांना माहिती नसावं माझ्याबद्दल, आणखीही वेगळे प्रॉब्लेम्स असतील. खरंतर, बोलावलं तरी मी जाणार नाही. त्याचीही कारणं महत्त्वाची आहेत.
एकतर माझं नृत्य हे आनंद घेण्यासाठी आणि देण्यासाठी आहे. कुठल्याही स्पर्धेसाठी नाही. मी चांगली नाचते की वाईट हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझ्या गुरूला आणि माझ्या रसिक मायबापांना आहे.
अश्विनीजी, तुम्ही इतक्या सुंदर नाचता हे माहीतच नव्हतं हो आम्हाला. केवळ अप्रतिम, ते म्हणाले. ‘मी शास्त्रीय नृत्यांगना आहे. भरतनाट्यम् नृत्यामधे पदव्युत्तर आहे. इयत्ता सातवीत असल्यापासून नृत्य शिकतेय आणि गेली २0 वर्षे नृत्य शिकवतेय,’ इति मी.
ते, ‘अहो काय सांगता काय? मग, कधीच कशा नृत्याच्या रियालीटी शोमध्ये दिसला नाहीत? कधीच कशा पुरस्कारांच्या कार्यक्रमात, कुठल्या महोत्सवात नाचताना दिसला नाहीत?’
मी हसत हसत म्हटलं, ‘त्यांना कधी बोलवावं वाटलं नाही म्हणून नाही दिसले किंवा कदाचित तुमच्यासारखेच तेही अनभिज्ञ असतील माझ्या नृत्याविषयी!’ मी डोळे मिचकावत हसले अन् पुढे म्हणाले, ‘गंमत केली. पण आता या नाटकामुळे तरी कळलं ना, मग झालं तर! एक कलाकार म्हणून आणखी काय हवं?’ मनातल्या मनात नाटकाला, आमच्या निर्मात्याला, दिग्दर्शकाला धन्यवाद दिले आणि पुढच्या, मला भेटायला थांबलेल्या रसिक प्रेक्षकांकडे वळले. हाच प्रसंग, हेच संवाद ‘संगीत बावनखणी’ या माझ्या नवीन नाटकाच्या पुण्याबाहेरच्या प्रत्येक प्रयोगानंतर माझ्या आणि आलेल्या रसिकांमध्ये घडतो.
खूप वाईट वाटतं की गेली अनेक वर्षे मी नाचतेय. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की मी एक उत्तम शास्त्रीय नृत्यांगना आहे. मान्य आहे की शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम हे कमी होतात, त्याला दुर्दैवाने गर्दी होत नाही म्हणूनही असेल. माझे नृत्याचे बरेचसे कार्यक्रम पुण्यात आणि एकदम देशाच्या बाहेर जास्त झाल्याने इतर लोकांपर्यंत हे पोहोचलेच नाही. मी पूर्णपणे त्यांना कधीच दोष देणार नाही. पण रियालीटी शो हे काही परिमाण आहे का नृत्यांगना म्हणून नावारूपाला यायला? तेथे ज्या नाचतात त्याच फक्त नर्तिका? असं नसतं, पण सामान्यांपर्यंत तेच पोचतं. त्यात त्यांचा काहीच दोष नसतो. म्हणूनच म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं पण काळ सोकावतो. मी रियालीटी शोच्या विरुद्ध नाही. शास्त्रीय नृत्य सोडून बाकी नृत्यप्रकार वाईट, असं मी कधीच म्हणणार नाही. ते सगळे नृत्य प्रकार, मी आमच्या ‘मांदियाळी शब्दतालांची’ या कार्यक्रमातून सादर करते.
ज्यांना माहिती आहे की मी नृत्यांगना आहे ते मला जेंव्हा महोत्सवात, कार्यक्रमात नाचायला बोलवतात तेंव्हा मी लगेचच हो म्हणते आणि तितकीच मेहनत घेऊन, रियाज करून नाचते. मग ते शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकनृत्य, कंटेमपररी, चित्रपटातल्या गाण्यांवरील नृत्य असो! शास्त्रीय नृत्य ते चांगलं आणि बाकीचं वाईट असं नसतंच मुळी. नृत्य हे चांगलंच मग ते कुठल्याही रूपातलं असो. हे सगळेच प्रकार आपापल्या सौंदर्याने नटलेले आहेत. पण जे नाट्यशास्त्र हजारो वर्षांपूर्वी आपल्याकडे रुजलं. विविध प्रांतातल्या वैशिष्ट्यांनी वाढलं आणि त्यातून विविध शैली निर्माण झाल्या त्यातून पुढे त्यांच्या गुरू-शिष्य परंपरा निर्माण झाल्या ते किती अस्सल, टिकाऊ आणि चिरंतन असेल! पण ते पोचायला मात्र अनेक वर्षे जातात. वाईट वाटतं, पण ते जेंव्हा पोचतं, ते थेट आत्म्यापर्यंत पोचतं आणि चिरकालीन असतं.
