पर्यटनाचा मनमुक्त आनंद घ्या; पण जबाबदारीचे भानही ठेवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 07:59 AM2024-07-10T07:59:44+5:302024-07-10T07:59:53+5:30
आजकाल पर्यटनाबरोबरच अपघातांचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. रील्स, व्हिडीओच्या नादात जीव धोक्यात घालणे वेडेपणाचे आहे.
डॉ. अंजली मुळके
माजी वैद्यकीय अधिकारी
मॉन्सून असो की उन्हाळी दिवाळी सुट्ट्या, आजकाल पर्यटनाचे प्रचंड आकर्षणच नाही तर अक्षरशः वेड लोकांना लागलंय. पर्यटन जरूर करावे, पण त्यासाठी काही नियमावली असावी. आपल्यासाठी आणि आपल्याला जगवणाऱ्या निसर्गासाठीदेखील. अन्यथा आनंद मिळवताना केलेले पर्यटन जीवावर बेतू शकते. आजकाल रील्स आणि फोटो, व्हिडीओंमधून प्रसिद्धी मिळवण्याचं वेड जीवावर बेतत आहे.
पर्यटन आपल्या आनंदासाठी असावं, दिखाव्यासाठी नाही. पर्यटन करताना, सुरक्षिततेसाठी किमान काही खबरदारी घेतलीच पाहिजे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रील्स, फोटो, व्हिडीओच्या नादात कोणीही अतिरेकी धाडस करू नये आणि आपला तसेच आपल्या कुटुंबीयांचा, इतरांचा जीव धोक्यात घालू नये. सध्या हे प्रमाण नको इतके वाढले आहे. इतरही काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
सहलीच्या काही दिवसांपूर्वी सर्व सुरक्षितता उपायांनी युक्त उपकरणे आपल्यासोबत घेऊन सहलीचे नियोजन करा. ही यादी तपासल्याशिवाय घराबाहेर पडू नका. पर्यटनस्थळांची संपूर्ण महिती घेऊनच त्याची निवड करा. त्याबद्दल तपशीलवार माहिती निघण्याआधीच मिळवून ठेवा. स्थानिक पोलिस, रुग्णालये आणि बचाव पथके यांचे संपर्क क्रमांक तसेच पत्ते तुमच्याकडे ठेवा. कमीतकमी एखाद्या तरी मित्रासह सहलीचे नियोजन करा. एकटे जाऊ नका. लहान मुले आणि वृद्धांसोबत जात असल्यास त्यांची अधिक काळजी घ्या. त्यांना कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी जाऊ देऊ नका.
अनोळखी पाणवठ्यांमध्ये जाणे टाळा. तेथील पाण्याची खोली आणि प्रवाहाच्या वेगाबद्दल आपल्याला कल्पना नसते. तेथील पाण्याच्या परिस्थितीची; जसे की भरतीच्या वेळा, जलस्रोतांचे तपशील इत्यादींची माहिती आधीच मिळवा. तरीही, वेगवान प्रवाहात उतरणे टाळाच. कोणत्याही समुद्राच्या, ट्रेकिंगच्या किंवा जंगल सफारीला भेट देताना स्थानिक प्रशिक्षकाची अवश्य मदत घ्या. जल पर्यटन करताना, बोटीत चढण्यापूर्वी नेहमी लाइफ जॅकेट घाला. बोटीची स्थिती, आसन क्षमता आणि बोट ऑपरेटरबद्दल आधी जाणून घ्या.
आपण ज्या ठिकाणी जात आहोत, तिथे नेहमी इतरांना दृश्यमान असण्याचा प्रयत्न असू द्या. इतरांना दिसू शकू अशा पद्धतीने वावर ठेवा. एकटे राहू नका. ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहात तिथल्या धोक्यांबद्दल माहिती असू द्या. उदाहरणार्थ, प्राणी, स्थानिक बदलते हवामान इत्यादी. ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथल्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या जागा माहीत असायला हव्यात.
तुमच्या बॅगमध्ये पुरेशा प्रमाणात खाण्याचे कोरडे पदार्थ, स्नॅक्स, पाण्याच्या बाटल्या असू द्या. प्रवासात पाणी पीत रहा. मद्य टाळा.
पर्यटनाचा आनंद घेताना सोबतच नेहमी स्वतःला अलर्ट ठेवा. जर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच, तर त्यासाठी तयार रहा. प्रथमोपचार किट आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने काही आपत्कालीन औषधे तसेच आपली सध्याची चालू असलेली औषधे आवर्जून सोबत ठेवा.
तुम्हाला आणि तुमच्या टीमला CPR आणि काही आपत्कालीन प्राथमिक उपचारांबद्दल माहिती असायला हवी. त्याचे प्रशिक्षण घ्या. कुठलीही आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास जवळच्या मदतीसाठी त्वरित संपर्क साधा. आणीबाणीची परिस्थिती आल्यावर ती कशी हाताळायची, हे आपल्या मुलांनादेखील सांगा. कोणत्याही स्थितीत त्या प्रादेशिक ठिकाणांचे नियम मोडू नका.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, निसर्ग आपला मित्र आहे, हे जाणून त्याला नुकसान न पोहचवता निसर्गाचा आनंद घ्या, त्याच्याकडून शिका. निसर्ग आपल्याला जगवतो. त्यालाही जगवा. पर्यटनाचा आनंद घ्या, पण स्वतः सुरक्षित रहा आणि इतरांनाही सुरक्षितता द्या. सुरक्षेची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असली तरीही, पर्यटनस्थळी होत असलेल्या सर्वच अपघातांना त्यांनाच जबाबदार ठरवता येत नाही. ते त्यांचे काम करतील, पण आपल्या सुरक्षिततेची प्रमुख जबाबदारी आपलीच आहे याची जाणीव असावी. तसे झाले तर पर्यटनस्थळी अपघात होणार नाहीत आणि आपल्याला निसर्गाचा मनमुक्त आस्वाद आणि आनंद घेता येईल.