भारताच्या रिझर्व्ह बँकेतही सोने खरेदीची धामधूम !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:17 AM2024-05-22T11:17:53+5:302024-05-22T11:18:12+5:30

जागतिक राजकारणात पुढील काळ गोंधळाचा असेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कागदी चलनापेक्षाही सोने हा स्थिरता आणणारा घटक असेल!

Even in the Reserve Bank of India, gold buying frenzy | भारताच्या रिझर्व्ह बँकेतही सोने खरेदीची धामधूम !

भारताच्या रिझर्व्ह बँकेतही सोने खरेदीची धामधूम !

शिवाजी सरकार, प्राध्यापक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली -

अडीअडचणीला उपयोगी पडेल म्हणून गुंज गुंज सोने साठवण्याची परंपरा भारतीय घरांमध्ये पूर्वापार चालत आली. त्याची आठवण देणारा एक निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. भारताची आर्थिक क्षमता टिकून राहावी यासाठी बँक आता सोने साठवत आहे. अर्थव्यवस्थेला एखादा धोका उद्भवलाच तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी हे सोने उपयोगी पडेल असा विचार यामागे असून, देशाच्या घराघरात जो शहाणपणा जपला गेला तोच यातून प्रतीत होतो. रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत ८१७ टन सोन्याचा साठा केला आहे. सोन्याची झळाळी वाढवणाऱ्या काही गोष्टी अलीकडे जागतिक सत्ताकारणात / अर्थकारणात घडल्या. रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायलचा पॅलेस्टाइनवर हल्ला, पश्चिम आशियातील तणाव, यासारखी उदाहरणे यासंदर्भात देता येतील. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने हे पाऊल टाकले आहे.

जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याचा साठा वाढवत आहेत; जेणेकरून अमेरिकी डॉलर्सवरचे अवलंबित्व कमी होईल. चीनने तर गेल्या १७ महिन्यांपासून सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. चलन अवमूल्यन सामावून घेण्यासाठी तसेच भूराजकीय धोके लक्षात घेऊन चीन हे करत आहे. १९७१ सालापासून सोन्यावरचे अवलंबित्व कमी करण्याची भूमिका घेतली गेली होती, आता मात्र जगभरात सोन्यावरची भिस्त पुन्हा वाढताना दिसत आहे.

भारतात शेअर बाजाराची घसरण चालू असताना, बेरोजगारी आणि महागाईचे दर चढे असताना ९ मे रोजी रिझर्व्ह बँकेने खुलासा केला, की आम्ही या घटनांनी चिंतित नाही. लोक आपले पैसे घर खरेदीत गुंतवताहेत.  अमेरिकन डॉलरची स्थिती दोलायमान असताना परकी चलन गंगाजळी घटलीच तर तो धक्का पचवण्यासाठी बँकेने स्वतःहूनच सोन्याची खरेदी केली. अमेरिकेतील चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये ३.२ टक्क्यांपर्यंत गेला. २०२२ सालापासून फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवत आहे. ५.२५ टक्क्यांवरून तो जुलै २०२३ मध्ये ५.५ टक्क्यांपर्यंत गेला. शिवाय आता अमेरिकेत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या वर्षाच्या प्रारंभापासून सोन्याच्या किमतीत १० टक्के वाढ झाली. त्यामुळे चलनवाढीचे धक्के सोसण्याचे आयुध तसेच राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेत आधार देणारे साधन म्हणून सोन्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी लक्षणीयरीत्या खरेदी केल्यामुळे सोन्याचा भाव वधारला. भारतातही २०२४ मध्ये सोन्याचे भाव सतत चढते आहेत.  गेल्या सहा महिन्याiत सोन्याचा भाव ५४ हजारांवरून ७३,९५८ इतका विक्रमी वाढला.

सोन्यापेक्षा दुसऱ्या कशातूनच इतका घसघशीत परतावा मिळत नाही हेच यातून दिसेल; आणि रिझर्व्ह बॅंक योग्य तेच करत आहे याला दुजोरा मिळेल. डॉलरचा भाव सध्या ८३.८८ रुपयांच्या आसपास आहे. पुढच्या सहा महिन्यात रुपयाच्या मूल्यात साधारण दीड-पावणे दोन टक्क्याच्या आसपास वाढ संभवते. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडील डॉलर्सच्या साठ्याचे मूल्य दोन टक्क्यांनी वर्षभरात घटेल. म्हणूनच रिझर्व्ह बॅंकेने डॉलर्सऐवजी आणखी सोने खरेदी करण्याचे ठरवले. ७३ हजारांपेक्षा कमीच भावात हे सोने खरेदी केले गेल्यामुळे बँकेला २० टक्क्यांपर्यंत वाढ मिळाली. हे हुशारीचे अर्थकारण आहे.

गंगाजळीत वैविध्य आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सोने खरेदी वाढवली. सोन्यामुळे ३ अब्ज डॉलर्स इतके मूल्य वाढून भारताची परकी गंगाजळी ६४८.५ अब्ज डॉलर्सवर गेली. २०२४ च्या प्रारंभी बॅंकेने जास्त सोने खरेदी केले. जानेवारी ते मार्च यादरम्यान रिझर्व्ह बॅंकेची सोने खरेदी १९ टनांपर्यंत गेली होती, असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे. २०२३ या संपूर्ण वर्षात बँकेने १६ टन सोन्याची खरेदी केली होती, आणि त्यानंतरच्या फक्त तीन महिन्यांत त्याहूनही जास्त. सध्या अमेरिकेकडे सोन्याचा सर्वांत जास्त - ८१३३ टन इतका साठा आहे. त्यानंतर जर्मनी (३३६६.४९ ) इटली (२४५१.८४) फ्रान्स (२४३६.०१) रशियन महासंघ (२२७१.१६ ) यांचा नंबर लागतो.

अमेरिकेने रशियावर निर्बंध घातल्यानंतर मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी वाढवली. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे हे निर्बंध लावले गेले. रशियाकडच्या डॉलर्सचा साठा गोठवणे तसेच क्रूडवर निर्बंध लावणे अशी ही दंड योजना आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांवर या घटनेचा मोठाच परिणाम होणार असून, पश्चिमी आर्थिक संस्थांची परिस्थिती डळमळीत होईल. शेअर्समधील गुंतवणूकही यामुळे धोकादायक झाली. पुढची काही वर्षे ही अशीच गोंधळाची असतील आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सोने हा स्थिरता आणणारा घटक असेल; याचे विशेष कारण म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग आणि शेअर बाजार दोलायमान स्थितीत असून, स्थिर व्हायला आणखी वेळ लागणार आहे. अशा नाजूक काळात सोन्याची मागणी वाढेल. कागदी चलन फिके पडेल हे उघड होय. भारतीय रिझर्व्ह बॅंकने योग्य पाऊल उचलले असून, अर्थव्यवस्था मजबूत होण्याच्या वाटचालीत त्याचा फायदाच होणार आहे.

Web Title: Even in the Reserve Bank of India, gold buying frenzy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.