जातिअंताची चिरंतन चर्चा
By admin | Published: May 1, 2015 12:15 AM2015-05-01T00:15:31+5:302015-05-01T00:15:31+5:30
केवळ परिषदांचे, ठरावांचे व मर्यादित आवाका असलेल्यांच्या सहभागाचे उसासे टाकून जातिअंत साधणे शक्य नाही.
केवळ परिषदांचे, ठरावांचे व मर्यादित आवाका असलेल्यांच्या सहभागाचे उसासे टाकून जातिअंत साधणे शक्य नाही.
आजच्या प्रचलित राजकीय व्यवस्थेत जातकारणाच्या भिंती दिवसेंदिवस अधिक बळकट होऊ पाहत असताना कुणी राजकारणी नव्याने जातिअंताचा विचार मांडत असेल तर ते अभिनंदनीय नक्कीच ठरावे, पण यातील व्यावहारिक अडचणींकडे दुर्लक्ष करून यासंबंधातील वाटचाल केली जाणार असेल तर सदर प्रयत्नही वांझोटा ठरल्याखेरीज राहणार नाही, हे अॅड. प्रकाश आंबेडकरादी मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.
जातिअंताचा वा निर्मूलनाचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांनी प्रकर्षाने मांडला. परंतु या सुधारकांनाच आज जातीच्या कुंपणात बंदिस्त करण्याचे प्रयत्न चालले आहेत, हे आपण पाहतो आहोत. आजचे राजकारण, समाजकारण व धर्मकारणही जातींच्या जळमटाने असे काही व्यापले गेले आहे की, त्याचा गुंता सोडविणे अवघड ठरावे. अशात डॉ. बाबासाहेबांचा वारसा लाभलेले, भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी समविचारी पक्ष संघटनांना एकत्र आणून जातिअंताचा एल्गार पुकारला आहे ही तशी समाधानाचीच बाब म्हणायला हवी. त्यादृष्टीने सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळीच्या वतीने नाशकात जातिअंत परिषद घेतली गेली व तित शाळेच्या दाखल्यातूनच जात वगळावी असा ठराव करून त्यादिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले, हेही बरेच झाले. परंतु हे करताना पुन्हा मर्यादित वर्ग-समूहांच्याच सहभागाचे प्रदर्शन घडविले गेल्याने अशातून खरेच जातिअंत घडविता येणार आहे का, याबाबत शंकाच यावी. वैचारिकदृष्ट्या डावे पक्ष याबाबत अधिक जवळचे आहेत हे खरेच, पण म्हणून केवळ त्यांच्या पुढाकाराने जातिअंताचे उद्दिष्ट साधता येणार आहे का? सर्व पक्षातील व समाजाच्या सर्व वर्गातील प्रबुद्ध जनांना सोबत घेतल्याशिवाय यात पुढे जाता येणार नाही. कारण जनगणनेत जातीचा समावेश करण्यासाठी आग्रह धरणाऱ्यांचा हा काळ आहे. या काळावर मात करायची तर लढाईला निघण्यापूर्वीच कप्पेबंद होऊन चालणार नाही.
जातकारणाचे सामाजिक, राजकीय तसेच मानसशास्त्रीय परिमाणही वेगवेगळे आहेत. जात ही जात नाही ती त्यामुळेच. तेव्हा त्या त्या पातळीवर जाऊन जात निर्मूलनाचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. डॉ.नरेंद्र दाभोळकरांनी जातपंचायतीचा विषय हाती घेतला तेव्हा जात हीच एक अंधश्रद्धा आहे, असा विचार ठेवून अंधश्रद्धेचे निर्मूलन करायचे त्याप्रमाणे जातिअंताचा विचार त्या त्या पंचायतींपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उत्सवी परिषदांमध्ये व पुरोगामी विचारसरणीच्या जवळ असणाऱ्या प्रेक्षकांमध्येच अडकून पडण्यापेक्षा जातीच्या जोखडात आपल्या उत्कर्षाच्या संधी हेरणाऱ्या वर्ग समूहांचे प्रत्यक्ष प्रबोधन करणाऱ्यावर भर दिला जावयास हवा. विचारातून खरेच निर्भयता येत असेल तर आचाराकडे वळायला हवे. तो आचार व्यावहारिकतेशी फारकत सांगणारा असल्यानेच वैचारिक गोंधळ व गडबड होताना दिसून येते. मनुव्यवस्थेवर प्रहार करायची भाषा करताना आपणच आपल्या प्रतिमांचे दैवतीकरण करणार असू तर बुद्धिनिष्ठेची हकालपट्टीच घडून येणार. मग कसा साधणार जातिअंत? येथे याच संदर्भाने एक आठवण प्रकर्षाने होणारी आहे. १९९२ मध्ये नाशकातच अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे तेरावे अधिवेशन झाले होते. रायभान जाधव अध्यक्ष राहिलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन करताना प्राचार्य पी. बी. पाटील यांनीही म. फुले यांना अभिप्रेत जातिअंताचा विचार मांडला होता. पण तेव्हाही प्रतिमांच्या नामस्मरणात सारे रेंगाळले होते. परिणामी गाडी पुढे सरकू शकली नाही. जातिअंत घडवून आणायचा असेल तर संधीच्या समानतेतून समता आणावी लागेल हेच खरे. त्याकरिता पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून समतेने व बंधूतेने वागणारे विविध समाज घटकांतील लोक एकत्र आणावे लागतील. विचारांना कृतीची जोड द्यावी लागेल. अन्यथा भगव्या ऐवजी निळा व लाल झेंडा फडकविण्याच्या समाधानाखेरीज फार काही हाती लागणार नाही. अर्थात, आजच्या वाढत्या जात्यंधपणाच्या वादळात किमान एक पणती का होईना फडफडत असेल तर तिच्या वातेभोवती सुजाणांनी हात धरायला हरकत नसावी.
- किरण अग्रवाल