सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 07:01 AM2018-05-30T07:01:45+5:302018-05-30T07:01:45+5:30
दादाजी खोब्रागडे अत्यवस्थ आहेत. त्यांना अर्धांगवायू झालेला, ते बोलू शकत नाहीत. जेवणही बंद. खंगलेला देह मृत्यूची वाट पाहत... कोण आहेत हे दादाजी?
दादाजी खोब्रागडे अत्यवस्थ आहेत. त्यांना अर्धांगवायू झालेला, ते बोलू शकत नाहीत. जेवणही बंद. खंगलेला देह मृत्यूची वाट पाहत... कोण आहेत हे दादाजी? वर्तमानाला ठाऊक असते तर त्यांच्या हलाखीची अशी बातमी झाली नसती. दादाजींनी शोधलेल्या तांदळाच्या वाणांमुळे आपले साऱ्यांचे जगणे बदलले. तांदळाचे नऊ वाण त्यांनी विकसित केले. अगदी डॉ. कलामांपासून ते शरद पवारांपर्यंत साºयांनीच त्यांचे कौतुक केले. पण मानसन्मानाने पोट भरत नाही. ‘फोर्ब्स’ने २०१० मध्ये एक यादी प्रसिद्ध केली. त्यात दादाजींच्या संशोधनाची दखल घेत ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान दिले. पण आपल्या संशोधनाचा धंदा त्यांना करता आला नाही म्हणूनच त्यांच्या दारिद्र्र्याचे दशावतार कायम आहेत. ते गेल्यानंतरही कुटुंबाला घट्ट आवळून ठेवणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात नांदेड हे खेडे. दादाजींचे दोन खोल्यांचे घर, दीड एकर शेती आणि खाणारे सहा जीव. स्वत: उपाशी राहून गरिबांच्या भूकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या या संशोधकाच्या आयुष्याच्या संध्याकाळी आता साºयांनीच पाठ फिरवली आहे. ‘फोर्ब्स’च्या वेळी त्यांच्या घरी हारतुरे घेऊन जाणारेही एव्हाना ओळख विसरले आहेत. दादांमुळे लाखो शेतकºयांचे जीवन पालटले. त्यांचे संशोधन वापरून शेतकरी व व्यापारी श्रीमंत झाले. ‘मलाच श्रीमंत होता आले नाही, त्यात त्यांचा काय दोष?’ स्वत:च्या वंचनेची दादा अशी समजूत घालायचे. सर्वाधिक पीक देणाºया ‘एचएमटी’ या तांदळाच्या वाणाचे आपण जनक आहोत, या गोष्टीचा त्यांना ना अभिमान ना अहंकार. ‘१९८१ ची गोष्ट, त्यावेळी पटेल-३ नावाचे वाण सगळीकडे प्रचलित होते. दादांनी शेतात हेच वाण लावले. धान अगदी भरात असताना त्यांना त्यात काही वेगळ््या ओंब्या दिसल्या. कुतूहल म्हणून त्यांनी ओंब्यांचे बियाणे अन्य धानाशी क्रॉस केले. क्रॉस केलेल्या या धानाचे दादांनी तीन-चार वर्षे पीक घेतले. या बियाण्यांचा वापर केला तर पीक लवकर येते, त्याचा दर्जाही चांगला असतो. दादांच्या या चमत्काराची बातमी पंचक्रोशित पसरली आणि मग दरवर्षी शेकडो शेतकरी या बियाणांसाठी त्यांच्याकडे येऊ लागले. कृषी क्षेत्रात क्रांती करणारे फार मोठे संशोधन आपण केल्याचे त्यांच्या गावीही नव्हते. दादांच्या दृष्टीने तो एक साधा प्रयोग. दादांच्या वाणाची कीर्ती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठापर्यंत पोहोचली. विद्यापीठाचे दोन संशोधक दादांना भेटायला आले. त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आता आपले संशोधन विद्यापीठ स्वीकारेल, असे दादांना वाटत होते. पण घडले विपरीत. काही दिवसांनी कृषी विद्यापीठाने बदमाशी करीत हेच वाण ‘एचएमटी-पीकेव्ही’ नावाने बाजारात आणले. ‘तुमच्या संशोधनाला शास्त्रीय आधार नाही’, असे निर्लज्ज व ऐतखाऊ उत्तर विद्यापीठाने त्यांना दिले. पण दादा खचले नाहीत.
दादांचे संशोधन सुरूच होते. पुढच्या दहा वर्षात त्यांनी नांदेड-९२, नांदेड-हिरा, नांदेड-चिनोर, डीआरके अशा कितीतरी वाणांचा शोध लावला. त्यावेळच्या सरकारने त्यांचा सुवर्णपदक देऊन सत्कार केला. पण ते पदकही नंतर नकली निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दादांना वर्षभर दहा हजार रुपये दर महिन्याला मदत केली. पण पुढे काय? ‘एकवेळ सांत्वन परवडले, आता कौतुकही नको’, दादांची भेट झाल्यानंतर त्यांचा हा प्रश्न अंत:करणाला चिरे पाडायचा. परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या उपचारासाठी तातडीने दोन लाख रुपयांची मदत दिली.पण समाज म्हणून आपण या संशोधकाचे काहीच देणे लागत नाही? मृत्यू जवळ आहे, पण सोबतीला कुणीच नाही. नंतर मात्र बेईमान सांत्वनांचा पूर येईल. कविवर्य श्रीकृष्ण राऊत यांची कविता अशावेळी अस्वस्थ करून जाते,
सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू...
तेरवीच्या पंगतीला खूप आली माणसे...
- गजानन जानभोर