पर्यावरण पोषक विधायक पाऊल

By admin | Published: September 22, 2016 05:55 AM2016-09-22T05:55:21+5:302016-09-22T05:55:21+5:30

शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणारा पुणेकरांचा गणेशोत्सव हा पर्यावरण पोषकतेकडे वाटचाल करीत आहे.

Environmental Nutrition Legislative Step | पर्यावरण पोषक विधायक पाऊल

पर्यावरण पोषक विधायक पाऊल

Next


शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणारा पुणेकरांचा गणेशोत्सव हा पर्यावरण पोषकतेकडे
वाटचाल करीत आहे...
भक्तिमय वातावरणात घरोघरी सर्वांच्या लाडक्या श्री गणेशाचे होणारे आगमन, वेदमंत्राच्या मंगलमयी वातावरणात होणारी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना, श्रींच्या पूजाअर्चेमध्ये घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या दर्शनाला; देखावे पाहाण्यासाठी गणेशभक्तांनी बहरलेले रस्ते आणि सर्वांवर कळस म्हणजे भावपूर्ण वातावरणात होत असलेले विसर्जन.. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी उत्सवाचे पावि^^त्र्य जपणारी एक उल्लेखनीय बाब म्हणजे श्री गजाननाचे ‘पर्यावरणपूरक विसर्जन’.
गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेविषयी जनजागृतीमुळे उत्सवाकडे पाहाण्याचा नवा दृष्टिकोन विकसित झाला आहे. उत्सवातील पावित्र्य जपताना प्रदूषण टाळण्याबाबतही तरुणाई आग्रही दिसत आहे. यामुळेच घरगुती गणेशमूर्ती बनविण्याच्या तसेच ते घरच्या घरीच विसर्जन करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे महापालिकेने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या सहकार्याने यंदाच्या वर्षी ‘पर्यावरणपूरक विसर्जन’ हा उपक्रम हिरिरीने राबविला. त्यासाठी सुमारे पन्नास हजार किलो अमोनियम बाय-कार्बोनेटचे म्हणजेच खाण्याच्या सोड्याचे वाटप करण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. यामुळे नागरिकांना घरच्या घरी ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करता आले.
पुणे महापालिकेने यासाठी सुमारे साडेपंधरा लाख रुपयांची शंभर टन पावडर खरेदी केली होती. बादलीत ही पावडर मिसळून त्यात मूर्ती विसर्जीत केल्यास २४ तासांत ती विरघळते. ते पाणी व माती घरातील कुंडी अथवा कोणत्याही झाडामध्ये टाकून निसर्गामध्ये विलीन करता येते. ही संकल्पना अनेकांना पसंत पडली. पीओपीच्या गणेशमूर्तींचे प्रमाण वाढत असल्याने विसर्जनानंतर नदी-तलावातील जलजीवन धोक्यात येते. निसर्ग संवर्धनाचा वसा घेतलेल्या संस्था अनेक वर्षांपासून याबाबतची जनजागृती करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांपासून हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याच्या संकल्पनेला अधिकाधिक पाठबळ मिळत आहे.
या वर्षी पुणेकर नागरिकांनी त्याच्याही पुढे जात आणखी एक विधायक पाऊल टाकले आहे. तब्बल चोवीस हजारांहून अधिक गणपती घरच्या घरी बादलीत विसर्जन केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन घरच्या घरी बादलीत केलेले हजारो फोटो व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना पाठविले गेल्यामुळे नकळत त्याचा प्रसार झाला व अनेकांनी आपल्या बाप्पाचे घरच्या घरी ‘बादलीत’ विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणपूरक जागृतीमधून शाळा, सोसायट्यांमध्ये राबविले गेलेले ‘इको फे्रन्डली’ गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा खूप लोकप्रिय झाल्या. विशेष म्हणजे यातून बहुतांश लोकांनी स्वत: बनविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. पर्यावरणाच्या जागृतीच्या बाबतीत यंदा महापालिकेच्या पर्यावरणपूरक विसर्जन या उपक्रमाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. उत्सवाच्या काळात निर्माण झालेले निर्माल्यही थेट नदीत न टाकता अनेकांनी ते निर्माल्य कलशात जमा केले. यंदा गणेशोत्सव काळात शहरात सुमारे सहाशे टन निर्माल्य जमा झाले. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन तसेच निर्माल्य संकलन या साऱ्या उपक्रमास अनेक सोसायट्या, शाळा व सर्वसामान्य नागरिकांनीही दिलेला प्रतिसाद पाहता हे निश्चितच उत्सवाला मिळत असलेले विधायकतेचे सकारात्मक पाउल आहे. घरच्या बाप्पाला पर्यावरणपूरक विसर्जित करण्याच्या महापालिकेने ठरविलेल्या या उपक्रमाला जागरुक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बादली आणि हौदातील विसर्जनाची संख्या यंदाच्या वर्षी तब्बल दोन लाखांवर गेली. शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणारा पुणेकरांचा गणेशोत्सव हा पर्यावरण पोषकतेकडे वाटचाल करीत आहे...
- विजय बाविस्कर

Web Title: Environmental Nutrition Legislative Step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.