मला रियालीटी शोमध्ये बोलावलं नाही याचं अजिबात वाईट वाटत नाही. त्यांच्या प्रसिद्धीच्या, टीआरपीच्या, सेलीब्रिटीजच्या, परिमाणामधे मी बसत नसेन कदाचित. किंवा खरंच त्यांना माहिती नसावं माझ्याबद्दल, आणखीही वेगळे प्रॉब्लेम्स असतील. खरंतर बोलावलं तरी मी जाणार नाही. त्याचीही कारणं महत्त्वाची आहेत. एकतर माझं नृत्य हे आनंद घेण्यासाठी आणि देण्यासाठी आहे. कुठल्याही स्पर्धेसाठी नाही. मी चांगली नाचते की वाईट हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझ्या गुरूला आणि माझ्या रसिक मायबापांना आहे. माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे इतर कुणाशीही नाही. ज्यांची मी गुरू आहे, ज्यांच्यासाठी मी नृत्यातील आदर्श आहे अशा माझ्या शिष्यांच्या मनातील नृत्याची प्रतिमा मलाच जपायची आहे. सुज्ञ, सुजाण, खूप वर्षे नृत्याचे धडे गिरवलेल्या शिष्यांची काळजी नसते. त्यांच्या मनात शास्त्रीय नृत्यानं मूळ घट्ट पकडलेलं असतं, त्यांना तत्कालीन गोष्टींचा मोह होत नाही, झालाच तरी त्यांची जमीन त्यांना कळलेली असते. मी त्यांना कायम सांगते कितीही जगभर हिंडलो तरी माणसाला घराची ओढ असतेच, तसंय हे. सगळं करा. पण भारतीय अभिजात कलांना पर्याय नाही. त्यांना खरं- खोटं काय, सांगायची गरज लागत नाही. उलट नाटक, सिनेमा, सिरीअल अशा तिन्ही माध्यमांत रमलेल्या आपल्या ताईने नृत्याचा ध्यास कधीच सोडला नाही, याचा त्यांना अभिमान वाटतो. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात उतरले तेंव्हा, माझ्या गुरू, सुप्रसिद्ध नृत्यांगना डॉ. सुचेता चापेकरांनाही ही भीती वाटली होती की माझा नाच सुटेल. पण त्यांनाही आनंद वाटतो की मी त्यांची भीती फोल ठरवली. पण तसं छोट्या वयात नृत्य शिकायला सुरुवात करणाऱ्या मुलींना समज नसते. त्यांना जे दिसतं तेच खरं वाटतं. त्यामागची सत्यता-असत्यता पडताळून पाहण्याची विवेकबुद्धी त्या लहान वयात नसते. मग त्यांची ताई छान नाचूनही जर जिंकली नाही तर गुरूवरचा विश्वासच उडणार, मग कसली देवाण-घेवाण होणार? संपलंच की सगळं. कलेवरचा नृत्यावरचा विश्वासच उडेल. मला, मी हरण्याचं दु:ख किंवा भीती कधीच वाटली नाही; पण माझ्यामुळे माझ्या शंभर-दीडशे शिष्या हारल्या, मागे फिरल्या तर ते मला कधीच चालणार नाही. पर्यायाने शास्त्रीय नृत्यापासून, आपल्या भारतीय संस्कृती परंपरेपासून तरुण वर्ग लांब राहील.
खरंतर, टेलिव्हिजन हे माध्यम प्रचंड प्रभावी आहे आणि ते घराघरांत पोचलंय. अशा माध्यमाचा वापर भारतीय अभिजात कलांच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी करायला हवा. उत्तम शास्त्रीय गायक, वादक, नर्तक आपल्याकडे ढिगाने आहेत. पण आपल्या दुर्दैवाने एकाही चॅनेलवर शास्त्रीय संगीत, नृत्याचे कार्यक्रम होत नाहीत. पूर्वी दूरदर्शनवर म्हणजे सह्याद्री आणि दिल्ली दूरदर्शनवर असे कार्यक्रम मी पाहिले आहेत. आज त्यातले कितीतरी व्हिडीओ व्हॉट्सअॅप, फेसबुकवर फिरताहेत. तरुण मुलं यू-ट्युबवर जाऊन वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे, वीणा सहस्रबुद्धे, जसराज अशा अनेकांची गाणी ऐकताहेत. दक्षिणेकडे तर अजूनही त्या ‘सूर्या’ आणि ‘सन’ आणि बऱ्याच चॅनलवर त्यांच्या शास्त्रीय नृत्याचे, गाण्याचे कार्यक्रम होतात. का नाही एकही चॅनल असं धाडस करत? एक महत्त्वाचं आहे हे सगळं मांडण्याची पद्धत मात्र बदलायला हवी, आत्ताच्या पिढीला आवडेल असं त्यांच्यासमोर ठेवायला हवं. म्हणजे फक्त वरचं रॅपर बदलायचंय. आतली वस्तू तशीच ठेवून, जी सोन्यासारखी लख्ख आहे. हे सगळं अगदीच लीलया होऊ शकतं. कारण कितीतरी हुशार, शिकलेली, कलात्मक, टेक्निकली परिपूर्ण मंडळी तिथे असतात, त्यांचेही क्रिएटिव्ह हेड असतात. त्यामुळे नवनवीन कल्पनांनी असे कार्यक्रम करायला हवेत, थोडीशी सामाजिक बांधिलकी म्हणून तरी! थोडा काळ जाईल पचायला. पण तेच आवडेल. कारण ते आपल्या मातीतलं असेल. मग ते अस्सल पाहायची आणि ऐकायची सवय लागली ना माणसाला की त्यासारखं दुसरं व्यसन नाही.