साहित्य संघाचे अवसायन

By admin | Published: February 23, 2016 03:02 AM2016-02-23T03:02:35+5:302016-02-23T03:02:35+5:30

राजकारणी माणसे खुर्ची सोडायला सहसा तयार होत नाहीत. राजकारण्यांचा हा आजार साहित्याच्या प्रांतातही आता ‘व्हायरल’ झाला आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर

The essence of the literature team | साहित्य संघाचे अवसायन

साहित्य संघाचे अवसायन

Next

- गजानन जानभोर

राजकारणी माणसे खुर्ची सोडायला सहसा तयार होत नाहीत. राजकारण्यांचा हा आजार साहित्याच्या प्रांतातही आता ‘व्हायरल’ झाला आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनाही हा मोह सोडवत नाही. माणसे आयुष्यभर जेव्हा एखाद्या पदाला घट्ट कवटाळून बसतात तेव्हा त्यांच्या हितसंबंधांबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण होत असतो. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेल्या पण मराठी साहित्यात एका ओळीचेही योगदान नसलेल्या म्हैसाळकरांनी पुन्हा अध्यक्ष होण्यामागे दिलेली कारणे वाङ्मयीन चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा अपमान करणारी जशी आहेत तशीच ती म्हैसाळकरांबद्दल कणव वाटायला लावणारीही आहेत. ‘लायकीची माणसे दिसत नसल्याने नाईलाजास्तव मला अध्यक्ष व्हावे लागले’, अशी लंगडी सबब ते पुढे करीत आहेत. विदर्भ साहित्य संघातच अख्खी हयात घालविलेल्या या माणसाला या पदासाठी लायकीची माणसे दिसत नसतील तर तो दोष त्यांनी स्वत:च्या तथाकथित संघटन कौशल्यात शोधला पाहिजे. या संस्थेत एकाधिकारशाही आहे म्हणूनच म्हैसाळकर पुन्हा अध्यक्ष झाले. पण या हडेलहप्पी वृत्तीविरोधात कुणीही साहित्यिक वा संघाचा सदस्य बोलायला तयार नाही. देशातील ज्वलंत विषयांवर नको तेवढे बोलणारे, लिहिणारे हे सारस्वत अशावेळी दहशतीत का राहतात? हा त्यांच्या व्यवहार कुशलतेचा भाग तर नाही ना, अशी शंका येणे मग अपरिहार्य ठरते.
विरोधात जाऊ शकणाऱ्या दोघा-तिघांना कार्यकारिणीत घ्यायचे, काहींना पुरस्कारांचे गाजर, काहींची कविसंमेलन, परिसंवादात वर्णी लावायची, एवढे केले की ही माणसे आपली तळी उचलतात, हे म्हैसाळकरांना एवढ्या वर्षांच्या राजकारणातून कळून चुकले आहे. साहित्य संघाच्या ९० वर्षांच्या इतिहासात अशी दयनीय स्थिती पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. कसेही करून संस्था मुठीत ठेवायची, ती वाढू द्यायची नाही, सभोवताल ठेंगणीच माणसे ठेवायची, नव्यांना येऊ द्यायचे नाही, उपद्रव्यांना गोंजारून चूप बसवायचे, त्यांच्यातील भांडणे कायम कशी राहतील याची खबरदारी घ्यायची, याशिवाय अन्य कोणतेही उपक्रम सध्या साहित्य संघात होत नाहीत. आणखी एक मजेदार गोष्ट, ‘साहित्य संघाचे बांधकाम पूर्ण करायचे असल्याने मी अध्यक्ष झालो’, असेही एक कारण म्हैसाळकर सांगत फिरत आहेत. त्यांना संघाच्या शाखांची, कार्यक्रमांची चिंता नाही. जयंत्या-पुण्यतिथ्यांपलीकडे इथे काहीच होत नाही. संघाची इमारत पूर्णत्वास नेणे हेच खरे कारण असेल तर म्हैसाळकरांनी पुढील २०० वर्षे अध्यक्षपद सोडू नये, अशीच या बांधकामाची वर्तमान प्रगती आहे.
राम शेवाळकर, सुरेश द्वादशीवारांच्या काळात विदर्भात संघाच्या अनेक शाखा सुरू झाल्या. ग्रामीण भागातील नवोदित तरुणांना त्यांनी लिहिते केले, प्रोत्साहन दिले. आज यातील काहीच शिल्लक राहिलेले नाही. एखाद्या नवोदित साहित्यिकाला पुस्तकाचे प्रकाशन करायचे असेल तर साहित्य संघ त्याला कधीच मदत करीत नाही, निराश झालेला हा नवोदित शेवटी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे जातो. त्याच्या संपूर्ण कार्यक्रमाचे पालकत्व गिरीश गांधी स्वीकारतात. या पद्धतीने झिडकारलेल्या बहुतांश उपक्रमाना ‘आधार’ देण्याचे काम आज हे प्रतिष्ठान करीत आहे. ही गोष्ट साहित्य संघासाठी लाजिरवाणी नाही का?
एकेकाळी विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून विदर्भ साहित्य संघाकडे बघितले जायचे. या संस्थेची वैदर्भीय जनतेशी असलेली नाळ आता तुटली आहे. चंद्रपूरच्या विदर्भ साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव अव्हेरून संघाने त्या तुटलेपणावर कायमचे शिक्कामोर्तब केले आहे. या संस्थेला आता गंज चढला आहे. एखादी संस्था परिवर्तनाला पाठ दाखवते. नव्या रक्ताचा, सर्जनशीलतेचा दु:स्वास करते, सामाजिक प्रश्नांबाबत उदासीन असते तेव्हा त्या संस्थेला जडलेल्या असाध्य आजाराची ती लक्षणे असतात. अवसायनात निघालेल्या दिवाळखोर भूविकास बँकेसारखी या संस्थेची झालेली वर्तमान अवस्था भविष्यातील तिच्या अधोगतीचीच निदर्शकआहे.

Web Title: The essence of the literature team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.