मोहन प्रकाशांच्या उचलबांगडीने राज्यात आनंद

By अतुल कुलकर्णी | Published: June 25, 2018 04:05 AM2018-06-25T04:05:43+5:302018-06-25T04:05:53+5:30

तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र काँग्रेसला नवीन आणि सक्षम प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने मिळाले आहेत

Enjoyment of the joy of the state by the pursuit of Mohan Prakash | मोहन प्रकाशांच्या उचलबांगडीने राज्यात आनंद

मोहन प्रकाशांच्या उचलबांगडीने राज्यात आनंद

googlenewsNext

तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र काँग्रेसला नवीन आणि सक्षम प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने मिळाले आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रभारी म्हणजे माणिकराव ठाकरे आणि शरद रणपिसे या दोघांचीच नावे घेतली जात होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांचे आपापसात पटत नसले तरी मोहन प्रकाश राज्याचे प्रभारी नको, यावर दोघांचेही एकमत होते. दिल्लीतून कोणताही बडा नेता आला की त्यांच्या पत्रकार परिषदेत मोहन प्रकाश यांना कधी बदलणार हा प्रश्न कायम असायचा. जणू काही मोहन प्रकाशना बदलणे म्हणजे बेळगाव सीमाप्रश्नच बनला होता. अगदी काही दिवसांपूर्वी पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत आले, त्यांनी कथित तीन मिनिटांची पत्रकार परिषद घेतली पण तेथेही मोहन प्रकाश यांना कधी बदलणार हाच विषय चर्चेत होता.
राज्यात ठरावीक नेत्यांना जवळ करायचे, आपले निर्णय लादताना परिस्थितीचा विचारच करायचा नाही याचे फटके कारण नसताना राज्यात काँग्रेसला बसले. पालघरची जागा काँग्रेसने लढवू नये असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सांगत होते पण त्यावर याच मोहन प्रकाश यांनी आग्रह करून ती जागा आपणच लढायची असा आग्रह धरला. काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी पालघरमधून उमेदवारी मागूनही त्यांच्या बाबतीत मोहन प्रकाश यांनी शेवटपर्यंत निर्णय घेतला नाही. शेवटी ते भाजपात गेले आणि विजयी झाले. गोंदियातसुद्धा नाना पटोलेंना तिकीट देण्याचा विचार मोहन प्रकाश आणि माणिकराव ठाकरे यांनी हाणून पाडला.
सगळ्यात गंभीर प्रकरण घडले ते विधानपरिषद निवडणुकीच्यावेळी. अमरावती मतदारसंघात काँग्रेसकडे १२८ तर राष्टÑवादीकडे ३२ अशी एकूण १६० मते होती. येथून काँग्रेसने अनिल मधोगडिया यांना उभे केले होते. त्यांना १६० पैकी फक्त १७ मते मिळाली. स्वत:च्या पक्षाची मतेही त्यांना मिळू शकली नाहीत. या निवडणुकीची जबाबदारी माणिकराव ठाकरे व यशोमती ठाकूर यांच्याकडे होती. मात्र या दारुण पराभवानंतरही मोहन प्रकाश यांनी ठाकरे यांना एका शब्दाने जाब विचारला नाही.
ठरावीक लोकांना सोबत घ्यायचे आणि त्यांच्याच कलाने काम करायचे या वागण्याने राज्यातल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसला फटके बसले. खा. अशोक चव्हाण आणि त्यांच्यात संवादच संपुष्टात आला होता.
अनेक जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष निवडताना देखील ठरावीक लोकांनाच जवळ करायचे, जिल्ह्यातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांना विचारायचे नाही, अशा एककल्ली वृत्तीमुळे राज्यात त्यांच्या बाजूने बोलायला दोन नेते सोडले तर कुणीही उरले नव्हते. मुंबईत संजय निरुपम यांना ते सतत पाठीशी घालतात असा आरोप होत असे. परिणामी सतत त्यांच्याविरोधात दिल्लीत तक्रारी जाऊ लागल्या. ए.के. अ‍ॅन्टोनी यांच्यानंतर राज्यात प्रभारी म्हणून आलेल्या मोहन प्रकाश यांची कारकिर्द अखेर संपुष्टात आली आहे.
आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे प्रभारीपदाची सूत्रे आली आहेत. खर्गे अभ्यासू आहेत. शिवाय दिल्लीत ते पक्षाचे लोकसभेत नेते आहेत. परिणामी अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही बड्या नेत्यांना आपल्या शब्दात ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. शिवाय त्यांना मराठी समजते. त्यामुळे येत्या काळात राज्य काँग्रेसमध्ये मोठे बदल घडले तर आश्चर्याचे कारण नाही.
- अतुल कुलकर्णी

Web Title: Enjoyment of the joy of the state by the pursuit of Mohan Prakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.