...तर खासदारकीचा राजीनामाही देईल - नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:03 AM2017-09-25T01:03:06+5:302017-09-25T01:05:36+5:30
निवडून सर्वच येतात. मात्र, काहीजण लोकांचे प्रतिनिधी होतात तर काही ‘धनाचे’. जे धनाचे प्रतिनिधी आहेत, ते दबून राहतील. मी लोकांचा प्रतिनिधी आहे.
निवडून सर्वच येतात. मात्र, काहीजण लोकांचे प्रतिनिधी होतात तर काही ‘धनाचे’. जे धनाचे प्रतिनिधी आहेत, ते दबून राहतील. मी लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे कुणाचीही भीती नाही. प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देईल पण जनतेशी बेईमानी करणार नाही. खा. नाना पटोले यांची कमलेश वानखेडे यांनी घेतलेली मुलाखत.
पंतप्रधान मोदींवर जाहीर टीका करण्याचे धाडस का व कुठून आले ?
- पंतप्रधान मोदी यांनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीत आपण शेतकºयांचे प्रश्न मांडले. मात्र, पंतप्रधान मोदी त्यावर सहमत नव्हते. मी प्रखरतेने शेतक-यांची बाजू मांडली असता त्यांनी मला ‘आपको नही समजता’ असे म्हणत बोलू दिले नाही. खाली बसवले. गरीब, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न मांडणे हे प्रत्येक खासदाराचे कर्तव्य आहे. मला माझ्या कर्तव्यापासून रोखले तर कसे सहन करणार ? मी जे काही बोललो ते उघड व खासदारांसमक्ष बोललो. माझा आवाज गरीब शेतक-यांसाठी उठतच राहील. मला परिणामांची पर्वा नाही.
मोदी-शहा-पटेलांच्या जवळिकीमुळे तुम्ही नाराज आहात ?
- पंतप्रधान मोदी, अमीत शहा व प्रफुल्ल पटेल हे’ ‘त्रिकूट’ मिळून काम करीत आहे, हे काही लपून राहिलेले नाही. पण कोण कुणाच्या जवळ आहे याने मला फरक पडत नाही. विधानसभेचे निकाल लागत असताना भाजपाला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यासाठी प्रफुल्ल पटेलच पुढे आले होते. हीच खरी वास्तविकता आहे.
भाजपा सोडण्याचा विचार आहे का ?
- मी भाजपामध्येच आहे. कुठल्याही पक्षात जायचा विचार नाही. मी शेतकºयांसाठी बोललो ते चूक आहे, असे पक्षाचे म्हणणे असेल व पक्षश्रेष्ठींनी म्हटले तर खासदारकीचाही राजीनामा देऊन टाकील. पण जनतेशी बेईमानी करणार नाही.
लोकसभेचे तिकीट कापल्या जाईल असे वाटते ?
- मला तिकिटाचा मोह नाही. माझी राजकीय सुरुवात जिल्हा, विधानसभा व लोकसभा अपक्ष उमेदवार म्हणूनच झाली आहे. मी भाजपाकडे कधीही तिकीट मागायला गेलो नव्हतो. लोकसभेत मला अपक्ष म्हणून मिळालेली मते पाहून भाजपा नेत्यांनी बोलावून तिकीट दिले होते. ज्या भंडारा-गोंदियात झेंडा लावायला माणसं नव्हती तेथे मी भाजपा उभी केली. मी खुर्ची सोडणारा आहे. त्यामुळे मला तिकिटाची चिंताच नाही. मी फक्त जनतेची चिंता करतो.
काँग्रेसमध्ये घरवापसीचा विचार आहे ?
- मी रोखठोक भूमिका घेतल्यापासून अनेक पक्षांना मी आपलासा वाटू लागलो आहे. अनेक पक्षांकडून मला निमंत्रण मिळाले. मात्र, माझी लढाई राजकीय नाही. मी काँग्रेसचा आमदार असताना एक वर्ष शिल्लक असूनही शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी राजीनामा दिला होता.
सरकारकडून काय अपेक्षा आहे ?
- मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीकडे मी लक्ष ठेवून आहे. कर्जमाफीच्या आॅनलाईन अर्जात ६६ रकाने भरावे लागत आहे. त्याचे प्रिंट आऊट काढले तर साडेपाच फुटाची पट्टी होते. केंद्र व राज्य सरकारने शेतकºयांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर प्रसंगी टोकाची भूमिका घ्यायला मी मागे पाहणार नाही.
kamlesh.wankhede@lokmat.com