मराठी तरुणाईसाठी उद्योजकतेची प्रेरक गाथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:14 AM2018-02-23T03:14:47+5:302018-02-23T03:15:26+5:30
हणमंत गायकवाड यांच्या उदाहरणावरून ‘तुझ्यात कर्तृत्व आहे’ हे तरुणांच्या मनावर ठसवून एकमेकांनी त्यांना मदत करावी. तरुणांनी केवळ स्वत:चेच नव्हे, तर इतरांचेही आयुष्य घडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शरद पवार यांनी के
हणमंत गायकवाड यांच्या उदाहरणावरून ‘तुझ्यात कर्तृत्व आहे’ हे तरुणांच्या मनावर ठसवून एकमेकांनी त्यांना मदत करावी. तरुणांनी केवळ स्वत:चेच नव्हे, तर इतरांचेही आयुष्य घडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राज ठाकरे यांनी घेतलेली महामुलाखत संपूर्ण राज्यात गाजत आहे. वेगवेगळे राजकीय अर्थ काढून धमाकेही होत आहेत. मुलाखतीत महाराष्टÑाच्या नवनिर्माणाचे स्वप्न असणाºया या दोन दिग्गज नेत्यांचा संवाद रंगला. त्यातून येथील समाजाला विशेषत: तरुणाईला काय मिळाले, असा प्रश्न कोणी विचारला, तर ‘उद्योजकतेचा प्रेरणामंत्र मिळाला,’ असे म्हणता येईल. राज ठाकरे यांनी मुलाखतीची सुरुवात करतानाच ‘महाराष्टÑाला पडलेले प्रश्न मी विचारणार आहे. या प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांच्याकडून मिळणार नसतील, तर कोणाकडून मिळणार?’ असे म्हणत महाराष्टÑाचे प्रबोधन घडावे, अशी आश्वासक सुरुवात करून अपेक्षा उंचावली. काही प्रमाणात ती फलद्रूप झाली. अजूनही काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे अपेक्षित होती. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात अस्वस्थता आहे. याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होत आहे; पण त्याच संदर्भातील दुसरा विचार शरद पवार यांनी सोदाहरण मांडला. भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांचे उदाहरण महाराष्टÑाच्या नव्या पिढीला दिले. शरदरावांसारखा तोलूनमापून बोलणारा नेता गायकवाड यांचे मुक्तकंठाने कौतुक करतो, याला विशेष महत्त्व आहे. हणमंतराव हे सातारा जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यातून पुण्यात आले. नोकरी केली; परंतु तेथे मन रमले नाही. स्वत:चे वेगळ काहीतरी करायचे, असे ठरवून व्यवसाय सुरू केला. तोदेखील खूप काही ग्लॅमरस नाही, तर स्वच्छतेचा म्हणजे हाऊसकीपिंगचा. हे खºया अर्थाने इनोव्हेशन आणि आजच्या भाषेतील स्टार्टअप होते. यातून या व्यवसायाला प्रतिष्ठा देताना तब्बल ७० हजार जणांच्या हाताला त्यांनी काम दिले आहे. एका अर्थाने या ७० हजार कुटुंबांचे गायकवाड हे पोशिंदे झाले आहेत. संसद, राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे घर यापासून देशातील मोठमोठी कॉर्पोरेट हाऊस, रुग्णालये, देवालये यांचे काम आज बीव्हीजी ग्रुपकडे आहे, याचे पवार यांनी जाहीर कौतुक केले. गायकवाड यांच्या कर्तृत्वाला संधी मिळाल्यानेच हे शक्य झाले. हणमंत गायकवाड यांच्या उदाहरणावरून ‘तुझ्यात कर्तृत्व आहे’ हे तरुणांच्या मनावर ठसवून एकमेकांनी त्यांना मदत करावी. तरुणांनी केवळ स्वत:चेच नव्हे, तर इतरांचेही आयुष्य घडवावे, फुलवावे, असे आवाहन त्यांनी केले. गायकवाड यांच्या कर्तृत्वाची गाथा येथेच संपत नाही, तर त्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. शेती विषमुक्त होतानाच परवडणारी व्हावी, असा ध्यास आता गायकवाड यांनी घेतला आहे. शेतकºयांचे उत्पादन वाढल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी त्यांनी शेतीमध्ये नवे तंत्र विकसित केले. बीव्हीजी लाईफ सायन्सेसने ‘हर्बल नॅनो टेक्नॉलॉजी’ विकसित केली आहे. सेंद्रिय शेतीतून उत्पादकता आणि उत्पन्न वाढविणे शक्य होते. पिकासाठीचा खर्च कमी आणि पन्नास ते दोनशे टक्के उत्पादन कसे वाढते, पिकांची निरोगी वाढ होते. यातून शेतकरी समृद्ध कसा होऊ शकतो, याचे सादरीकरण गायकवाड यांनी नीती आयोगासमोर पंतप्रधानांच्या उपस्थितीत केले. या तंत्राचा वापर करून शेतीमध्ये उत्तुंग कामगिरी करणाºयांचा गौरवही या कार्यक्रमात करण्यात आला. आज बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे महाराष्ट्रापुढील ज्वलंत प्रश्न आहेत. हणमंत गायकवाड यांनी या प्रश्नावर दिलेल्या कृतिशील उत्तराच्या उदाहरणातून शरद पवार यांनी तरुणाईला दिशादर्शनच केले आहे.
- विजय बाविस्कर