आठवा सूर हरपला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 05:16 AM2017-04-05T05:16:57+5:302017-04-05T05:16:57+5:30

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे जाणे हे म्हटले तर जन्म-मृत्युच्या नैसर्गिक चक्राचे एक आवर्तन.

Euph heart | आठवा सूर हरपला !

आठवा सूर हरपला !

Next

चंद्रशेखर कुलकर्णी,
मुंबई- गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे जाणे हे म्हटले तर जन्म-मृत्युच्या नैसर्गिक चक्राचे एक आवर्तन. पण जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या आणि सांस्कृतिक भावविश्व कमालीचे समृद्ध करणाऱ्या अत्युच्च कोटीच्या कलावंतांचे जाणे हे निव्वळ आवर्तन उरत नाही. जरा-मरणाच्या कालचक्रातून कोणाचीही सुटका नसली तरी जन्म-मृत्युच्या या दोन टोकांच्या मधल्या कर्तृत्वाने व्यक्तीच्या निर्वाणाचा पोत बदलतो. किशोरीताईंनी घेतलेला इहलोकीचा निरोप हे या अर्थाने महानिर्वाणच! गानसरस्वती हे सार्थ बिरूद लागलेल्या किशोरीताईंची गायकी पारलौकिक आणि प्रतिभेचे नवे मापदंड निर्माण करणारी होती. खरेतर अशी विशेषणे त्यांची महती सांगण्यास तोकडी पडतात. ८५ वर्षांच्या आयुष्यातील जवळपास ८२ वर्षे संगीत साधनेला वाहताना त्यांनी भारतीय संगीतात टाकलेली मोलाची भर, त्यांची संगीतनिष्ठा, व्यासंग आणि अभिजात संगीताविषयीची त्यांची तळमळ हे सारे कल्पनातीत आहे. संगीत ही जणू जगन्नियंत्याशी साधावयाच्या संवादाची भाषा असल्याप्रमाणे त्या संगीत साधनेत रममाण झाल्या. त्यातून संपादन केलेल्या प्रभुत्वाचा विनियोग त्यांनी भारतीय संगीताच्या अभिजाततेचा पोत वाढविण्यासाठी केला. स्वान्त:सुखाय कलासाधनेला अध्यात्माच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचे काम या गानससरस्वतीने केले. बुलंद गायकीचा जन्मदत्त वारसा लाभलेल्या किशोरीतार्इंनी तो वारसा नुसता जपला नाही, तर समृद्ध केला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील घराण्यांच्या पारंपरिक रूढ चौकटींच्या पलीकडचा सांगितिक विचार त्यांनी मांडला. संगीताचे प्रयोजन आणि त्याच्या अवस्था, सुरांचा सच्चेपणा तादात्म्याच्या पातळीवर नेऊन त्यातून एक अपूर्व अनुभूती देण्याचे कार्य त्यांच्या साधनेतून झाले. भावगायनापासून स्वरांच्या ‘स्व’भावाला ध्यासपर्वाच्या पातळीवर नेण्याचे मौलिक योगदान त्यांनी भारतीय संगीताला दिले. निसर्गाची हवीहवीशी वाटणारी नाना रूपे जणू गंधासह त्यांच्या गायकीतून बरसत राहिली. त्यात रातराणीचा गंध होता, प्राजक्ताच्या समर्पणाचा भाव होता. चाफ्याचा दरवळ होता. दवबिंदूंची नजाकत होती. विशुद्ध सात्विकतेची अनुभूती त्यांच्या स्वरांतून सहा दशकांहून जास्त काळ ‘कान’ असलेल्या जगाला मिळत राहिली. शब्दप्रधान आणि भावप्रधानतेचा संगम झाल्यावर गायकीतील नवोन्मेष कसा बहरतो, याचा प्रत्यय त्यांच्या गायकीने वारंवार दिला. गायकीच्या अभिव्यक्तीपासून रसनिष्पत्तीच्या सिद्धांतापर्यंत त्यांनी केलेल्या कृतीशील चिंतनातून भारतीय अभिजात संगीत उत्तरोत्तर समृद्ध होत गेलं. कोणताही गानप्रकार त्यांनी वर्ज्य मानला नाही. पण त्या प्रत्येक प्रकाराचा पोत समजून घेतानाच सर्वाधिक प्राधान्य परमोच्च एकतानतेला देताना त्यांनी जगाची पर्वा केली नाही.
स्वरांचे स्वयंभू झाड जेथे सर्वार्थाने बहरते तेथे पोहोचण्याचा ध्यास आयुष्यभर जपलेल्या या गानसरस्वतीच्या गायकीची अनुभूती घेता आली अशा भाग्यवंत रसिकांची संख्याही अमर्याद आहे. स्वरसौंदर्याच्या परिपूर्णतेचा हा साक्षात्कार जणू संगीतातील आठवा सूर बनला. सुरांवर तांत्रिक हुकमत गाजविण्यापेक्षा त्याच सुरांना शरण जाण्याचा मार्ग संगीत साधकांना दाखविताना त्यांनी मांडलेल्या रस सिद्धांताने साधनेच्या बरोबरीने रसास्वादासाठीही एक अपूर्व दालन खुले झाले. ‘स्वरार्थरमणी’ या त्यांच्या ग्रंथाने त्यांच्या सांगीतिक विचारांचा पट रसिक श्रोत्यांपुढे मांडला. सुरांचे खरेखुरे विश्वरूप दर्शन पाहायचे असेल तर अहंभाव, अहंकार सोडून देत या साधनेच्या मार्गाने जावे लागेल, ही गुरुकिल्ली पुढील पिढ्यांना बहाल करणाऱ्या गानसरस्वतीने स्वत: मात्र या अहंभावाला कायमच स्वरमंडलाइतकेच निगुतीने सांभाळले. पण त्यांची स्वत:ची गुणवत्ताच इतकी अफाट होती, की प्रसंगी तो अहं देखील सुरीला वाटू लागायचा. किशोरीतार्इंच्या मूडी असण्याच्या जितक्या कहाण्या आहेत, त्याहून जास्त दंतकथा आहेत. हा आठवा सूर इतका अलौकिक, की त्यांची प्रत्यक्ष भेट न झालेल्यांनाही त्याच्या आस्वादातून अक्षरश: दररोज सरस्वतीच्या साहचर्याची अनुभूती मिळत राहिली. म्हणूनच किशोरीतार्इंचे जाणे निर्वात पोकळी निर्माण करून गेले. त्यासाठीच तर ते महानिर्वाण आहे. आठव्या सुराचे अस्तंगत होणे हा आभास असावा असे यापुढे अनेक वर्षे वाटत राहील, हे पाहण्याचे उत्तरदायित्व त्यांनीच समृद्ध केलेल्या शिष्यांचे आहे. त्याने निदान ही सरस्वती तरी लुप्त होणार नाही.

Web Title: Euph heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.