World Environment Day: पर्यावरण आणि भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:33 AM2020-06-05T05:33:25+5:302020-06-05T05:33:46+5:30
तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या संकटांना वृद्धिंगत करणारे प्रदूषण रोखण्यात आम्ही सफल ठरलो तरच आमचे जगणे सुसह्य होईल; पण विकासाच्या भ्रमात मग्न असलेल्या धोरणकर्त्यांना ही वस्तुस्थिती कशी कळणार..?
२०१९ सरता सरता जगाला कोरोनाची देणगी आणि प्रचंड अस्थैर्याची भावना देऊन गेले. तसे या वर्षाबरोबर सरलेले दशकही अनेक दाहक जाणिवा देणारे होते. जमेचे असे काहीच या दशकाने दिले नाही. दिले ते असंवेदनशील नेतृत्व, ढेपाळलेल्या अर्थव्यवस्था, अनावश्यक संघर्ष आणि भयावह हिंसा. याच दशकात आपल्याला वातावरण बदलांच्या परिणामाचे इशारे प्रत्यक्षात उतरताना दिसले. पृथ्वीतलावरची उष्णता वाढली. उष्मा, थंडी, पाऊस... सगळ्यांनीच मर्यादा ओलांडली. वातावरण बदल, पर्यावरणीय ºहास हे आता दिवाणखान्यात बसून चणेफुटाणे खात चघळायचे विषय राहिलेले नाहीत. त्यांची धग मानवतेला जाणवू लागली आहे.
सुंदर भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या युवकांना तर ती फारच तीव्रतेने जाणवते आहे. म्हणूनच तरुण पिढ्या अस्वस्थ आहेत. प्रगती आणि विकासातून उदरभरणाची, वैयक्तिक विकासाची दालने खुली होतील, हा समज खोटा ठरला आहे. संसाधने आणि नोकºया गायब होताहेत. तरुणाईच्या असुरक्षिततेच्या भावनेला वाढत्या तापमानाच्या चिंतेचीही किनार आहे. अवघ्या काही वर्षांत हा ग्रह मानवी वस्तीसाठी अयोग्य होईल, याची जाण कोवळ्या नागरिकांना आलेली आहे. म्हणूनच पैशांच्या बळावर सरकार आणि प्रशासनांना वाकवत आपले पर्यावरणविरोधी मनसुबे तडीस नेणाºया बहुराष्ट्रीय कंपन्यांना तोडण्याच्या मोहिमेला पश्चिमेत दिवसेंदिवस बळ लाभते
आहे; पण प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहणे अवघड असल्याचेही या तरुणांना कळते आहे. त्यातून येणारे नैराश्य हिंसेच्या पातळीवर उतरण्याआधीच व्यवस्थेला त्यांच्या अस्वस्थतेची चिकित्सा करावी लागेल. गरीब देशांतल्या तरुणांसमोरल्या संधीही गायब होऊ लागल्या आहेत. आपल्या वाडवडिलांच्या शेती व्यवसायात त्यांना स्वारस्य नाही. शेती किफायतशीर राहिलेली नसून, आता लहरी बनलेल्या पावसावर तर भरवसाच ठेवता येणार नाही, अशीच भावना या देशांत वाढते आहे.
कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यापेक्षा ज्यांच्याकडे संसाधने आहेत त्यांच्याकडून ती खेचून घेण्याच्या ऊर्मी अनेक ठिकाणी उसळताहेत. अराजकाला निमंत्रण देणाºया या घटनांच्या मुळाशी वातावरण बदल आहे. त्यानेच जीवन अनिश्चित बनविले आहे. व्यवस्थेला याचीही दखल आज ना उद्या घ्यावीच लागेल. ९०च्या दशकात वैश्विकीकरणाच्या ऊर्मींनी उचल खाल्ली. त्यातून जागतिक सुबत्ता येईल, अशी स्वप्ने लोकांना दाखविली गेली. प्रत्यक्षात वैश्विकीकरणाचा लाभ उठविला तो बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांनी. स्वस्तात श्रम मिळतील त्या देशात जायचे आणि आपण उपकार केल्याच्या आविर्भावात सवलती शोधत पर्यावरणावर हवे तसे अत्याचार करायचे, हे या कंपन्यांचे धोरण जगाला कळेपर्यंत बरेच आणि कधीच भरून न येणारे नुकसान झाले होते. आताही या कंपन्या अनेक अगतिक देशांच्या संसाधनांना मातीमोल भावाने प्राप्त करून आपल्या तिजोºया भरताहेत. गाफील धनाढ्यांना भुलवत प्रदूषणाचे विक्रम रचताहेत. परिणामी, महानगरे विषारी वायूचे टाईमबॉम्ब झाले आहेत. तासभर पाऊस पडला तर ती तुंबतात आणि नंतर अनेक रोगांनी जर्जर होतात. पर्यावरणासाठी काही करायला हवे म्हणत आंतरराष्ट्रीय समुदाय दरवर्षी एकत्र येतो. तेथे बडी राष्ट्रे गरीब देशांवर लाथा झाडतात. आपल्या चुकांची भरपाई त्यांनी करावी असे सुचवितात आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे सूप वाजते.
अमेरिकेने किंवा चीनने पर्यावरणावरल्या आपल्या अघोरी अत्याचारांविषयी क्षणभर तरी पश्चात्ताप केल्याचे आजवर ऐकिवात नाही. गरीब देशांना ओलीस धरून पर्यावरणाचे प्रश्न सुटणार नाहीत. उलट निर्बंधांचे ओझे त्यांना आणखीन गरिबीकडे ढकलेल. त्यातून पुन्हा अराजकाला निमंत्रण मिळेल. आज आफ्रिका खंडातला संसाधनांचा तुटवडा लोकांच्या लोंढ्यांना युरोपच्या दिशेने नेतो आहे. जिवावर उदार होत, कायदेकानून वाकवत शरणार्थी सधन देशांकडे धाव घेताहेत. या स्थलांतराचे मूळ पर्यावरणाच्या ºहासात आहे, हे सधन देशातील धोरणकर्त्यांना कळेल तेव्हाच पृथ्वीला काही भवितव्य राहील, अन्यथा येथे वास्तव्य करणे कठीण असल्याची जाणीव मनुष्यकुळाला होण्याचा दिवस दूर नाही, तो अत्यंत समीप येऊन ठेपलेला आहे.