टीव्हीवरील मनोरंजन होणार अधिक व्यक्तिकेंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 03:47 AM2019-11-21T03:47:02+5:302019-11-21T03:49:51+5:30

सर्वत्र आज साजऱ्या होणाऱ्या जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त या माध्यमातील बदलांचा धांडोळा...

The entertainment on TV will become more customized in future | टीव्हीवरील मनोरंजन होणार अधिक व्यक्तिकेंद्रित

टीव्हीवरील मनोरंजन होणार अधिक व्यक्तिकेंद्रित

googlenewsNext

डॉ. दीपक शिकारपूर. उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक

डिसेंबर, १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २१ नोव्हेंबरला ‘जागतिक दूरचित्रवाणी दिन’ म्हणून घोषित केला. आपल्याकडे देशात राष्ट्रीय प्रसारण १९८२ पासून सुरू झाले आणि तेव्हापासूनच टीव्हीचे रंगीत संच उपलब्ध केले गेले. आता ते घरोघरी आढळतात. पूर्वी फक्त श्रीमंतांकडे असणारे टीव्ही स्वस्त झाल्याने आता सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत.

टीव्ही हा विसाव्या शतकातील महत्त्वाचा शोध मानायला हवा. फार पूर्वीपासून रोटी-कपडा-मकान या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या गेल्या आहेत. बदलत्या काळानुसार यात जरा भर घालून टीव्हीवरील मनोरंजन, वीज आणि इंटरनेट या तीन बाबींचाही समावेश केला गेला पाहिजे. हे माध्यम आता माहिती, मनोरंजन व शिक्षणाचा प्रमुख स्रोत आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात हे माध्यम महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अनेक एकट्या ज्येष्ठ नागरिकांचा तो लोकप्रिय विरंगुळा आहे. इडियट बॉक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माध्यमाने जनसामान्यांवर एवढा प्रभाव टाकला आहे की, चॅनेलवरील कार्यक्रमांप्रमाणे अनेक जण आपले वेळापत्रक बनवतात. पुस्तके व वृत्तपत्रांप्रमाणेच टीव्ही पाहण्याबाबतही तशीच क्रांती झाली आहे. त्यातील तंत्रात गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदल होत गेला आहे. डीटीएच म्हणजेच डायरेक्ट टू होममुळे आपल्या पसंतीच्या वाहिन्या पाहून तेवढेच शुल्क देणे शक्य झाले आहे. या मनोरंजनावर नियंत्रण ठेवणारी-त्याच्या दराचे नियंत्रण करणारी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणावी लागली, यातून त्याचे महत्त्व लक्षात यावे. मल्टिप्लेक्समधील चित्रपटदेखील हल्ली उपग्रहावाटे थेट प्रक्षेपण करून दाखविला जातो.



गेल्या दशकापासून करमणुकीची व्याख्या थोडीशीच बदलली असली, तरी ती मिळविण्याच्या मार्गांत आणि पद्धतींमध्ये मात्र क्रांतिकारी बदल झाला आहे आणि अनेक नवी दालनेदेखील खुली झाली आहेत, असे निश्चितच म्हणता येईल. आता तर पूर्ण लांबीचे व्यावसायिक चित्रपटदेखील थिएटरमध्ये आधी प्रदर्शित न होता थेट यू ट्यूब, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइमसारख्या माध्यमांमधून जगभर प्रदर्शित होतात. अनेक निर्माते त्यांची उत्पादने थेट वेबवर प्रसारित करू लागले आहेत.
 



आताच्या काळात दूरचित्रवाणी या माध्यमाला एक तगडा स्पर्धक स्मार्टफोनमुळे जन्माला आला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. टीव्हीवरील प्रसारण यापुढे टेलिव्हिजन स्क्रीनपुरते मर्यादित नाही. आपण आता ते मोबाइल, टॅब, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरही पाहू शकतो. मायक्रोसॉफ्ट आणि गूगल व्हर्च्युअल, ऑगमेंट आणि मिक्स्ड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. त्याचबरोबर, स्मार्ट आरसे (काच) हे तंत्रज्ञान अद्ययावत होत आहे. हे तंत्र पारंपरिक टीव्ही संच हद्दपार करू शकते. अजून एक तंत्रज्ञान म्हणजे गुंडाळता येणारे पडदे. यामुळे संच जी जागा अडवतो, त्याची गरज नाही व आपण हे स्मार्ट पडदे घरात किंवा कुठेही कुठल्याही ठिकाणी सहज हलवू शकतो. प्रचलित टीव्ही संच याबाबतीत कुचकामी आहेत. या सर्व प्रसारण सेवा इंटरनेटद्वारे, व्हिडीओ-ऑन-डिमांड (व्हिओडी) द्वारे कार्य करतील. आत्ताही सर्व वाहिन्यांचे कार्यक्रम लगेच यू ट्यूब व वाहिन्यांच्या वेबसाइट आणि अ‍ॅपवर त्वरित उपलब्ध आहेत व बव्हंशी जाहिरातींच्या व्यत्ययाशिवाय. त्यामुळे त्यांना जगभर प्रेक्षक वर्ग मिळत आहे. पूर्वी हे जागतिकीकरण शक्य नव्हते.



टीव्ही आणि व्हिडीओचे जाहिरातदार या नव्या स्वरूपाशी जुळवून घेत आहेत आणि जाहिराती अधिक वैयक्तिक-व्यक्तिकेंद्रित करण्यावर भर देत आहेत. वापरकर्त्याच्या डेटाचे विश्लेषण करून संभाव्य ग्राहकांचे लाभ वाढविण्यावर भविष्यातील मार्केर्टिंगचा भर आहे. वैयक्तिक व्हर्च्युअल व्ह्युइंग लाउंज- जेथे मित्र आणि कुटुंब एकत्रित मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी एकत्र जमू शकतात, असे ठिकाण- मग ते जगात कुठेही असले, तरी ते लिव्हिंग रूमची व सिनेमा थिएटरची जागा घेतील. २०३० सालापर्यंत प्रसारकांनी दर्शकांच्या सध्याच्या मन:स्थितीवर आधारित जाहिराती देणारी ‘बिग डेटा’ वापरण्याची कला अधिकाधिक विकसित होईल. आपण हे कार्यक्रम कोणाबरोबर पाहात आहोत, यावर आधारित असलेली माहिती आत्मसात केली असेल, तर आपल्या संभाषणानुसारही या जाहिराती सतत बदलतील. त्याची चुणूक सध्या काही प्रमाणात मिळते आहे. ते तंत्रही अधिक आधुनिक स्वरूपात आपल्यासमोर येईल. एकंदर काय, तर जे वॉकमनचे झाले, तेच टीव्ही संचांचे होणार आहे. अजून पंधरा वर्षांनी तेही इतिहासजमा झाले असतील. कालाय तस्मै नम: हेच खरे!

Web Title: The entertainment on TV will become more customized in future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.