गुलामीतून बाहेर पडण्यासाठी इंग्रजीपासून सुटका आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:45 AM2022-09-14T11:45:43+5:302022-09-14T11:46:24+5:30
महाराणी एलिझाबेथ, किंग चार्ल्स, ब्रिटन-भारत संबंध याविषयी माजी केंद्रीय मंत्री नटवर सिंह यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांची बातचीत.
राणी एलिझाबेथ यांचे भारताशी कसे संबंध होते?
सन १९६१, ८३ आणि ९७ अशा तीन वेळा महाराणी भारत दौऱ्यावर आल्या. १९८३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मला राष्ट्रकुल देशांच्या संमेलनाचे मुख्य समन्वयक म्हणून नेमले होते. संमेलनाचे उद्घाटन महाराणींच्या हस्ते झाले. यावेळी मी सतत त्यांच्याबरोबर होतो.
संस्मरणीय अशी काही घटना त्यावेळी घडली का?
मदर तेरेसा यांना राष्ट्रपती भवनात एक इन्व्हेस्टीचर समारंभ आयोजित करून ब्रिटनचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ द्यावा, अशी महाराणींची इच्छा होती. हेमवतीनंदन बहुगुणा यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहून याला विरोध दर्शवला. त्यांचे म्हणणे असे होते की, हा समारंभ केवळ राष्ट्रपतीच आयोजित करू शकतात. इंदिरा गांधी यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून माझ्यावर जबाबदारी टाकली. मी महाराणींना सांगितले की, हा समारंभ राष्ट्रपती भवनात आयोजित होऊ शकत नाही. त्या म्हणाल्या, सगळी निमंत्रणे तर गेली आहेत. माध्यमांना कळविण्यात आले आहे. आता हे थांबवता येणार नाही. मी इंदिराजींच्या कानांवर ही गोष्ट घातली. त्यांच्या वतीने महाराणी यांना मी पुन्हा एकदा म्हणालो, ‘आपला कार्यक्रम तर होऊन जाईल; परंतु विरोधी पक्ष याविषयी भारतीय संसदेत चर्चा उपस्थित करील.’ त्यांच्याही हे लक्षात आले. कार्यक्रम रद्द झाला.
आणि प्रिन्स चार्ल्स?
तेही पाच-सहा वेळा भारतात आले. त्यांचा पहिला दौरा १९७५ मध्ये झाला. त्यावेळी त्यांचे काका आणि भारताचे शेवटचे व्हाॅइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन त्यांच्याबरोबर होते. त्यावेळी अनेक कार्यक्रमांत ते सहभागी झाले. पत्रकार परिषदा झाल्या. ते पोलोचा सामनाही खेळले; परंतु ते लॉर्ड माउंटबॅटन यांच्या सततच्या टोकण्यामुळे त्रस्त झाले होते. कधी कपड्यांवरून, तर कधी दुसऱ्या कुठल्या कारणावरून माउंटबॅटन हे त्यांना सारखे बोलत होते. परत जाताना मी त्यांना पुन्हा भारतातभेटीचे निमंत्रण दिले तेव्हा प्रिन्स चार्ल्स हळूच म्हटले, ‘मी नक्की येईन; पण या माउंटबॅटन यांना बरोबर आणणार नाही.’ मी हसून म्हणालो, ‘सर, तो आपला निर्णय असेल.’
राजे म्हणून चार्ल्स यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील?
ब्रिटनकडे सध्या फारसे पैसे नसतील; परंतु तरीही जागतिक राजकारणात त्यांचे एक महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रकुलात ५४ देश आहेत. चार्ल्स यांना सर्व राष्ट्राध्यक्षांशी बोलून संवाद कायम ठेवावा लागेल. त्याचबरोबर युरोपमधल्या राष्ट्राध्यक्षांनाही भेटावे लागेल. अमेरिकेशी संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
ब्रिटनचे राजे हे नाममात्र राष्ट्राध्यक्ष नाहीत काय?
कोणतेही राष्ट्राध्यक्ष ब्रिटनमध्ये आल्यावर राजांना भेटतात. त्याची तयारी करावीच लागते. येणारे पाहुणे काय सांगतील? त्यांना काय उत्तर द्यायचे, हे ठरवावे लागते. स्वतः ब्रिटनमध्ये किंवा बाहेर दौऱ्यावर जाण्याची तयारी करावी लागते. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून रोज बऱ्याच कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागते.
रस्त्यांची नावे बदलली जात आहेत. गुलामीची मानसिकता दूर करण्यासाठी याचा उपयोग होईल?
इंग्रजांपासून सुटका पाहिजे असेल तर सर्वप्रथम इंग्रजीपासून सुटका मिळवली पाहिजे. जोवर आपण सगळे कामकाज इंग्रजीतून करत आहोत, तोवर गुलामीच्या मानसिकतेपासून आपल्याला सुटका कशी मिळेल? चीन, फ्रान्स, जर्मनी, स्पेन असे अनेक देश आपापल्या भाषांत काम करतात. मग भारतामध्ये इंग्रजीला सर्वोच्च दर्जा का दिला जातो? राष्ट्रपती भवनातून तर ब्रिटिश व्हाॅइसरॉय भारतावर राज्य करत होते. आधी ‘किंग्स वे’ नाव असल्यामुळे राजपथाचे नाव बदलले गेले. तर्कसंगतीनुसार आता जनपथाचा नंबर लागतो; कारण त्या रस्त्याचे नाव आधी ‘क्वीन्स वे’ होते.